विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथे माध्यमांसमोर मन मोकळे केले. पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीमार्फत करण्यात आलेला हा जमीन खरेदीचा व्यवहार नंतर रद्द करण्यात आला असला तरी, या अनुषंगाने उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे देत अजितदादांनी आपल्यावरील जुन्या आरोपांचे ‘शल्य’ बोलून दाखवले. निवडणुका सुरु झाल्या की आमच्यावर आरोप होतात. याआधी देखील माझ्यावर असेच आरोप झाले. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. मात्र बदनामी झाली, असे अजित पवार म्हणालेत.Ajit Pawar
मुंढवा आणि बोपोडी येथील कथित शासकीय जमीन खरेदी प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या जमिनीचा व्यवहार अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केला असून, 1800 कोटींची जमीन 300 कोटींत खरेदी केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल झाला असला, तर पार्थ पवारांवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे विरोधकांनी अजित पवारांना धारेवर धरले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या सर्व प्रकरणावर आज अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना आपले मन मोकळे केले.Ajit Pawar
नेमके काय म्हणाले अजित पवार?
मुंढवा प्रकरणातील कथित कागदपत्रांवर आश्चर्य व्यक्त करताना अजित पवार म्हणाले, “1 रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा काय कागद तयार होऊ शकतो? हे आजपर्यंत मला कळलेले नाही. मी पण आश्चर्यचकित झालो. या प्रकरणातील नोंदणी प्रक्रियेवर त्यांनी थेट बोट ठेवत प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केला. ज्या रजिस्टर ऑफिसच्या व्यक्तीने ही नोंदणी केली, त्याने अशी नोंदणी कशामुळे केली? काय असे घडले की त्याने चुकीचे काम केले? असा सवाल त्यांनी केला. याविषयीची वस्तूस्थिती एका महिन्यात कळेल, असेही सूतोवाच त्यांनी केले.
निवडणुका सुरु झाल्या की आमच्यावर आरोप
विरोधकांकडून होणारे आरोप हे निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक केले जातात, असे शल्य अजित पवार यांनी बोलून दाखवले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी चांगले अधिकारी चौकशी समितीत घेतले आहेत, त्यामुळे महिन्याभरात वस्तूस्थिती समोर येईल. निवडणुका सुरू झाल्या की आमच्यावर आरोप सुरु होतात. कुठूनतरी, काहीतरी असे काहीतरी बाहेर आणले जाते.
यावेळी त्यांनी 2008-09 मधील 70 हजार कोटींच्या आरोपांची आठवण करून दिली. तुम्हाला आठवत असेल तर 2008 अथवा २००९ मध्ये असंच माझ्याविरोधात 70 हजार कोटींचा आरोप झाला. त्याला 15-16 वर्षे लोटली. त्यातून कुणीही काहीही पुरावे देऊ शकले नाही. पण आमची बदनामी झाली, असे अजित पवार म्हणालेत.
मी कुठलीही चुकीची गोष्ट होऊ देत नाही
आपण पारदर्शकपणे काम करत असताना, केवळ राजकीय हेतुने बदनामी केली जाते, याचे दुःख त्यांनी व्यक्त केले. सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांची कामं करायची. पारदर्शकता कशी राहील ते बघायचे. नियमाला धरून सगळे करायचे… चूक होणार नाही त्याची काळजी घ्यायची आणि लगेच बारामतीतील कुठल्या कुठल्या जमिनीचे काहीही काढायला लागले,” असे ते म्हणाले. तसेच माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्यापासून मी कुठलीही चुकीची गोष्ट होऊ देत नाही, असेही त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.
दादांचा जवळच्या लोकांना सज्जड दम
मुंबईतही सांगितले, पुण्यातही आणि आता इथे ही सांगतो की माझ्या नावाचा वापर करून, मग माझे जवळचे नातेवाईक, कार्यकर्ते, अधिकारी असतील, त्यांनी जरी यदाकदाचित काही सांगितले, ते जर नियमाला धरून नसेल, तर संबंधित अधिकाऱ्याने ते काम करता कामा नये, असा सज्जड दम अजितदादांनी या पत्रकार परिषदेतून दिला. क्लास वन, टू आणि सर्व अधिकारी, आयएएस,आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांनी नियमात न बसणारे काम न करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App