डॉ. ओमप्रकाश शेटे
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. डॉ. भारतीताई पवार यांचे सहाय्यक सचिव ओमप्रकाश शेटे यांनी हजारो रूग्णांना विविध प्रकारचे सहाय्य मिळवून दिले. या रूग्णांचे अनेक अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत यातलाच हा एक हृद्य अनुभव… A humble experience in Kashmir; article by omprakash shete
#kashmirdairies जिंदगी में किसी के काम आने का हिस्सा बनना चाहा। मगर किस्मतने किस्सा बनाकर छोड दिया।
आहिस्ता चल ये जिंदगी, कुछ कर्ज चुकाने बाकी है। कुछ दर्द मिटाने बाकी है, कुछ फर्ज निभाने बाकी है।
या शब्द प्रपंचाने सुरुवात करण्याचे कारणही तसेच आहे. त्याचे झाले असे की मागच्या वर्षी सरकारी दौऱ्यात काश्मीरला जाणं झालं. आज पर्यंत कश्मीर धरतीवरील स्वर्ग आहे हे ऐकून होतो पण जायचा कधी योग आला नाही. मनाशी खूणगाठ बांधली होती की कधीतरी वेळ काढून कुटुंबासमवेत या स्वर्गीय सुखाचा अनुभव घेण्यासाठी जायचं. मुलांच्या ख्रिसमसच्या सुट्टयांच्या निमित्ताने हा योग एवढ्या लवकर जुळून येईल असे वाटले नव्हते. पण हा ‘ओमप्रकाश’ आहे, वेळ आणि संधी मिळाल्यास सोडणार थोडीच आहे? तात्काळ निर्णय घेतला आणि काश्मीरचा दौरा नक्की केला.
24 डिसेंबर पासून प्रवासाला सुरुवात झाली. श्रीनगर, शंकराचार्य मंदिर, गुलमर्ग, पहलगाम, चंदनवाडी अमरनाथ व्हॅली, वेरीनाग, मार्तंड सूर्यमंदिर, सोनमर्ग या मार्गे फिरतांना ईश्वरी साक्षात्कार व ‘दैवीदेण’ असलेले विलोभनीय सौंदर्य डोळ्यात साठवून घेतले. बऱ्याच ठिकाणी नेटवर्क नव्हते म्हणून कोणाशीही संपर्क होणं शक्य नव्हतं. परंतु हॉटेलमध्ये ‘वायफाय’ सुविधा असल्याने किमान सोशल मीडियावर संवाद साधता येत होता. शिल्पाने काश्मीरच्या बर्फातील आमच्या दोघांचा फोटो व्हाट्सअपच्या डीपी वर ठेवला असल्याने आम्ही काश्मीरमध्ये आहोत हे सर्वांनी समजून घेतले.
रात्री हॉटेलवर आल्यानंतर माझ्या व्हाट्सअप वर कॉल आला. फोनवर अचानक हिंदीतून संभाषण ऐकू आले. थोडा वेळ मला आश्चर्य वाटले, पण मी फोन घेतला. मी काही बोलायच्या आतच तिकडून आवाज आला,”भाईजान, आप काश्मीर में है क्या?”. मला काही कळायच्या आतच मी हो म्हटलं. फोनवरील त्या गृहस्थाने नाराजीचा सूर आवळला,”आपने हमे कश्मीर आने पर मिलने का वादा किया था। लेकिन आपको शायद याद नही रहा होगा। खैर कोई बात नही, आपसे बस पाच मिनिट चाहता हु। मेरी बहुत ही दिली तमन्ना है, आप मुझसे मिलने से इनकार मत करना। आप जिस जगाह पर कयाम से है, उसी जगह के पास ही मेरा गांव है। आप इजाजत दो तो बस मैं आपसे मिलने चला आता हूं।”
