विशेष प्रतिनिधी
मुंबई : Amit Shah महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार असल्यामुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही. मला महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे. त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पूर्ण ताकदीने निवडून विरोधकांचा सफाया करावा. ते दुर्बिणीनेही दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.Amit Shah
अमित शहा यांच्या हस्ते आज महाराष्ट्र भाजपच्या येथील नव्या इमारतीचे भूमिपूजन झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी पक्षाचे कार्यालय हे केवळ कार्यालय नव्हे तर मंदिर असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, महाराष्ट्र भाजप आपल्या नव्या इमारतीचे भूमिपूजन करून इतिहासात एक नवी सुरुवात करत आहे. आमच्या पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून आमच्यासाठी पक्ष कार्यालय हे मंदिर आहे. कार्यालयातच आमचे काम होते. कार्यालयातच आमच्या पक्षाचे सिद्धांत संवर्धित व संरक्षित होतात. कार्यालयातच आमच्या कार्यकर्त्याचे प्रशिक्षण होते. त्यामुळे इतर पक्षांसाठी पक्ष कार्यालय हे केवळ ऑफिस असू शकतो, पण भाजपसाठी ते मंदिरासारखे असते.Amit Shah
भाजपमध्ये साधा कार्यकर्ताही पंतप्रधान होतो
अमित शहा म्हणाले, भाजपमध्ये बूथ कार्यकर्त्यालाही पक्षाचा अध्यक्ष होण्याची संधी मिळते. मी त्याचे उदाहरण आहे. 1981 मध्ये बूथ अध्यक्ष म्हणून माझा भाजपतील प्रवास सुरू झाला. त्यानंतर मला अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. यावरून आपला पक्ष घराणेशाहीवर नव्हे तर लोकशाही मूल्यांवर चालतो हे स्पष्ट होते. जो कार्यकर्ता लोकशाही व पक्षाच्या सिद्धांतावर मार्गक्रमण करतो, जो स्वतःची कार्यक्षमता सिद्ध करू शकतो, तोच या पक्षात मोठा नेता होऊ शकतो. या देशात घराणेशाहीचे राजकारण चालणार नाही हे आम्ही सिद्ध करून दाखवले. राजकीय कार्यक्षमतेतूनच देशाचे नेतृत्व पुढे जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
एका गरीब चहावाल्याच्या घरी जन्मलेला एक व्यक्ती आपला त्याग, समर्पण, सेवा व देशभक्तीच्या आधारावर या देशाचा तीनवेळा पंतप्रधान झाला. त्यावरून लोकशाही पार्टीत आपला विश्वास किती दृढ आहे हे सिद्ध होतो. ज्या पक्षांत अंतर्गत लोकशाही नसते त्या पक्षांना देशाच्या लोकशाहीचे संरक्षण करता येत नाही. घराणेशाही असणाऱ्या पक्षांसाठी हा सर्वात मोठा संदेश आहे.
उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा
अमित शहा यांनी यावेळी उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षावरही नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, मी पक्षाचा अध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. मी सन्मानपूर्वक तडजोडीचा प्रस्ताव ठेवला. पण तो पुढे सरकला नाही. त्यामुळे आम्ही प्रदिर्घ काळानंतर पहिल्यांदाच स्वबळावर निवडणूक लढलो. त्यानंतर महाराष्ट्राला प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री मिळाला. त्यानंतर सलग तीनवेळा फडणवीसांच्या नेतृत्वात आमचे सरकार आले. आज ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आमच्यासोबत आहेत.
महाराष्ट्रात डबल नव्हे ट्रिपल इंजिन सरकार हवे
सध्या महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार अस्तित्वात आहे. त्याचे तुम्हाला समाधान असेल, पण मला नाही. मला डबल इंजिन नव्हे तर ट्रिपल इंजिन सरकार हवे. जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत व नगर परिषदांतही आपले प्रशासन हवे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक मोठ्या ताकदीने लढवून विरोधकांचा सफाया करावा. दुर्बिणीनेही ते दिसणार नाहीत एवढ्या ताकदीने आपल्याला ही निवडणूक लढायची व जिंकायची आहे. देशाची जनता भाजपच्या स्वागतासाठी तयार आहे, असेही अमित शहा यावेळी बोलताना म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App