मराठा आंदोलनातून political space शोधण्याचा सर्वपक्षीय नेत्यांचा प्रयत्न; लोकप्रतिनिधी बोलतील जरूर, पण त्याप्रमाणे वागतील का…??

विनायक ढेरे


नाशिक : बिगर राजकीय मराठा मोर्चे काढून झाल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाने आता राजकीय वळण घेतले असताना या आंदोलनात प्रत्येक पक्षाचे नेते आपापली political space शोधताना दिसत आहेत. राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे यांनी या मूक आंदोलनात पुढाकार घेतल्याने त्यांचा स्वतःची political space शोधण्याचा प्रयत्न प्रकर्षाने दिसून येत आहे. Maratha agitaiton in kolhapur; leaders are in search of their own political space

आणि जर संभाजीराजे यामध्ये मागे राहाणार नसतील, तर आपणही मागे राहून चालणार नाही, याचा विचार करूनच कोल्हापूरातील सर्वपक्षीय नेते मराठा मूक आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत.

भले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांतदादा पाटील आणि संभाजीराजे हे एकमेकांवर टीका करताना दिसत असतील, पण त्याचवेळी संभाजीराजे हे फक्त चंद्रकांतदादांना टार्गेट करताना दिसत आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जपून बोलताना दिसतात, तर संभाजीराजेंवर तोंडी टीका, पण पाठिंब्याचे लेखी पत्र, असा पवित्रा चंद्रकांतदादा पाटलांनी घेतला आहे. ते पत्र संभाजीराजे यांनी स्वीकारले आहे, यातच सगळे आले.संभाजीराजे यांची राष्ट्रपतीनियुक्त खासदारकीची मुदत येत्या काही महिन्यांमध्ये संपल्यानंतर त्यांची पुढची राजकीय वाटचाल या मराठा आंदोलनातून ठरविण्याचा त्यांचा मनसूबा दिसतो आहे. त्यांनी आपले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर उत्तम संबंध असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्याचवेळी प्रकाश आंबेडकर देखील बरोबर आल्याचे समाधान व्यक्त केले आहे. यातून त्यांचे राजकीय कौशल्य दिसते. पण त्यांनी पक्ष म्हणून भाजपशी जवळीक कमी केल्याचेही स्पष्ट झाले आहे.

पुढची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकीटावर कोल्हापूरातून लढवायची, असा संभाजीराजेंचा मनसूबा दिसतोय, तर प्रकाश आंबेडकरांचाही १९९८ प्रमाणे शरद पवारांशी जुळवून घेऊन अकोल्याची खासदारकी आपल्या पदरात पाडून घेण्याचा मनसूबा दिसतोय. त्यासाठी संभाजीराजे हे प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यात राजकीय पूल म्हणून काम करू शकतात. त्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर हे आजच्या आंदोलनात सामील झालेले दिसतात.

ठाकरे – पवार सरकारमधले मंत्री सतेज पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांचा राजकीय होरा यापेक्षा वेगळा नाही. त्यांनाही मराठा आंदोलनातून आपला स्वतःचा राजकीय वाटा सुनिश्चित करून घ्यायचा आहे.

मराठा मूक मोर्चे काढून मराठा समाज बोलला. आता लोकप्रतिनिधींनी बोलावे, ही संभाजीराजेंची भूमिका आहे. त्याला आजच्या आंदोलनात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी हजेरी लावून एक प्रकारे प्रतिसादच दिलेला आहे. पण लोकप्रतिनिधी नुसते बोलतील, पण पुढे करणार काय हा खरा प्रश्न आहे. कारण आज कोल्हापूरचे स्थानिक सर्वपक्षीय प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले आहेत. पण त्या पक्षांचे मुंबईत मातोश्रीवर, सिल्वर ओकवर आणि दिल्लीत ७ लोककल्याण मार्गावर बसणारे आणि निर्णय घेणारे नेते देखील लोकप्रतिनिधीच आहेत. ते बोलतील का… आणि बोलल्याप्रमाणे करतील का…?? हा खरा प्रश्न आहे…!!

Maratha agitaiton in kolhapur; leaders are in search of their own political space

महत्त्वाच्या बातम्या