माझ्याकडे नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. मी जास्त विचार न करता त्यांना रात्री ‘हॉटेल माउंटन’ ला भेटण्यास येण्याचे सांगितले. तो तरुण अपेक्षेप्रमाणे रात्री आठच्या सुमारास भेटण्यासाठी हॉटेलमध्ये आला. मुदस्सीर अहमद भट असे त्या तरुणाचे नाव होते. हॉटेल पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बडारन ऐश्मुकाम ता.पहलगाम जि.अनंतनाग या गावचा तो सरपंच आहे. पाहताक्षणीच हात जोडत त्याने प्रेमाने मिठी मारली. त्याच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. रडववेल्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहत म्हणाला की, “साहब, दो-तीन बार मेसेज किया लेकिन आपने जवाब नही दिया। क्या नाराज हो हमसे? हमने पहलेही आपको कश्मीर आने का न्योता दिया था। और आपने वादा भी किया था, की जब कभी कश्मीर आयेंगे तब हमसे जरूर मिलेंगे। आप हमारे मेहमान हो, हमे भी खिदमत का मौका मिलना चाहिए।”
त्याचे हे वाक्य एकूण मला गहिवरून आलं आणि आपसूकच माझ्या भूतकाळातल्या त्या आठवणी जाग्या झाल्या. ३ सप्टेंबर २०२१ रोजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. भारतीताई पवार यांचा सहाय्यक सचिव म्हणून दिल्लीत रुजू झालो. २१ सप्टेंबर रोजी काश्मीरच्या शासकीय दौऱ्यानिमित्त ना. भारतीताईंच्या समवेत आलो होतो. पहलगाम येथे अमरनाथ यात्रेकरूंसाठी पन्नास बेडेड हॉस्पिटलचे भूमिपूजन झाले. अनंतनाग जिल्ह्याच्या वैद्यकीय यंत्रणेचा आढावा घेत असताना एक युवक ना.भारतीताईंना भेटला. “मॅडम, मैं मुदसिर अहमद भट, मै बडारन गाव का सरपंच हुं। मेरा बेटा शेरयार हैदर सिर्फ आठ महिने का है। उसके दिल मे छेद है। उसकी दिल्ली या मुंबई के बडे हॉस्पिटल मे सर्जरी करवाना पडेगी ऐसा डॉक्टर ने कहा है।” मुदसिरचे वय तीसच्या आसपास होते, आपल्या आठ महिन्याच्या एकुलत्या एक मुलासाठी एक हतबल बाप हात जोडून उभा होता.
ना. भारतीताईंनी माझ्याकडे नजर टाकत सांगितलं की, ”आप चिंता मत कीजिए, शायद ईश्वरने कुछ सोच समझ कर ही हमसे मिलाया होगा।” मी तात्काळ ताईंच्या नजरेतील भाव समजलो. ताईंनी मुदस्सीरला माझ्याकडे हात दाखवत सांगितले की, ” यह हमारे असिस्टंट सेक्रेटरी ओमप्रकाश शेटे है, हमसे जो बन पायेगा हम पूरी कोशिश करेंगे निराश मत होना, आपकी पूरी सहायता की जायेगी ।” मुदासीरच्या हातातील फाईल घेऊन मी त्यावर नजर टाकली. मूळात मी डॉक्टर नसलो तरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात पाच वर्षे काम करत असताना अनेक जटिल वैद्यकीय प्रक्रिया, शस्त्रक्रिया व उपचारपद्धती याबद्दल भरपूर ज्ञान अवगत केले आहे. फाईल मधील टुडे इको वर नजर टाकल्यावर बाळाला जन्मजात हृदयाचा दुर्धर आजार असल्याचे लक्षात आले. सदरील शस्त्रक्रिया अतिशय जोखमीची व जीवावर बेतणारी होती. परंतु, शस्त्रक्रिया करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता.
