विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच १ डिसेंबर पासून शाळा सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते मात्र परत एकदा शाळा सुरू होण्यापूर्वीच बंद होणार का ह्याकडे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडाळाची आज एक महत्त्वाची बैठक होणार आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
आजच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता ही बैठक सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला रुग्णालयातून उपस्थिती लावणार आहेत. ते व्हिडीओ कॉन्फर्न्सिंगद्वारे या बैठकीत उपस्थित असतील. यावेळी या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट व्यतिरिक्त राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा सेवा विस्तार आणि एसटी संप यावरही या बैठकीत निर्णय होणार आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या एन्ट्रीने सरकार शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर ठाम राहणार की पुन्हा ‘स्कुल चले हम’ लांबणीवर जाणार यावर आज निर्णय होणार आहे.
तर, मुंबई महापालिका क्षेत्रात शाळा सुरु करण्याविषयीचा प्रस्ताव महापालिका शिक्षण विभागामार्फत महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासमोर सादर होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शाळांविषयी जो निर्णय होईल त्यानुसारच आयुक्तांकडून मुंबईतील शाळांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
शालेय शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केलेला नाही. त्यामुळे राज्यातील शाळाही तयारीला लागल्या होत्या. इतकंच नाही तर आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व शाळा, जिल्हे, महापालिका, नगरपालिका, छावणी बोर्ड यांच्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या होत्या. त्यामुळे, आता सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे शाळांचेही लक्ष लागलेले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App