प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यासंदर्भात राऊतांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस आयुक्तांना पत्र दिले असून यामुळे राजकारण तापले आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवरून शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. Raut abuses Uddhav and Rashmi Thackeray
प्रसार माध्यमांशी बोलताना रामदास कदम यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठी आणि स्वतःची सुरक्षा वाढवण्यासाठी हे धादांत खोटे आरोप केले होते हे सिद्ध झाले आहे. संजय राऊतांना मी एवढेच सांगेन की, मी कालपर्यंत थांबलो होतो आणि गप्प बसलो होतो. कधी संजय राऊतांवर टीका केली नव्हती. पण आता पाणी डोक्यावरून जायला लागले आहे.
संजय राऊत मुळात शिवसैनिक नाही
पुढे कदम म्हणाले की, सामनाच्या संपादक पदी रश्मी ठाकरेंची नियुक्ती उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यावेळेला संजय राऊतांनी माझ्या समोर किती अश्लील भाषेत दोघांना शिव्या घातल्या होत्या, हे कदाचित ते विसरले असतील. पण मी विसरलो नाही. त्यांच्या निष्ठेच्या विष्ठा कधीच झालेल्या आहेत. मूळात ते शिवसैनिक नाहीत. हे तुम्हालाही माहितेय आणि मला माहितेय. पण आता जणू काही शिवसेना ते वाचवताय, असा अविर्भाव आणून ते देशाला आणि महाराष्ट्राला फसवताहेत.
‘शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, बाडगा अधिक कडवा असतो, तो अधिक कडवेपणा आपण दाखवत आहात. आमदारांचे भाव तुम्हीच ठरवताय. खासदारांचे भाव तुम्हीच ठरवताय. नगरसेवकांचे भाव तुम्हीच ठरवताय. शाखाप्रमुखांचे भाव तुम्ही ठरवताय. केंद्रीय निवडणूक आयोगावरती भ्रष्टाचाराचा आरोप करताय. कुठल्याही गोष्टीला एक लिमिट असते. एक मर्यादा असते, म्हणून मी कालपर्यंत थांबलो होतो. पण संजय राऊत आता अती झाले आहे. आणि अती झाल्यानंतर माती होते. त्यामुळे आपण थांबावे अशी माझी विनंती आहे. आता बाप दाखवा किंवा श्राद्ध घाला, असे आम्हालाही बोलता येते. आपण कोणाचे भक्त आहात, कोणाचे काम करताय, उद्धवजींकडे कसा दिखावा करताय, हे सगळे माहितेय, बोलायला लावू नका, असा इशारा रामदास कदमांनी राऊतांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App