महाराष्ट्रात कोरोना फैलावाची परिस्थिती गंभीर; संपूर्ण लॉकडाऊनचा एक – दोन दिवसांत निर्णय; मुख्यमंत्र्यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना फैलावाची स्थिती गंभीर आहे. एक – दोन दिवस मी परिस्थिती पाहीन आणि मग संपूर्ण लॉकडाऊन करायचे की नाही, याचा विचार करीन, असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला दिला. CM uddhav thackeray warns complete lockdown within two – three days

मुख्यमंत्री म्हणाले…

 • राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तसेच, मृतांच्या आकड्यात देखील वाढ झाली असल्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनासाठी देखील ही चिंतेची बाब ठरली आहे.
 • मी म्हणालो होतो की परिस्थिती अशीच राहिली, तर आपल्याला लॉकडाऊन लागू करावं लागतोय की काय, अशी शक्यता होती. ती परिस्थिती आजही कायम आहे. मधल्या काळात आपण शिथिल झालो, लग्नसमारंभ, पार्ट्या, राजकीय मोर्चे, आंदोलनं सुरू झाले. करोना गेला, अशा रितीने सगळं सुरू होतं. दुर्दैवाने जी भिती सगळे तज्ज्ञ व्यक्त करत होते, ती खरी ठरली.
 • मार्चमध्ये गेल्या वेळेपेक्षाही आक्राळ विक्राळ रुप धारण करून कोरोना आलाय. हा विषाणू आपली परीक्षा बघतोय. आपल्याला धैर्याने एकत्र लढण्याची गरज आहे. काही कडक निर्बंध येत्या काही दिवसांत लावावे लागतील. ते उद्या किंवा परवा जाहीर होतील. कार्यालयांना याआधीच सूचना दिल्या आहेत. काही नियम आधीच लागू आहेत. सगळ्या ट्रेन तुडुंब भरून चालल्या आहेत. रोजगार परत मिळतील, पण जीव परत मिळणार नाही.
 • आज मी संपूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण लॉकडाऊन लागू करत नाहीये. पण दोन दिवसांत मला दृश्य स्वरूपात फरक दिसला नाही, आणि ज्यांच्याशी मी बोलतोय, त्यांच्याकडून वेगळा पर्याय दिसला नाही, तर जगात ज्या प्रमाणे लॉकडाऊनचे टप्पे जाहीर केले जातात, तसे करावे लागतील.
 • आपण काहीही लपवले नाही आणि लपवणार नाही. म्हणून आपण सत्य परिस्थिती सगळ्यांसमोर ठेवतो. दुसरीकडे काय झालं, फक्त महाराष्ट्रात कसे वाढतात? यावर मला बोलायचं नाही. मला कुणी व्हिलन ठरवलं, तरी मी माझी जबाबदारी पार पाडेन.
 • लॉकडाऊनचा उपयोग संसर्ग थांबवण्यासाठी आणि आपली आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आहे. रुग्णवाढ ही सध्या झपाट्याने होत आहे. राज्यात १७ सप्टेंबर २०२० रोजी ३ लाख सक्रिय रुग्ण होते. १ एप्रिलला त्यात भर पडली आहे. तेव्हा ३१ हजार मृत्यू होते. आता ५४ हजार ९०० च्या आसपास रुग्ण झाले आहेत. तेव्हा एका दिवशी २४ हजार रुग्ण आढळले होते. १ एप्रिलला ४३ हजारहून जास्त रुग्ण आढळले आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली, तर १५ ते २० दिवसांत आपल्याकडच्या आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागतील. त्याही वाढवण्याचे आदेश दिले आहेत. पण बेड वाढले, व्हेंटिलेटर्स वाढले, आयसीयुचे बेड वाढले, तरी डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी कसे वाढणार? हाच खरा चिंतेचा विषय आहे.
 • डॉक्टर, नर्स, कर्मचारी आपल्यासारखेच माणसं आहेत. ते आजारी पडले. त्यानंतर निगेटिव्ह झाल्यानंतर पुन्हा करोना रुग्णांच्या सेवेत येत आहेत. टेस्टिंग करण्यासाठी घराघरात जाऊन आपलेच बंधू-भगिनी अथकपणे काम करत आहेत. त्यांना आपण दिलासा देणार आहोत की नाही?
 • कालच्या दिवसात महाराष्ट्रात ३ लाख नागरिकांना लसीकरण केलं आहे. देशात एकाच दिवशी होणाऱ्या लसीकरणाचा हा सर्वाधिक आकडा आहे. आत्तापर्यंत आपल्या ६५ लाख नागरिकांना लसीकरण केलं आहे. आपल्या क्षमतेनुसार लशींचा पुरवठा होत नाहीये. ती मागणी मान्यही होईल.
 • अमेरिकेने लॉकडाऊनचा ७ कलमी कार्यक्रम जाहीर केलाय. राजकारणापेक्षा जीव महत्वाचा असं आवाहन केलंय. आपल्याकडच्या राजकीय पक्षांनी देखील त्यांचं नाही, पण मी केलेलं आवाहन तरी मानावं. त्यात राजकारण करण्याचं कारण नाही. 

तज्ज्ञ सल्लागार तयार झालेत

“आपण कात्रीत सापडलो आहोत. अर्थचक्र चालवायचंय, तर अनर्थ ओढवतोय. अनर्थ टाळायचा, तर अर्थचक्र थांबतंय. मधल्या काळात अनेक तज्ज्ञ सल्ले देत आहेत. सर्वसामान्यांना त्रास होईल, अशी लॉकडाऊनची भूमिका आम्ही खपवून घेणार नाही. तुम्हाला आलेला झटका हा नियम नको. करोनाच्या संसर्गाला लॉकडाऊन पर्याय नाही. हिटरलसारखे वागू नका. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय असू शकत नाही. लॉकडाऊन लावायचा तर रोजगाराचे पैसे थेट खात्यात जमा करा. एका उद्योगपतीने सांगितलं की लॉकडाऊनऐवजी आरोग्यव्यवस्था वाढवा. मी ते सगळं करतो, पण किमान रोज ५० डॉक्टर, कर्मचारी यांचा पुरवठा महाराष्ट्रात होईल, याची सोय करा. फक्त फर्निचरचं दुकान म्हणजे हॉस्पिटल होत नाही.

CM uddhav thackeray warns complete lockdown within two – three days

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*