मी तात्काळ मुंबईच्या एस. आर. सी. सी. रुग्णालयामध्ये संपर्क करून बाळाच्या उपचाराची जबाबदारी घेतली. आमचा काश्मीरचा दौरा संपत असतानाच मुदास्सीर त्याची बेगम रुकसाना हिला घेऊन मुंबईकडे रवाना झाला. बाळाची तब्येत अतिशय खालावली होती. कश्मीरला जाण्यापूर्वीच दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये लहान बालकांच्या तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर ठेवण्यात आले होते. सदरील शिबिरातील 185 बालकांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना एसआरसीसी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. दि. 1 ऑक्टोबर 2021 रोजी जीवन आशा, हर एक को जीने की आशा या मिशन अंतर्गत ना.भारतीताई पवार यांच्या उपस्थितीत सर्व बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कार्यक्रमस्थळी मुदस्सर ची नजर आमच्यावर खिळली होती. तो आमच्याकडे नजर ठेवून होता. शेरयारला वैद्यकीय दृष्ट्या संतुलित करणे गरजेचे होते, म्हणून गेली दहा दिवस उपचार सुरू होते. जोपर्यंत शारीरिक दृष्ट्या बाळ सक्षम होत नाही तोपर्यंत शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. आम्ही रुग्णालय प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या असल्यामुळे त्याचे मोफत उपचार चालू होते. या दुर्मिळ शस्त्रक्रियेला कमीत कमी सहा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता.परंतु संपूर्ण उपचार मोफत करण्याची हमी आम्ही घेतल्यामुळे मुदसिर निवांत होता. तब्बल दहा ते बारा दिवसाच्या उपचारानंतर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. परंतु शस्त्रक्रिया जोखमीची असल्याकारणाने पुढील दोन दिवस अतिशय महत्त्वाचे होते. परंतु दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी रात्री बाळाने जगाचा निरोप घेतला. मी नाशिकला असताना मुदस्सीरचा मला मेसेज आला, ” साहब, शायद ये मेरी बदनसीबी थी जो बच्चा बच नही पाया। लेकिन मै खुश किस्मत इसलिये हू कि मेरे बच्चे को बचाने की कोशिश के लिये खुदाने आप जैसे फरिश्तो से मुझे मिलाया। आपने कोशिश तो बहुत की लेकिन उस परवरदिगार को शायद कुछ और ही मंजूर था। एक तरफ मेरे बच्चे के मरने का गम है, लेकिन इन्सानियत और इन्सानियत के रखवाले आज भी जिंदा है इस पर यकीन पुक्ता हो गया।”
तो खूपच भावनिक झाला आणि म्हणाला की, “मै बच्चे को काश्मीर ले जाना चाहता हु। आप जो भी फॉर्मलिटी है वो पुरी करने के लिए मुझे हेल्प कीजिए।” मला आश्चर्य वाटलं..! बाळाचे वय फक्त आठ महिने होतं. बाळ मोठा असल्यास तरी त्याच्याबरोबर प्रेम व लगाव असणे साहजिक होतं. परंतु त्याचं त्याच्या मुलावर असलेलं प्रेम मी नाकारू शकलो नाही. सुदैवाने त्याला ‘एअर ऍम्ब्युलन्स’ उपलब्ध करून देण्यात आम्हाला यश आले.
