भुजबळ साहेब, शिकायला या अथवा कोणालाही पाठवा, विनामूल्य शिकवू!!; नाशिकच्या पुरोहिताचे नम्र आवाहन!!


नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोल्हापूरमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प मेळाव्यात ब्राह्मण समाजाला मंदिरात 100 % आरक्षण आहे, असा दावा केला होता. त्याच वेळी त्यांनी ब्राह्मण समाजाचा पौरोहित्य हा धंदा आहे. धर्म नाही, असे विधान केले होते. पण पौरोहित्य फक्त ब्राह्मणांकडेच असते असे नाही, तर विविध समाजांकडे असते याचा विविध मंदिरांमधला पुरोहितांचा आढावा घेत भुजबळांच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचा प्रतिवाद करणारे नाशिक जिल्ह्यातील पुरोहित हे श्री. मुकुंद खोचे यांचे हे पत्र. Bhujbal Saheb, come to learn or send anyone, teach for free !!; Humble appeal of Nashik priest !!


।।जाहीर नम्र आवाहन।।

आदरणीय भुजबळ साहेब,

नमस्कार !

आपण आमचे पालक मंत्री म्हणून “आदरणीय” म्हणालो ! असो !
आपण कोल्हापूर येथील जाहीर सभेत जे काही बोलतात त्याचा प्रतिवाद करणार नाही !
आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण म्हणालात त्या प्रमाणे मंदिरात आमचेच १००% आरक्षण का ?

मंदिरात केवळ ब्राह्मण पूजा करीत नाहीत तर महाराष्ट्रात श्री क्षेत्र माहूर येथे भोपी, कैकाडी समाजातील त्यांचेच पुरोहित किंवा कोल्हापुरातील आणि तुळजापूर श्री भवानी मातेच्या मंदीरातील मराठा समाजातील पुजारी जेजुरीतील मंदीरात त्या – त्या समाजातील पुजारी ,श्रीक्षेत्र पंढरपूर तेथील श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मंदीरातील पुजारी , ओबीसी समाजातील गुरव, आदिवासीतील देवऋषी, भटक्या विमुक्त समाजातील नामजोशी, नंदीबैलवाले जोशी, पोपटवाले जोशी, कंदिलवाले जोशी, सुवर्णकार समाजातील दैवज्ञ सुवर्णकार हे सगळेच पूजा करतात! आता सांगा यात आरक्षण कुठे आहे? कुठल्या ब्राह्मणाने अडविले आहे?

गंगापूर नासिक येथील बालाजी मंदिर येथे गेल्या दहा वर्षांपासून पूजा प्रशिक्षण वर्ग चालतो. श्रीक्षेत्र पैठण, श्रीक्षेत्र साताऱ्यात सज्जन गड येथे, सोलापूर जिल्ह्यात, कोल्हापूर येथील श्रीक्षेत्र कणेरी मठ येथे आज पावेतो ७५० ते ८०० विद्यार्थ्यानी पूजा प्रशिक्षण घेतले असून ते ढोर, मातंग, मोची, लमाण, पारधी, फासे पारधी, कैकाडी, लिंगायत, हिंदू कोकणा, आदिवासी, आगरी अशा अनेक समाजातील लोक विद्यार्जन करुन गेलेत. त्यांना शिकविणारे ब्राह्मणच आहेत! आता सांगा आरक्षण कुठे आहे ?परमादरणीय संत स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या प्रयत्नातून तसेच प्रसिद्ध उद्योजक आदरणीय किसनलालजी सारडा यांचे प्रयत्नातून समाजातील सर्व जातींसाठी सर्व स्री पुरुषांसाठी वेदविद्या शिकविण्यात येते. रत्नागिरीत सुद्धा अशी पाठशाळा आहे!
संत समाजात ब्राह्मण सोडून इतरही समाजातील सर्व आदरणीय संत आहेत. सद्गुरु जनार्दनस्वामी, त्यांचे शिष्य संत माधवगिरीजी, संतोषगिरीजी, वेरुळच्या आश्रमातचे शांतीगिरीजी दिंडोरीचे स्वामीसमर्थ केंद्राचे प्रमुख आदरणीय श्री. अण्णासाहेब मोरे, आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद महाराज, सोमेश्वरानंद महाराज, फरशीवाले बाबा इतकेच काय महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत नरेंद्र महाराज, दिवंगत भैय्युजी महाराज अशी कितीतरी तरी नावे सहज उपलब्ध आहेत. हे सगळेच आदरणीय आहेत. म्हणजे इथेही आरक्षण नाही! आता सांगा आपला त्रागा कशासाठी ?

धर्म किंवा धंदा याचा शास्रार्थ करण्यासाठी किमान काही पातळीवरचे अध्ययन असावे लागते ते माझ्याकडे नाही म्हणून त्यावर माझी माघार! असो!

जसे आपण ब्राह्मणांना टोचले तसे या पैकी एखाद्याच संताला आपला स्पर्श का करुन पहात नाही? एकदा पहा तर खरे! असो!

मूळ विषयावर येऊ या! आपणास पौरोहित्य शिकायचे असल्यास आपण अवश्य यावे किंवा आपण सांगाल त्या विद्यार्थ्यांकडून आम्ही अभ्यास करुन घेऊ! फक्त शिष्य या नात्याने अंगी नम्रता व व्रत नियमाचे पालन करावे ही अपेक्षा! कोणतीही “फी ” आकारणार नाही! कारण तशी पद्धतच नाही फी घेऊन शिकविण्याची!

पहिली सत्यनारायणाची पूजा आदरणीय पवार साहेब किंवा आव्हाड साहेब यांचे कडे करु यात ! “…समर्पयामि ।” सारखी चूक कोणी काढणार नाही याची काळजी आपण घेऊ यातच !

कृपया मी कोणताच राग किंवा द्वेषभाव मनात न ठेवता {तशी माझी हिंमत किंवा धैर्य ही नाही!} आपल्या मनातील शल्य दूर होऊन हिंदू समाजात एकी व्हावी म्हणून आपणापुढे प्रस्ताव ठेवीत आहे !

ता. क.
साहेब! मी खूप घाबरलोच आहे. आपले समर्थक मला किंवा माझ्या परिवाराला त्रास तर देणार नाहीत ना ? काही चुकले आहे, असे वाटल्यास क्षमाप्रार्थी!

– मुकुंद खोचे

Bhujbal Saheb, come to learn or send anyone, teach for free !!; Humble appeal of Nashik priest !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”