संजय राऊतांची अटक : मराठी माध्यमांचे “भावपूर्ण” रिपोर्टिंग; जणू काही महान स्वातंत्र्य सैनिकाला अटक!!

नाशिक : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनायक अर्थात ईडीने अटक केली आहे. संजय राऊत यांना या प्रकरणात तीन वेळा ईडीने कायदेशीर नोटीसा पाठवल्यानंतर आज 31 जुलै 2022 रोजी दिवसभरात कायदेशीर कारवाई करून अटक केली आहे. मात्र या अटकेचे मराठी माध्यमांमध्ये रिपोर्टिंग पाहिले की जणू काही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एखाद्या महान स्वातंत्र्यसैनिकालाच ब्रिटिश पोलीस अटक करून घेऊन चालले आहेत… अशा थाटाचे हे “भावपूर्ण” रिपोर्टिंग आहे!!Sanjay Raut’s arrest : Marathi media’s “emotional” reporting; It’s like arresting a great freedom fighter

 संजय राऊत यांच्या कारकिर्दीचा आढावा

संजय राऊत यांच्या विषयी मराठी टीव्ही चॅनेल आणि मराठी वेब पोर्टल्स बातम्यांनी भरभरून वाहिली आहेत. संजय राऊत यांचा पत्रकार म्हणून प्रवास कसा होता?? बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध कसे होते??, साधा क्राईम रिपोर्टर ते सामनाचा कार्यकारी संपादक, दाऊद इब्राहिमशी बोललेला आणि त्याला दम भरलेला पत्रकार वगैरे मथळे देऊन मराठी माध्यमांनी संजय राऊतांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतला आहे. सर्वसामान्यपणे एखाद्या व्यक्तीच्या कायमच्या एक्झिट नंतर असा आढावा म्हणजे “ऑबीच्युअरी” देण्याची पद्धत आहे!! पण मराठी माध्यमांनी राऊतांच्या बाबतीत अपवाद करून ती त्यांच्या अटकेच्या वेळीच दिली आहे. राऊत किती दिवस आत मध्ये राहतील?

अर्थातच मराठी माध्यमांची संजय राऊत आता येत्या वर्ष – दीड वर्षात ईडीच्या कोठडीतून बाहेर येऊ शकणार नाहीत याची अनुभवाअंती खात्री पटल्यानेच हे रिपोर्टिंग झालेले दिसत आहे. इतकेच नाहीतर संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची नेमकी संपत्ती किती?, 2 रिव्हॉल्वर, दीड लाख रुपये कॅश, 39 लाखांचे दागिने वगैरे संजय राऊत यांनी जे खासदारकीच्या प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे. तेच मराठी माध्यमांच्या रिपोर्टिंग मध्ये प्रतिबिंबित झाले आहे. इतकेच नाही तर संजय राऊत यांचे त्यांच्या भांडुप मधल्या “मैत्री” इमारतीतून ईडीच्या अधिकाऱ्यांबरोबर ईडीच्या कार्यालयात जाण्याचे सगळे रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाच्या थाटात केले आहे!!

राऊतांचे कुटुंबीय भावूक

“मैत्री” इमारतीच्या फ्लॅटमधल्या खिडकीत वर्षा राऊत, संजय राऊत यांची आई आणि बहीण कशा भावूक झाल्या, त्यांनी संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात जायला कसा “भावपूर्ण” निरोप दिला याचे “भावपूर्ण” रिपोर्टिंगही मराठी माध्यमांनी केलेले दिसत आहे. शिवसेनेसाठी बलिदान द्यायला मी चाललो आहे. शिवसेनेसाठी वाटेल ते… मी अटक करून घ्यायला चाललो आहे, शिवसैनिकांची घोषणाबाजी वगैरे मथळे देऊन मराठी माध्यमांनी आपापली वेब पोर्टल सजवली आहेत.

 मराठी माध्यमांचे खरे दुखणे

मराठी माध्यमांचे खरे दुखणे याबाबत वेगळे आहे. आता दररोज सकाळी 9.00 वाजताची पत्रकार परिषद होणार नाही त्यातून स्थानिक राजकारणापासून ते जागतिक राजकारणाची “उच्च चर्चा” मराठी माध्यमांना ऐकायला मिळणार नाही. दररोजच्या रिपोर्टिंग मधला जो मोठा खड्डा पडणार आहे तो भरून कसा काढायचा??, याची चिंता “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांना लागून राहिली आहे. त्यातच शिवसेनेचे नवे प्रवक्ते म्हणजे “नवे संजय राऊत” कोण असतील?? त्या सुषमा अंधारे असतील?? की अन्य कोणी असेल?? याची देखील चर्चा शिवसेनेबरोबरच मराठी माध्यमांच्याही वर्तुळात सुरू आहे.

राऊतांचे “ग्लॅमर” अन्य कोण टिकवणार??

संजय राऊत यांनी दररोजच्या पत्रकार परिषदांमधून जे “ग्लॅमर” उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला प्राप्त करून दिले होते, ते “ग्लॅमर” सुषमा अंधारे टिकून ठेवू शकतील का? याची चिंता शिवसेनेपेक्षा “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांना भेडसावते आहे आणि त्यातूनच संजय राऊत यांच्या ईडी अटकेचे “भावपूर्ण” रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी आज करून घेतले आहे!! किंबहुना हे रिपोर्टिंग 31 जुलै 2022 रोजी दिवसभर सुरू आहे.

Sanjay Raut’s arrest  Marathi media emotional reporting It  like arresting a great freedom fighter

महत्वाच्या बातम्या