विशेष प्रतिनिधी
पिंपरी : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेश पातळीवर कितीही ऐक्याचा आव आणला असला तरी स्थानिक राजकारणामुळे आता दोन्ही पक्ष आमने-सामने आल्याचे दिसत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडण्याची मागणी आल्यानंतर शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे भडकले असून त्यांनी राष्ट्रवादीवर एकापाठोपाठ एक तोफा डागल्या आहेत. पार्थ पवार यांच्यासाठी मतदारसंघ सोडावा ही मागणी कोणी सहज केली की त्याला करायला लावण्यात आली?, असा खडा सवाल खासदार बारणे यांनी केला आहे. Shivsena – NCP Feud: Shiv Sena MP Shrirang Barne fired; Maval said he would not leave NCP !!
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे आमदार आणि खासदार राष्ट्रवादी विरोधात उघडपणे भूमिका मांडायला लागले आहेत. आधी खासदार गजानन कीर्तिकर यांनी म्हणायला ठाकरे सरकार, पण लाभ घेते पवार सरकार असे जोरदार टीकास्त्र सोडले आहेच. त्या पाठोपाठ आता खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात मुद्द्यावर त्या पक्षाला घेरले आहे. मावळ मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून प्रत्येक निवडणूक शिवसेनेच्या उमेदवारांनी जिंकली आहे स्वतः श्रीरंग बारणे दोन टर्म खासदार आहेत. अशा स्थितीत शिवसेनेने मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याचे कारणच काय?, असा सवाल बारणे यांनी केला आहे. ही मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे की त्याला करायला लावली आहे? लोकसभा निवडणुकीला अजून दोन वर्षे बाकी आहेत. एवढ्या काळात राजकारणात बऱ्याच उलथापालथी घडू शकतात, असा सूचक इशारा श्रीरंग बारणे यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आल्याचा असा गैरफायदा घेते आहे, असा आरोपही बारणे यांनी केला आहे.
भाजपबरोबर शिवसेना 25 वर्षे युतीत सडली असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अवस्था गेल्या 2.5 वर्षात महाविकास आघाडीत कुचंबल्या सारखीच झाली आहे. शिवसेनेला काँग्रेससाठी कोल्हापूर उत्तर मतदार संघ सोडावा लागला आहे. आता त्यापुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस साठी विशेषतः पार्थ पवारांसाठी सोडण्याचा शिवसेना नेतृत्वावर दबाव आणला आहे.
कोल्हापूर उत्तर मध्ये राजेश क्षीरसागर यांच्या सारखा तगडा उमेदवार असताना त्यांची “समजूत” काढून मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसच्या उमेदवारासाठी सोडणे शिवसैनिकांना भाग पाडले आहे. पण आता मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे विद्यमान खासदार असताना हा मतदारसंघ पार्थ पवारांसाठी सोडून श्रीरंग बारणे यांना राज्यसभेवर पाठवावे, अशी मागणी पुढे आली आहे. पण आता खासदार श्रीरंग बारणे त्यामुळेच भडकले आहेत.
एकीकडे काँग्रेससाठी असा राजकीय “त्याग” कोल्हापूरमध्ये केल्यानंतर मावळमध्ये राष्ट्रवादीसाठीही शिवसेनेने “त्याग” करावा असा प्रस्ताव शिवसेना नेतृत्वा पुढे देण्यात आला आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा प्रस्ताव स्वीकारणार का?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आगामी निवडणुकांध्ये शिवसेनेने मावळ मतदारसंघ हा राष्ट्रवादीला द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी केली. यासाठी त्यांनी एक फेसबूक पोस्ट केली. या पोस्टची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. ‘महाविकास आघाडीचे आधारस्तंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार यांच्यासाठी शिवसेनेने मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा, असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
राज्यात काही वेळा मध्यावधी निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचेही नेते मंडळी निवडणुकीची तयारी करा, असे सांगत आहेत, तर शिवसेनेही राज्यभर शिवसंपर्क मोहिमेच्या अंतर्गत संपर्क सुरू केले आहेत. त्यामुळे आतापासूनच राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांच्या एका फेसबूक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पार्थ पवार यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पार्थ यांना शुभेच्छा देत नितीन देशमुख यांनी एक वेगळीच मागणी केली आहे. आगामी निवडणुकांमुळे आताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. खरेतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पार्थ यांना शुभेच्छा देत नितीन देशमुख यांनी एक वेगळीच मागणी केली आहे.
नितीन देशमुख यांनी लिहिले की, ज्याप्रमाणे युवानेते, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना वरळीमधून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या कामाचा आवाका आज महाराष्ट्र पाहत आहे, त्याप्रमाणे पार्थ यांनाही एक फेअर चान्स मिळाला पाहिजे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे संसदरत्न खासदार आहेत. त्यांच्या कामाची चुणूक आपण सर्वांनीच पाहिली आहे. महाविकास आघाडीने ठरविल्याप्रमाणे पुढील निवडणूक आघाडी लढणार आहे. त्यामुळे मावळची जागा ही पार्थ अजित पवार यांना देऊन श्रीरंग बारणे यांना महाविकास आघाडीने राज्यसभेत पाठवावे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यामुळे राष्ट्रवादीत देखील चलबिचल झाली असून इथून पुढे मावळ मतदार संघात शिवसेनेबरोबर काम करायचे का? याचा गंभीर विचार राष्ट्रवादीमध्ये सुरू झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App