Pandharpur assembly elections 2021 results analysis : विठ्ठलाच्या पायी कडाडली वीज; ठाकरे – पवारांच्या महाविकास आघाडीच्या “खंजीर प्रयोगाला” जनतेची चपराक

विनायक ढेरे

मुंबई – महाराष्ट्रात ठाकरे – पवारांनी जनमताचा कौल डावलून एकत्र येण्याचा जो खंजीर प्रयोग केला त्याला महाराष्ट्राच्या जनतेने संधी मिळताच पहिल्याच झटक्यात सणसणीत चपराक लगावली आहे. पंढरपूरमधल्या जनतेने ही संधी साधली आहे. ही निवडणूक महाविकास आघाडीने राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढविली होती. भाजपने कमळ चिन्हावर लढविली होती.

महाराष्ट्रात तीन पक्षांनी एकत्र येऊन पंढरपूरमध्ये एकास एक उमेदवार दिलेला आहे. इथे कोणी असा माई का लाल नाही की या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करून तो निवडून येईल, अशी दर्पोक्तीची भाषा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वापरली होती. पण पंढरपूरच्या जनतेने ही भाषा महाविकास आघाडीच्याच नेत्यांच्या तोंडात परत घातली. ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना इतर पक्षांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची मस्ती आहे, त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मस्तीखोर नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम पंढरपूरच्या जनतेने करून दाखविला.

समाधान आवताडे यांची मतमोजणीच्या फेऱ्यागणिक वाढत जाणाऱ्या आघाडीचा हा अर्थ आहे. सोलापूरकरांच्या हक्काचे पाणी पळविणाऱ्या बारामतीकरांना पंढरपूरच्या जनतेने दिलेले हे उत्तर आहे. अजित पवार, जयंत पाटलांनी तळ ठोकून गावागावातील कार्यकर्ते जोडून घेण्याचा प्रयत्न करूनही फारसे काही साधले नाही. मनसे सारख्या पंढरपूरात संदर्भहीन असलेल्या पक्षाचा पाठिंबा राष्ट्रवादीने घेऊनही फारसा फरक पडला नाही. त्याच्या नुसत्या बातम्या मराठी मीडियात पेरल्या गेल्या.. की जणू काही पंढरपूरात मनसेच्या पाठिंब्याचा राष्ट्रवादीसाठी निर्णायक फरक पडणार आहे.प्रत्यक्षात जनता बाजूला नसली की काय होते, हे पंढरपूरातून महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारला ऐकविले आहे. ठाकरे – पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल नाकारून जी हातमिळवणी केली तिला जनतेने चपराक हाणली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पोकळ फेसबुक लाइव्ह, बारामतीकरांची पाण्याची पळवापळवी, उर्जामंत्र्यांचे वीजबिल माफीवरून घुमजाव हे सगळे मुद्दे महाविकास आघाडीला महागात पडले.

पंढरपूरात तोंडावर, बंगालमध्ये “नाक वर”

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या पराभवाने महाविकास आघाडी तोंडावर पडली आहे… तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या पडेल उमेदवाराबद्दल ट्विट न करता बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी विजय मिळविला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून विरोधकांचे “नाक वर” असल्याचे दाखवून दिले आहे.

शरद पवारांनी ममतांचे अभिनंदन करणारे ट्विट करताना यापुढे एकत्र येऊन जनतेसाठी काम करण्याचे त्यांना आवाहन केले आहे. यावर मराठी चॅनेलनी चर्चेचे पेव उघडून त्या ट्विटमधला राजकीय अर्थ शोधण्याचा प्रयत्न चालविला आहे.

शरद पवार हे २०२४ पूर्वी प्रादेशिक पक्षांची मोट बांधून तिसऱ्या आघाडीची रचना करणार असल्याचा जावईशोध मराठी चॅनेली पत्रकारांनी लावला आहे. त्यात त्यांनी परस्पर त्या आघाडीचे नेतृत्व ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या ममता बॅनर्जी यांना मराठी पत्रकारांनी देऊनही टाकले आहे.

पण पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीने एकत्र येऊन दिलेल्या उमेदवाराचा दणकून पराभव झाल्याबद्दल जपून जपून बोलायला सुरूवात केली आहे किंवा त्यावर बोलायचे टाळत तरी आहेत. उलट ममता बॅनर्जी यांच्या विजयाबद्दल राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते तावातावाने सोशल मीडियावरील चर्चेत व्यक्त होताना दिसत आहेत. शरद पवारांच्या ट्विटनंतर तर त्यांचा जोर वाढला आहे. ममतांचा विजय जणू आपलाच आहे, अशा थाटात ते सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

Pandharpur assembly elections 2021 results analysis; people rejects thackeray – pawar backstabbing of maharashtra mandate

महत्त्वाच्या बातम्या