प्रतिनिधी
मुंबई : ग्रीन रिफायनरी प्रकल्प कोकणातील नाणार ऐवजी बारसू मध्ये घ्यावा, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. या प्रस्तावाबद्दल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संशय व्यक्त केला असून राजापूर परिसरात आधीच जमिनींचे काही व्यवहार झाले आहेत. त्या व्यवहारांमध्ये शिवसेनेचा हात आहे. त्यामुळेच बारसू परिसरात ग्रीन रिफायनरी प्रकल्प न्यावा असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी दिला आहे, असा संशय आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात लवकरच पेनड्राईव्ह स्वरूपातले पुरावे सादर करणार असल्याचे नितेश राणे म्हणाले आहेत.Green Refinery Shiv Sena’s hand in land transaction in Rajapur area
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेनड्राईव्हच्या माध्यमातून ठाकरे सरकारला हादरे दिले आहेत. त्याच वेळी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत दिशा सालियन प्रकरणी पेनड्राईव्ह काढून ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा इशारा दिला आहे. आता राणे यांनी नाणार रिफायनरी प्रकरणी ठाकरे सरकारच्या कारभारात गौडबंगाल सुरू आहे. त्याचा पर्दाफाश पेनड्राईव्हद्वारे करण्याचा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राणे चर्चेत आले आहेत.
राजापूर परिसरात जमिनींचे व्यवहार
रत्नागिरीतील नाणार येथे प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्प आता राजापूर तालुक्यातच असलेल्या बारसू गाव परिसरात उभारण्यास राज्य सरकार विचार करत आहे. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारला कळवले आहे. ज्या अर्थी बारसू येथे हा प्रस्ताव दिला जात आहे, त्या अर्थी यामागे काहीतरी कारणे असतील. यापूर्वी देखील राजापूर परिसरात मोठ्या प्रमाणात जागेचे व्यवहार झाले आहेत. त्याचे लागेबांधे शिवसेनेशी होते. ज्या अर्थी ते बारसू भागात प्रस्ताव देत आहेत, त्या अर्थी काही तरी गौडबंगाल आहे, असा सनसनाटी आरोप करत लवकरच या संदर्भात पेनड्राइव्ह देऊ, असा इशारा आमदार राणे यांनी दिला आहे.
वाद नसलेल्या जागी प्रकल्प व्हावा
आमदार नितेश राणे याप्रकरणी बोलताना म्हणाले, या प्रकरणात आम्ही खोलात जाऊन अभ्यास करू. त्यांनी उगाच सचिन वाझे याचे कौतुक केले नव्हते. ज्या अर्थी त्यांनी पत्र लिहिले आहे, त्या अर्थी त्यामागे काहीतरी कारणे असतील, असे म्हणत आमदार राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे. रिफायनरीबाबत शिवसेनेचे भूमिका नेहमी बदलत असते. पहिल्यांदा विरोध करायचा, लोकांची माथी भडकवायची आणि मग त्यानंतर समर्थन जाहीर करायचे ही शिवसेनेची जुनी भूमिका असल्याचे राणे म्हणाले.
आताही मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे आणि त्यांनी जी जागा देऊ केली आहे तिच्यातून नाणार आणि वादातील गावे नकाशात वगळलेली आहेत. त्या जुन्या जागांमधील वगळलेली गावे बाजूला ठेवून आणि नवीन जागा एकत्र मिळून रिफायनरीचा प्रकल्प करावा, असे आमचे म्हणणे आहे. आमचे हे म्हणणे आम्ही प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला जाऊन केंद्र सरकारला कळवणार आहोत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पेट्रोलियम खात्याच्या मंत्र्यांची भेट घेऊन जेथे वाद नाही, जेथे जमीन ताब्यात घेण्यात आलेली आहे तेथे ग्रीन रिफायनरी कोकणात करावी, अशी विनंती आम्ही करणार असल्याचे राणे म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App