विशेष प्रतिनिधी
पुणे : वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण मोठे असते. वाईन शंभर टक्के दारूच असून, आरोग्याला अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या विरोधात विद्यार्थी, पालक, शिक्षक, महिला माता-भगिनी, सामाजिक कार्यकर्ते, साधुसंत, कीर्तनकार यांनी एकत्रित येऊन जनआंदोलन उभारण्याची गरज आहे,असे आवाहन शाकाहार व व्यसनमुक्ती चळवळीचे कार्यकर्ते सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केले. Raise a mass movement against the sale of wine from supermarkets and grocery stores Dr. Kalyan Gangwal’s appeal to the people
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने काही दिवसांपूर्वीच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्री करण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. कल्याण गंगवाल यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत निर्णयाचा निषेध केला व त्याविरोधात व्यापक चळवळ उभारण्याचे आवाहन केले.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “वाईन ही दारू नाही, हे वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने अतिशय चुकीचे आहे, हे एक डॉक्टर म्हणून नमूद करतो. सरकारमधील काही लोक निर्लज्जपणे वाईन दारू नसल्याचा चुकीचा प्रचार करत आहेत. आणखी एक दुर्दैवी योगायोग म्हणजे व्यसनमुक्तीसाठी आपली संपूर्ण हयात खर्ची घालणाऱ्या डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाच्या दिवशीच सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनविण्याच्या दिशेने केलेली वाटचाल आहे.”
सरकारकडून व्यसनाधीनतेला प्रोत्साहन
ते म्हणाले “समाजाचे आरोग्य चांगले, सदृढ, व्यसनमुक्त असावे, यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असताना सरकारकडून दारूला प्रोत्साहन दिले जात आहे, हे अतिशय गंभीर आहे. सुशांतसिंह राजपूत आणि आर्यन शाहरुख खान प्रकरणातही राज्य सरकारने अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्याना पाठीशी घालण्याचे चुकीचे काम केले आहे.
वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण भरपूर असते. हळूहळू वाईन, हार्ड ड्रिंक, दारू, अंमली पदार्थ असे त्याचे व्यसन लागू शकते. वाईन सहजपणे उपलब्ध व्हायला लागली, तर शाळकरी मुले व्यसनाच्या आहारी जातील. विक्रेत्यांकडून या किशोरवयीन मुलांना ग्राहक बनवण्याचा प्रकार वाढेल. हा प्रकार पाश्चिमात्य देशांत झाल्याचे आपल्याला दिसून येते. आणि भारताच्या दृष्टीने ही धोक्याची सूचना आहे,”
दारूने अनेक कुटुंब उद्ध्वस्त
मूठभर शेतकरी आणि सरकारमधील काही नेतेमंडळीच्या स्वार्थासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करत डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “महाराष्ट्रात गुन्हेगारीचे मूळ दारू हे आहे. ग्रामीण भागात महिलांचे, मुलांचे जीवन पर्यायाने कुटुंबे दारूने उद्ध्वस्त झालेली आपण पाहिली आहेत.
समाजाची बिघडलेली ही घडी सुधारण्यासाठी गेली अनेक वर्षे माझ्यासह डॉ. अनिल अवचट, वसुधा सरदार, बंडातात्या कराडकर महाराज, डॉ. नरेंद्र दाभोलकर आदी लोकांनी स्वतःला वाहून घेतले आहे. या नव्या निर्णयाने कामगार, कष्टकरी, तरुण वर्ग दारूच्या आहारी जाण्याची भीती आहे. सरकारने यावर त्वरित विचार करून हा निर्णय रद्द केला पाहिजे.”
व्यापक जनआंदोलन उभारणार
वाईनचा प्रचार व प्रसार राज्य सरकारने करू नये आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, यासाठी समाजाने एकत्रित येत व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज आहे. राज्यभरातील पालक, शिक्षक, माता-भगिनी, साधुसंत, कीर्तनकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी या निर्णयाचा निषेध करावा. व्यसनमुक्ती हीच खरी देशभक्ती आहे, हे आपण ध्यानात घ्यावे. येणाऱ्या पिढ्या बरबाद होण्यापासून वाचवायचे असेल, तर आज आपण याविरोधात आवाज उठवला पाहिजे. व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, असे आवाहन डॉ. गंगवाल यांनी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App