प्रतिनिधी
मुंबई : देशात शरद पवारांच्या तोडीचा नेता नाही, असे आपण म्हणतो. पण पवारांना महाराष्ट्रात एकमुखाने जनतेचा पाठिंबा मिळवत बहुमताची सत्ता स्थापन करता आलेली नाही, अशी खंत दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केली होती. त्यावर पवार शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वळसे पाटलांवर टीकेची जोड उठवली. वळसे पाटलांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा केला, पण आता अजित पवार स्वतः वळसे पाटलांच्या “त्या” वक्तव्याला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले आहेत. Ajit pawar NCP support for Walse Patil statement
शरद पवारांना महाराष्ट्रात एकमुखाने पाठिंबा मिळून आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामागच्या कारणांची चर्चा आजही अनुत्तरीत आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट दिलीप वळसे पाटील यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला आहे.
काल (20 ऑगस्ट) वळसे पाटील यांनी मंचर येथील एका मेळाव्यात बोलताना, “शरद पवार यांना आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही, असे वक्तव्य केले होते. आपल्याकडे शरद पवार यांच्यासारखे उत्तुंग नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात, नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते. देशात शरद पवार यांच्या उंचीचा नेता कोणीही नाही. पण, महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना बहुमत दिले नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या”, असे ते म्हणाले होते.
वळसे पाटील यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीतील शरद पवार गट आक्रमक झाला. शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनी वळसे पाटील यांना कृतघ्न म्हटले. कार्यकर्त्यांनी तर मंचर आणि मुंबई येथे वळसे पाटलांच्या विरोधात आंदोलन केले. या टिकेनंतर आज ट्विटरच्या माध्यमातून वळसे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले.
मात्र यानंतरही आता अजित पवार यांचा गट वळसे पाटील यांच्या पाठिशी उभा राहिला आहे. अजित पवार गटाने काही दिवसांपूर्वीच नवीन अधिकृत ट्विटर अकाऊंट उघडले आहे. त्यावरून, नामदार दिलीप वळसे पाटील यांनी गैरसमजाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. विधानाबद्दल नाही. विधानावर ते ठाम आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांना महाराष्ट्रात एकमुखाने पाठिंबा मिळून आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामागच्या कारणांची चर्चा आजही अनुत्तरीत आहे, असे स्पष्ट म्हटले आहे.
याचाच अर्थ या दोन्ही गटातील वाद लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. शरद पवार यांच्यावर व्यैयक्तिक हल्ले करण्यासहित अजित पवार गट मागे-पुढे पाहणार नसल्याचे पक्षाच्या आजच्या ट्विटमधून दिसून येते. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ही अजित पवार यांचीच भूमिका आहे हे देखील तितकेच स्पष्ट आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App