राजकारण्यांची खुशामतखोरी कशाला? खाम नदी प्रकल्पाला माझे नाव नको… भाजप राष्ट्रीय सचिव विजया रहाटकरांनी औरंगाबाद आयुक्तांना लिहिले खरमरीत पत्र


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : शहरातील खाम नदी पात्रातील विविध प्रकल्पांना सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची नावे देण्याच्या महापालिका आयुक्त व प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या उचापतीला औरंगाबादच्या माजी महापौर व भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी दणका दिला. खाम नदी सुधारणा प्रकल्पातील तलावाला परस्पर दिलेले माझे नाव काढून टाका, असे विजया रहाटकर यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.Withdraw my name from Smart city project, Vijaya Rahatkar asked Aurangabad Munciple corporation commissioner
I

“शहरातील खाम नदी पात्रातील विविध प्रकल्पांना आपण सर्वपक्षीय नेत्यांची नावे दिल्याची माहिती माध्यमांतून समजली. त्यात माझेही नाव उन्नती तलावासाठी दिल्याचे माध्यमांतूनच समजले आणि सखेद धक्काच बसला. एक तर मला कल्पना न देता, किंवा माझी संमती न घेता परस्परच असे नाव देणे अयोग्य आहे. पण त्याही पलीकडे जाऊन हयात असलेल्या राजकारण्यांची नावे अशा प्रकारे देण्यास माझा सैद्धांतिक विरोधच आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

स्मार्ट सिटी योजनेतील काही प्रकल्पांना औरंगाबादच्या सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांची नावे देण्याचा पराक्रम पांडेय यांच्या महापालिका प्रशासनाने केला आहे. या प्रकल्पांचे उदघाटन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री व औरंगाबादचे पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे. गंमत म्हणजे, आदित्य ठाकरे व सुभाष देसाई यांच्यासुद्धा नावे प्रकल्पांना दिली आहेत. याशिवाय केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, खासदार इंम्तियाज जलील, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, आमदार अतुल सावे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर आदींची नावे दिली आहेत. मात्र, आपले नावे नकोच, असे रहाटकरांनी नमूद केले आहे. अशीच भूमिका भाजप आमदार अतुल सावे यांनीदेखील घेतलेली आहे. “आपले नाव दिल्याचे समजते आहे, पण ना त्याची कल्पना दिली गेली ना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले,” असे रहाटकरांनी पत्रात म्हटले आहे.

रहाटकर म्हणतात, “खरे तर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत झालेल्या या कामांना महापुरूषांची नावे देता आली असती किंवा संभाजीनगरसाठी अतुल्य योगदान देणारे, विविध क्षेत्रात संभाजीनगरचे नाव उज्ज्वल करणारया नामवंतांची नावे देता आली असती. अशा मान्यवरांचा आपल्याकडे अजिबात दुष्काळ नाही. पण तरीही आपण हयात असलेल्या स्थानिक राजकारण्यांची व काही विशिष्ट मंत्र्यांची नावे प्रकल्पांना देता, हे पटण्यासारखे नाही. याला स्पष्ट भाषेत राजकारण्यांची खुशामत म्हणतात. दुर्दैवाची बाब म्हणजे, या प्रकल्पांचे नावांसहित उदघाटन करताना कोणालाही वावगे वाटले नसल्याचा खेद वाटतो आहे. कदाचित हेतू चांगला असेलही; पण त्यातून जाणारा खुशामतखोरीचा संदेश खचितच चांगला नाही. सबब, कृपया माझे नाव कुठेही दिले असल्यास (कारण अधिकृत माहिती नाही किंवा उदघाटनाचेही निमंत्रण नव्हते) ते रद्द करण्यात यावे. त्याचबरोबर शहराची माजी महापौर म्हणून महापालिका प्रशासनाला माझी सूचना आहे, की अन्य नेत्यांचीही नावे रद्द करावीत.”

स्थानिक नेत्यांची नावे देण्याच्या वादग्रस्त निर्णयावरून पांडेय यांच्यावर टीका होत आहे. शिवसेना मात्र त्यांच्या मदतीला धावून आली आहे. यात चुकीचे काय आहे सर्वच पक्षांच्या नेत्यांची नावे आहेत. भाजपच्या विजया रहाटकर यांचेही नाव आहे, मग अडचण काय आहे, असा उलट सवाल चंद्रकांत खैरे यांनी विचारला आहे. डाॅ. कराड, इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याचे दिसते आहे.

Withdraw my name from Smart city project, Vijaya Rahatkar asked Aurangabad Munciple corporation commissioner
I

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण