उध्दव ठाकरेंची परिस्थिती पाहून वाटतेय, की त्यांच्या हातात “राज्य दिलंय” की त्यांच्यावर “राज्य आलंय”? राज ठाकरेंची खोचक टिपण्णी


विशेष प्रतिनिधी

मुंबई – “मला काल एकाने विनोद सांगितला, की ‘सध्याची उद्धव ठाकरेंची परिस्थिती पाहून त्यांच्या हातात राज्य दिलं आहे का त्यांच्यावर राज्य आलं आहे?”, असे वाटतेय, अशी खोचक राजकीय टिपण्णी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी काल झालेल्या झूम मिटिंगनंतर त्यातील मुद्द्यांचा खुलासा करण्यासाठी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी लॉकडाऊनपासून अनिल देशमुखांवरील १०० कोटींच्या खंडणीखोरीच्या आरोपांपर्यंत सर्व प्रश्नांवर भूमिका मांडली. raj thackeray targets uddhav thackeray over lockdown issue as well as takes him to stride

राज ठाकरे म्हणाले, की मुकेश अंबानींच्या घराबाहेर पोलिसांनी स्फोटके ठेवली, ती कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवली आणि का ठेवली हा मुद्दा महत्वाचा आहे. अनिल देशमुख हा मुद्दा महत्वाचा नाही. माझी माध्यमांना विनंती आहे की मूळ मुद्दा भरकटू देऊ नका. आणि परमवीर सिंग यांना १०० कोटी वसूलीच्या टार्गेटची आठवण त्यांना पोलीस आयुक्त पदावरून हटवले गेल्यावरच का झाली? आधी का नाही झाली? आणि बार आणि रेस्टोरंटकडून १०० कोटींचे टार्गेट अनिल देशमुखांकडून दिले गेले हा आरोप होणेच लांच्छनास्पद आहे, अशी टिपण्णी राज यांनी केली.

राज ठाकरे म्हणाले, की मला काल एकाने विनोद सांगितला, ‘सध्या उद्धव ठाकरेंची परिस्थिती पाहून त्यांच्या हातात राज्य दिलं आहे का त्यांच्यावर राज्य आलं आहे?,

राज ठाकरे ह्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे असे –

 • लॉकडाऊनवर मला काही सूचना करायच्या होत्या, त्यासाठी मुख्यमंत्री शउद्धव ठाकरे ह्यांची समक्ष भेट घेणार होतो पण त्यांच्या आसपास अनेकजण कोरोनाबाधित असल्यामुळे ते विलगीकरणात आहेत त्यामुळे आम्ही झूमवर संवाद साधला.
 • महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. पण याला काही कारणे आहेत. महाराष्ट्र हे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले राज्य आहे त्यामुळे बाहेरील राज्यातून मोठ्या संख्यने लोक येतात आणि ते जिथून येतात त्या राज्यांमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी आहे.
 • मागच्या लॉकडाऊनच्या वेळेला जेंव्हा परप्रांतीय कामगार निघून गेले तेव्हा मी सरकारला सूचना केली होती की हे सगळे परत येतील तेव्हा त्यांची मोजणी करा आणि कोरोना चाचण्या करा पण हे काही झाले नाही.
 • छोट्या उद्योगांनी त्यांचे उत्पादन चालू ठेवा पण त्याची विक्री होऊ नये असे सरकारचे म्हणणे आहे, पण मुळात जर विक्री होणार नसेल तर उत्पादन का करायचे? त्यामुळे आठवड्यात किमान २ ते ३ दिवस दुकानांना विक्रीची परवानगी द्यावी.
 • लॉकडाऊनच्या काळात वीजबिलं माफी द्यायला हवी कारण मुळात उत्पादन सुरु नाही, ऑफ़िस बंद आहेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशा परिस्थितीत लोकांनी भरमसाठ वीजबिले कशी भरायची?
 • बँकाकडून थकीत कर्जाच्या बाबतीत कर्जदारांकडे जो तगादा सुरू आहे त्यामुळे कर्जदार त्रस्त आहेत कारण मुळात उद्योग बंद आहेत, नोकऱ्या गेल्या आहेत अशा वेळेस जो तगादा सुरु आहे तो थांबायला हवा. ह्या सक्तीच्या वसुलीसंदर्भात बँकांशी सरकारने चर्चा करायला हवी.
 • शाळा बंद, शिक्षण ऑनलाईन पण फी कायम, असे का? शाळांची फी निम्मी करा, १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांना ह्यावर्षी उत्तीर्ण केले पाहिजे.
 • सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने हमीभाव द्यायला हवा.
 • खेळाडूंना सरावासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी आणि जिमसारख्या जागा जिथे गर्दी न होऊ देता जिममध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी द्यायला हवी.
 • अनेक खासगी रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक असून देखील कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे अशा वेळेला सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवे. रुग्णांना बेड मिळायलाच हवेत.
 • हॉस्पिटल्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी, आम्ही हॉस्पिटल्सना जबाबदारीची जाणीव करून देऊ शकतो पण आमची जाणीव करून देण्याची पद्धत वेगळी आहे आणि ही ती वेळ नाही.
 • कंत्राटी कामगारांना काढायचे पुन्हा कोरोना वाढला कि घ्यायचे ह्यापेक्षा सरकारने महापालिकांमध्ये कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घ्यायला हवे.
 • माझे पक्षातील सहकारी जमील शेख ह्यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचा पदाधिकारी नजीम मुल्ला यांचे नाव आले आहे. याच पदाधिकाऱ्याचे नाव सुरज परमार हत्या प्रकरणातही आले होते. या प्रकरणी राज्य सरकारने लक्ष घालावे.
 • राष्ट्रवादीच्या नजीम मुल्लाचे नाव आल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणाची दखल घ्यावी. असे राजरोसपणे खून पडायला लागले तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही. या संबंधी मी पवारसाहेबांची भेट घेणार आहे.

raj thackeray targets uddhav thackeray over lockdown issue as well as takes him to stride

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था