तो टॉपिक मी तेव्हाच विसरून गेलो होतो. कारण वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना असे कित्येक अनुभव दररोज येतात. फार कमी वेळेस असं होतं की, एखादा रुग्ण मृत्यू पावला तरीही संबंधित कुटुंब माझ्याशी सातत्याने संपर्कात राहतं. मुदस्सीर हा काश्मीरचा तरुण सरपंच होता, परंतु तो सातत्याने माझ्या संपर्कात असायचा. जेव्हा जेव्हा त्याचे मेसेज यायचे तेव्हा शेरयार चा चेहरा माझ्या नजरेसमोर यायचा. काही वेळेस मी अस्वस्थ व्हायचं आणि मनात वाटायचं की, आपण त्या बाळाला वाचू शकलो नाहीत. बऱ्याच वेळेस मेसेजला उत्तर देणे शक्य व्हायचे नाही. मुदासीर मला परत मेसेज करायचा आणि बोलायचा, “साहब, आप मुझपर नाराज हो क्या?” मी नाही म्हणायचं आणि सांगायचो की, “मला तुझ्या बाळाला वाचवण्यात यश आलं नाही त्याबद्दल मला अंत:करणातून वेदना होतात.” तो म्हणायचा, “छोड दो ना साहब, जैसी उपरवाले की मर्जी।”
बलगामच्या माऊंटन हॉटेलमधील रिसेप्शन काउंटर च्या समोर आम्ही बसलो होतो. अचानक माझ्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. मुदास्सीरही माझ्या गळ्यात पडला. पाच मिनिटं कोणीही कोणास बोललं नाही, दोघांचेही खांदे ओले झाले. हॉटेलच्या मॅनेजमेंटला समोर काय चाललंय हे कळायला मार्ग नव्हता. शेवटी मी स्वतः ला सावरत म्हटलं, “मै कश्मीर मे आया हूँ यह आपको कैसे पता चला?” तो म्हणाला, “साहब, आपकी कश्मीर के ईलाके की बरफ वाली तसबीर फेसबुकपर व्हायरल हुई थी । बस, मुझे आपकी खुशबू महसुस हो गई।” त्याच्या चेहऱ्यावर भेटीचा आनंद स्पष्टपणे जाणवत होता. मला वाटलं इतक्याने समाधानी झाला असेल. परंतु हॉटेलपासून 15 किलोमीटर असलेल्या त्याच्या घरी भेट द्यावी व जेवण करावे अशी त्याची इच्छा होती. मी त्याचा हातात हात घेत म्हटलं, “अभी नहीं, अगली बार जरूर जाएंगे।” परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. “साहब, हमारे मजहब मे किसी के पैर छूना मना है। लेकिन अगर मैं आपके पैर धोकर भी पाणी पिया तो कम होगा। आपका इतना बडा एहसान हमारे उपर हैं।” त्याचे हे टोकाचे शब्द एकूण मी त्याला “उद्या चहा किंवा कॉफी घ्यायला घरी येतो” असं म्हटलं. परत तो हात जोडून म्हणाला की, “कुछ भी करके कल शाम आपको हमारे घर पे खाना खाने के लिए आना हैं।” माझी मात्र गोची झाली होती. तितक्यात तो म्हणाला की, सर, मुझे भाभीजी से मिलना है।” मी शिल्पाला कॉल करून खाली बोलावले. अखेर त्याने अर्जव करून शिल्पा आणि माझं मन वळवल. मी त्याला म्हटलं की, “हम ‘प्युअर व्हिजिटेरिअन’ है, इसका खयाल रखना।” त्यांने तुमच्या जेवणात शुध्दता व पावित्र्याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ अशी खात्री दिली.
दुसऱ्या दिवशी सायंकाळी हॉटेलमध्ये आल्याबरोबर मुदस्सीरचे अनेक मेसेज मोबाईल मध्ये येऊन पडले होते. “आम्ही सर्वजण घरी वाट पाहत आहोत, तुमच्याकरता वेगळी भांडी व किचनची व्यवस्था केली आहे. सर्व काळजी घेऊन शाकाहारी पावित्र्य आम्ही राखले आहे. विनंती आहे, आपण घरी यावे.” रात्री आठच्या सुमारास तो हॉटेलवर गाडी घेऊन आला. आम्ही त्याच्याच गाडीत बसून बडारन कडे मार्गस्थ झालो. गाडी घराच्या आत जाताच तब्बल 20 ते 22 कुटुंबीय आमच्या स्वागतासाठी उभा असल्याचे दृष्टीस पडले. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंददायी भाव होते. त्यांनी लागलीच मला एक खुशखबर दिली. “अल्लाह ने मुझे दुबारा गिफ्ट दिया है, मुझे और एक बेटा हो गया है,और उसका नाम अबुजर रखा है। मला हे ऐकून मनापासून आनंद झाला व खरंच परमेश्वर किती दयाळू आहे याचीही अनुभूती आली.
