नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी भाकरी फिरवून खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष पदाबरोबरच महाराष्ट्राचे प्रभारी पद सोपविल्यानंतर पक्षात दुसऱ्या फळीतले नेते प्रचंड अस्वस्थ झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातूनच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आता विरोधी पक्ष नेते पद नको. त्याऐवजी पक्ष संघटनेतले पद द्या, अशी मागणी केल्यानंतर पक्षातल्याच दुसऱ्या फळीतल्या अनेक नेत्यांच्या अस्वस्थतेला तोंड फुटले आहे.Chagan bhujbal played obc card against ajit pawar, but who really is behind the demand??
अजितदादांनी संघटनेतले पद मागितले याचा अर्थ त्यांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर डोळा आहे, असे गृहीत धरून राष्ट्रवादीतले ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी कार्ड पुढे केले आहे. राष्ट्रवादीने ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी करून अजितदादांच्या मागणीला “खो” घालण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यामुळेच छगन भुजबळांचा ओबीसी कार्ड पुढे करण्यातला बोलविता धनी नेमका कोण आहे??, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शरद पवारांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष पदाबरोबरच महाराष्ट्राचे प्रभारी पद दिल्याने महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या तिकीट वाटपात त्यांचेच वर्चस्व निर्माण होणार हे पाहून अजितदादांनी वेळीच सावध होत विरोधी पक्ष नेते पदाऐवजी संघटनेतले पद मागून पक्ष चालवायची परवानगी मागितली. सुप्रिया सुळे यांच्याकडे तिकीट वाटपाची सूत्र गेल्यावर आपल्या गटातल्या माणसांची तिकिटे परस्पर कापण्याची भीती अजितदादांना वाटली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर ज्यावेळी अजितदादांनी संघटनेतले मोठे पद मागितले, त्याच्या दुसऱ्या दिवशी छगन भुजबळांनी ओबीसी नेता म्हणून स्वतःचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी पुढे केले आणि आपल्याबरोबर धनंजय मुंडे, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड यांची देखील नावे घेतली. यापैकी सुनील तटकरे पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार झाले आहेत, तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे अन्य काही राज्यांची जबाबदारी शरद पवारांनी सोपवली आहे. छगन भुजबळ त्या अर्थाने रिकामे आहेत. त्यामुळेच भुजबळांनी स्वतःची राजकीय सोय लावून घेण्यासाठी उघडपणे प्रदेशाध्यक्षपदाची मागणी केल्याचे बोलले जात आहे.
छगन भुजबळ हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. पण ते फक्त चारच महिने. हे त्यांनी स्वतःच आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांना राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री पदाची देखील संधी दिली होती.
पण त्याही पलीकडे जाऊन अजितदादांनी ज्या दिवशी विरोधी पक्षनेते पद सोडून पक्ष संघटनेच्या पदाची मागणी केली, नेमक्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी भुजबळ यांनी ओबीसी कार्ड पुढे करण्यामागे नेमका बोलवता धनी कोण आहे??, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण अजितदादांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या रिंग मध्ये आपली हॅट टाकल्यावर दुसऱ्या फळीतले नेते तर अस्वस्थ झाले आहेतच, पण त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाच्या प्रभारी म्हणून पक्ष संघटनेची संपूर्ण सूत्रे हाती येण्यापूर्वीच अजितदादा जर पुढे सरकत असतील, तर बाकीचे सगळेच मागे पडतील ही भीती छगन भुजबळ यांना वाटली की काय?? किंवा अजितदादांना परस्पर काटशह देण्यासाठीच भुजबळांना कोणीतरी ओबीसी कार्ड पुढे करण्याचे सुचवले आहे का??, अशा शंका राजकीय वर्तुळातून विचारण्यात येत आहे.
भुजबळांच्या ओबीसी कार्ड पुढे करण्यातून अजित पवार यांच्या ऐवजी नवखा ओबीसी नेता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी बसविणे हे सुप्रिया सुळे यांचे महाराष्ट्रात निर्विघ्नपणे राजकीय बस्तान बसवण्यासारखेच आहे. तसे करण्यासाठीच राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी छगन भुजबळ यांना ओबीसी कार्ड पुढे करायला सुचित केले आहे का??, अशी देखील राष्ट्रवादीच्या वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App