प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण 31 जुलैपासून पुन्हा एकदा संजय राऊत नावाभोवती फिरायला लागले आहे. कारण ईडीने राऊतांना ताब्यात घेतले आहे. 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्यात ईडीने राऊतांची 9.30 तास चौकशी केल्यानंतर त्यांनी संजय राऊतांना ताब्यात घेतले. राऊत यांच्यामागे ईडीची पीडा मागे लागण्यामागे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय शत्रू वाढवल्याचेही कारण आहे, अशी चर्चा सुरू आहे. What made Sanjay Raut famous in the last 2.5 years?? Despite his controversial statements
पवारांचे राऊतांना संरक्षण कवच
संजय राऊत यांची शरद पवारांची विशेष जवळीक आहे. राऊतांना पवारांचे संरक्षण कवच असल्याचे बोलले जाते. संजय राऊत यांचे नेमके वादग्रस्त वक्तव्य आहेत तरी काय याची उत्सुकता महाराष्ट्रात अनेकांना आहे.
राऊतांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय शत्रू वाढवले, या वक्तव्यामुळे राऊत यांनी भाजप, राष्ट्रवादी, राजे घराणे, निवडणूक आयोग अशा सर्वांची नाराजी ओढवून घेतली, असे अनेकांचे मत आहे.
शिंदे गटातील ४० आमदारांचा अपमान
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेतील ४० आमदार घेऊन महाराष्ट्राबाहेर गेले, त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी या आमदारांविषयी अत्यंत हिणकस वक्तव्य केले. राऊत म्हणाले, ‘ज्याने बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी केली, तो संपला, बाळासाहेबांचे शाप लागले. एका बापाचे असाल तर ४० जणांनी राजीनामा द्या. निवडणुकीला सामोर जा. गुलाब पाटलांची भाषणे पाहिली तर शिवसेनेत हाच एक असा दिसला. पण तुझ्या मायला आता ढुंगणाला पाय लावून पळाला. पुन्हा तुला पानटपरीवर बसवू. माझा शब्द कधी खोटा ठरणार नाही. आता गुवाहाटीमधून थेट 40 मृतदेह येतील, त्यांना थेट शवागरात पाठवण्यात येतील, असे वक्तव्य केले.
संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे आमदारांचे बंड शांत होण्याऐवजी ते आणखी पेटले, अखेरीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सरकार अल्पमतात आले आणि सरकार कोसळले.
राज्यसभा निवडणुकीत वादग्रस्त विधान
राज्यसभा निवडणूक महिनाभरापूर्वी झाली, त्यावेळी विधानभवनात आलेले संजय राऊत यांनी विधानभवन हे शिवसेना भवन आहे, असे वक्तव्य केले होते.
कोरोनात डब्लूएचओ अधिकाऱ्यांवर टीका
– कोरोनाच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या, त्यावेळी राऊत यांनी या अधिकाऱ्यांपेक्षा कंपाउंडर हुशार असतो, मी कंपाउंडरकडून औषधे घेतो, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राऊत यांचा कंपाउंडर म्हणून उल्लेख करत त्यांच्यावर टीका करण्यात येऊ लागली.
उदयनराजेंचा केला अपमान
– छत्रपती शिवाजी महाराजांचे साताऱ्याच्या गादीवरील वंशज उदयन राजे यांना ‘छत्रपतींचे वारस असल्याचा पुरावा द्यावा’, असे वक्तव्य संजय राऊतांनी केल्यानंतर राज्यभरात प्रतिक्रिया तीव्र उमटल्या होत्या. त्यावेळी उदयन राजे यांनी त्यांना कडक शब्दांत सुनावले होते.
निवडणूक आयोगालाच केले टार्गेट
मुंबईमध्ये रामनवमीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांचा तोल गेला होता. कायदे आमच्यासाठी बनवण्यात आले नाही. आम्ही हवे तेव्हा बदलू. सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. आचारसंहिता चालू आहे. मात्र जे मनात आहे ते बाहेर नाही आले की श्वास कोंडल्यासारखा होतो, भाड मे गया कानून और भाड मे गयी आचारसंहिता’, असे राऊत यांनी म्हटले. राऊत यांनी थेट निवडणूक आयोगालाच आव्हान दिले होते.
स्वप्ना पाटकर यांना शिवीगाळ
संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांना आई माई वरून शिव्या दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिप वरूनच संजय राऊत यांच्या विरोधात एफआयआर देखील दाखल झाली आहे. पोलीस ऑडिओ क्लिपची कसून चौकशी करत आहेत. ते जमीन व्यवहाराबाबतही स्वप्न पाटकर यांच्याशी बोलल्याचे या ऑडिओ क्लिप मध्ये स्पष्ट होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App