या कुटुंबासोबत गप्पा मारताना काश्मीर मधील अनेक मुद्द्यांवर दिलखुलास चर्चा झाली. लोकांना आधुनिकीकरण व विकासाच्या गोष्टी सहजासहजी पचनी पडत नाहीत या बाबीचाही खुलासा झाला. गेल्या कित्येक वर्षापासून अंगवळणी पडलेल्या अनेक गोष्टी बदलण्यासाठी बराच अवधी लागेल असेही त्यांनी सांगितले. डिजिटल इंडिया कडे आपल्या देशाची वाटचाल होत आहे, यामध्ये काश्मिरी कुठेही मागे राहू नये यासाठी आमच्यासारख्या तरुण सरपंचाला आपल्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे त्याने बोलून दाखविले. त्यांनी आणखी एक इच्छा प्रकट केली, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना भेटण्याची..! खरंच मुदस्सीर अतिशय तळमळीचा लोकप्रतिनिधी आहे. या देशाच्या अखंडतेसाठी जे काही करता येईल ते करण्याची त्याची तयारी आहे. लवकरच त्याची ही इच्छा व अपेक्षा पूर्ण व्हावी ही ईश्वराकडे प्रार्थना.
तब्बल 6° सेल्सिअस डिग्री तापमानात जेवण करत असताना त्यांनी अतिशय प्रेमाने व आदबीने आग्रह करत जेवण वाढले. पाच ते सहा प्रकारचे शाकाहारी व्यंजन त्यांनी खास काश्मिरी पद्धतीने बनवले होते. अनेक व्हेज बिर्याणीचे प्रकार आम्ही पहिल्यांदाच खाऊन अनुभवले. कमळाच्या फुलाला खालुन असलेल्या दांडीला ‘नद्रू’ असे म्हणतात, त्याच्या भाजीचा आस्वाद आम्हाला मिळाला. गप्पा करत करत किती जेवण झालं हे लक्षातच आले नाही. -६ डिग्री तापमान असल्याने प्रचंड थंडी होती, त्यामुळे काश्मीरी शेकोटी कांगडीची उब व त्यासोबतच भट कुटुंबाच्या ‘प्रेमाची ऊब’ मिळाली.
घरातल्या प्रत्येक सदस्यांची ओळख करत असताना एकत्रित कुटुंब ठेवण्यात त्यांना यश आले असल्याचे लक्षात आले. घरामध्ये तब्बल 25 माणसं एकत्रित राहत होते. परत निघते वेळी कश्मीरी शाल, तेथील प्रसिद्ध असलेले अक्रोड, बदाम व अनेक पदार्थ त्यांनी बांधून दिले. निघतांना सर्व महिला व पुरुष अतिशय कृतज्ञतेचे भाव प्रकट करत, पुढच्या वेळेस मात्र आमच्या घरीच मुक्कामाला यायचं असा आग्रह करत होते. काश्मीर आपली परत वाट पाहत आहे असं ते पुन्हा पुन्हा सांगत होते. मी गाडीत बसल्यानंतर शिल्पा गाडीकडे येत असताना मुदस्सीरच्या आई हजरा बानू पुढे आल्या. त्यांनी शिल्पाची नजर उतरवत तिच्या कपाळावर ‘चुंबन’ करत अनेक आशीर्वाद दिले. त्यांच निस्पृह प्रेम व आदरातिथ्य यांनी आम्ही अक्षरशः धन्य झालो. दिवसभर प्रवास करुन माझी दोन्ही मुलं थकली होती, म्हणून त्यांना हॉटेलवरच ठेवलं होतं. भट कुटुंबीयांनी आमच्याकडून वचन घेतले की, पुढच्या वेळेस दोन्ही मुलांना इथे घेऊन या. त्या दोघांकरिता ही दुआ दुआ म्हणत त्यांनी आम्हाला अनेक आशीर्वाद दिले. काही वेळाची पण आयुष्यभराच्या आठवणीची ती भेट म्हणजे काश्मीरच्या एका देशप्रेमी परिवाराची आमच्यासाठी ही मोठी दुआच होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App