प्रतिनिधी
मुंबई : भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांचे ऐक्य साधण्याची सुरुवात करत तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांचे सरकारी अधिकृत निवासस्थान “वर्षा”वर भेट घेतली. दोघांची दोन तासांहून अधिक खलबते झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत के. चंद्रशेखर राव यांनी काँग्रेसच्या मुद्द्यावर थेट भाष्य करण्याचे टाळले.KCR refrained from commenting on Congress
केंद्र सरकार विरोधात सर्व प्रादेशिक पक्षांची एकजूट करण्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्रातून प्रेरणा घेऊन आम्ही पुढे जाऊ, असे वक्तव्य चंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. या वक्तव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुजोरा दिला आहे.
मात्र पत्रकार परिषदेत थोडक्यातल्या निवेदनानंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी प्रश्नोत्तर घेण्याचे देखील टाळल्याचे दिसले. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी दीड ते दोन मिनिटांमध्ये आपले निवेदन संपवले. यावेळी त्यांच्या समवेत खासदार संजय राऊत, महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे, के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता हे उपस्थित होते.
यावेळी चंद्रशेखर राव यांना उद्धव ठाकरे यांनी दुपारच्या भोजनासाठी निमंत्रित केले होते. या भोजना दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाली. केंद्र सरकारच्या तपास एजन्सी सुडाचे राजकारण करत आहेत. देशाचा कारभार दूर राहिला पण विरोधी पक्षांच्या नेत्यांना अडकवण्याचे काम केले जात आहे. हे आमचे हिंदुत्व नाही,
असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मात्र दोन्ही नेत्यांनी काँग्रेसच्या मुद्द्यावर भाष्य करण्यास करण्याचे टाळले. देशभरात प्रादेशिक पक्षांचे जसे मुख्यमंत्री कारभार पाहत आहेत. तसेच काँग्रेसचे देखील मुख्यमंत्री कारभार पाहत आहेत. काँग्रेसला वगळून कोणती आघाडी करणार का? या प्रश्नावर काँग्रेसचे नाव न घेता सर्व नेत्यांशी चर्चा करू, एवढेच मोघम उत्तर चंद्रशेखर राव यांनी दिले आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App