विशेष प्रतिनिधी
मुंबई :’Ajey’ film उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर सध्या अनिश्चिततेचे सावट आहे. चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या मंजुरीची प्रतीक्षा करीत असून, प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे त्याच्या प्रदर्शनावर अडथळा निर्माण झाला आहे.’Ajey’ film
या संदर्भात चित्रपटाच्या निर्मात्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीदरम्यान सेन्सॉर बोर्डाने न्यायालयाला आश्वासन दिले की, पुढील दोन दिवसांत चित्रपटाच्या प्रमाणपत्राबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे परिस्थिती अनुकूल राहिल्यास १ ऑगस्ट २०२५ रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
याचिकेत, सेन्सॉर बोर्डाने मुख्यमंत्री कार्यालयाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (No Objection Certificate) मागितल्याचा दावा करण्यात आला होता, ज्यामुळे चित्रपटाचे प्रमाणन रखडल्याचा आरोप निर्मात्यांकडून करण्यात आला. न्यायालयाने या मुद्यावर नाराजी व्यक्त करत सेन्सॉर बोर्डाला लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
‘अजेय’ या चित्रपटात योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर येथील प्रारंभिक आयुष्यातील प्रवास, गोरखनाथ मठातील अध्यात्मिक जीवन, हिंदुत्ववादी भूमिका, तसेच मुख्यमंत्रीपदापर्यंतच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेण्यात आला आहे. चित्रपटात त्यांच्या कठोर नेतृत्वशैलीपासून ते धार्मिकतेकडे झुकलेल्या कार्यपद्धतीचे वास्तव चित्रण असल्याचा दावा निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळेच हा चित्रपट काही वादग्रस्त मुद्द्यांवर आधारित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यात अभिनेता विवेक ओबेरॉयने मोदींची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता योगी आदित्यनाथ यांच्यावर आधारित हा दुसरा मोठा राजकीय चरित्रपट मानला जात आहे.
चित्रपटाचे प्रमोशन आधीच सोशल मीडियावर सुरू असून, ‘अजेय’ या नावामागे योगींच्या कथित अडथळ्यांवर मात करणाऱ्या स्वभावाचे प्रतीक आहे, असा प्रचार करण्यात येत आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच निर्माण झालेला सेन्सॉर वाद त्याच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो.
आता सर्वांच्या नजरा सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर खिळल्या आहेत. प्रमाणपत्र मिळाल्यास हा चित्रपट १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App