विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : रविवार व सोमवार असे सलग दोन दिवस मराठवाडा, खान्देश, पश्चिम विदर्भ ( Vidarbha ) व सोलापूर जिल्ह्यात मुसळधार ते संततधार पावसाने हजेरी लावली. जूनपासून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला वरुणराजाने चिंब भिजवून टाकले, सर्व धरणे, नदीनाले तुडंुब भरले. विशेष म्हणजे रविवारी रात्रीपासून ते सोमवारी सकाळपर्यंत अखंड जलधारा सुरू होत्या. रविवार ते सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत मराठवाड्यातील ४८३ मंडळांपैकी २८४ मंडळांत अतिवृष्टी म्हणजे ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला.
यंदाच्या मोसमात प्रथमच अतिपावसाची नोंद झाली. सर्वाधिक ३१४.५० मिमी पाऊस परभणी जिल्ह्यातील पाथरीत, २७७ मिमी बाभळगाव मंडळात झाला. पूरपरिस्थितीमुळे मराठवाड्यात ६ जिल्ह्यांतील ८ जणांचा बळी गेला. संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीच्या शेवता खुर्द येथे शेतकरी, कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथे १८ महिन्यांचे बालक वाहून वाहून गेले. बीड, नांदेडच्या पाचद गावात पुरात दोन मृतदेह सापडले. लातूर जिल्ह्यात बैल धुताना २४ वर्षीय शेतकरी वाहून गेला. हिंगोलीत तीन जण वाहून गेले, तर विदर्भात चौघांचा बळी गेला.
नांदेडच्या देगलूर नाकात ८ घरांची पडझड. विष्णुपुरीचे १४ दरवाजे उघडले. हिंगोलीत पुरात अडकलेल्या ५४ जणांना वाचवण्यात यश आले. खरिपातील मूग, उडीद, हळद सोयाबीनचे माेठे नुकसान झाले असले तरी रब्बी पिकांसाठी पाऊस उपयुक्त आहे.
सुरत-नागपूर महामार्ग व्यारा बायपासजवळ पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने दोन तास महामार्ग बंद होता. शिवाय पिंपळनेर-नवापूर रस्ताही पावसाच्या पाण्यामुळे पहाटे पाचपासून दुपारी दोनपर्यंत बंद होता. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी हवेच्या दाबाचा पट्टा तेलंगणा, मध्य भारत, महाराष्ट्रापर्यंत पसरला आहे. गोलचक्रकार वाऱ्यांनी ढग वाहून आणले. स्थानिक वातावरण पावसासाठी अनुकूल आहे. यामुळेच मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर जास्त आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App