अजितदादांना नकोय विरोधी पक्ष नेतेपद; हवे राष्ट्रवादीतले संघटनात्मक मोठे पद; पण का??, नेमके राजकीय रहस्य काय??

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्या समोरचाच मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात विरोधी पक्ष नेते पद आता नको असल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे पद, तेही संघटनात्मक पातळीवरचे पद मागितले. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात कधीच स्वबळावर सत्ता मिळवू शकली नाही, अशी खंत अजितदादांनी शरद पवार यांच्या समोरच बोलून दाखवली आणि शरद पवारांच्या नेतृत्वाची तुलना त्यांनी अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जी यांच्याशी केली. या दोन्ही नेत्यांनी आपापल्या राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता आणून दाखवली. केजरीवाल यांनी तर दोन राज्यात सत्ता आणली, असे सांगून अजितदादांनी शरद पवारांनाच एक प्रकारे डिवचले!! Ajit Dada does not want the post of Leader of the Opposition; Wanted senior organizational position in NCP; But why?

 प्रदेशाध्यक्ष पदाची चर्चा

पण त्या पलीकडे जाऊन अजितदादांनी विरोधी पक्षनेतेपद आता नको, त्या ऐवजी भाकरी फिरवून महाराष्ट्रातले राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटनेतले पद द्यावे, अशी मागणी केली. अर्थातच ही मागणी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची असल्याची चर्चा प्रसार माध्यमांनी सुरू केली. जयंत पाटलांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद संभाळून पाच वर्ष एक महिना झाला आहे. पक्ष घटनेनुसार राष्ट्रवादीत ते तीनच वर्ष प्रदेशाध्यक्षपदी बसायला हवे होते. पण शरद पवारांच्या मर्जीमुळे ते आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आता त्यांच्या जागी अजित पवारांची चर्चा माध्यमांनी सुरू केली आहे.

सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्राची जबाबदारी

पण अजित पवारांनी आत्ताच नेमके राष्ट्रवादीतल्या संघटनात्मक पदाची मागणी करण्याचे खरे कारण काय आहे??, याचे राजकीय रहस्य कशात दडले आहे??, याचा बारकाईने शोध घेतला तर, काही बाबी समोर येतात. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात राजधानी नवी दिल्लीत खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. त्याच वेळी सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्रातील संघटनेची जबाबदारी सोपवली आणि हाच इथे नेमका अजितदादांसाठी राजकीय दृष्ट्या कळीचा मुद्दा आहे.

तिकीट वाटपात अजितदादा समर्थकांचा पत्ता कट??

आत्तापर्यंत अजितदादा महाराष्ट्रात कोणत्याही पदावर असले तरी ते नेहमीच शरद पवारांनंतर दोन नंबरचे नेते मानले गेले ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र पातळीवर संघटना असो अथवा राष्ट्रवादी काँग्रेसचे वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये तिकीट वाटप असो, अजितदादांची त्यावर अमिट छाप राहिली. किंबहुना अजितदादांचा स्वतःचा असा बळकट गट तयार होण्याइतपत त्यांचा तिकीट वाटपात प्रभाव राहिला. त्यामुळेच शरद पवारांनी सावध भूमिका घेत सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्याबरोबरच महाराष्ट्राचे प्रभारी पदही सोपविले. याचा अर्थ आगामी महापालिका लोकसभा आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीतल्या तिकीट वाटपाची सूत्रे सुप्रिया सुळे यांच्या हाती जाण्याची दाट शक्यता आहे. याचा पुढचा अर्थ सुप्रिया सुळे स्वतःच्या मर्जीतल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तिकीट वाटप करू शकतात. यात अजितदादा समर्थकांचे अनेक पत्ते परस्पर कट होऊ शकतात आणि हा अजितदादांच्या राजकीय भवितव्याला खऱ्या अर्थाने धोका आहे!!

https://youtu.be/CILI6WkeDLs

अजितदादा वेळीच सावध

अजितदादा सध्या तरी विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांच्याकडे आत्ता संघटनात्मक पातळीवर कोणतीही जबाबदारी पवारांनी सोपवलेली नाही. अशा स्थितीत विरोधी पक्षनेते या एकमेव पदावर अजितदादा राहिले, तर तिकीट वाटपात त्यांना खऱ्या अर्थाने कितपत संधी मिळू शकेल?? असा संशय अथवा भीती त्यांना वाटत असेल तर त्यात राजकीयदृष्ट्या गैर मानता येणार नाही. उलट अजितदादा अधिक सावध आहेत, असेच मानावे लागेल. म्हणूनच या सावधानतेतून अजितदादांनी विरोधी पक्ष नेते पद नको पण संघटनेत मग पातळीवरचे महत्त्वाचे पद द्या. मग पक्ष कसा चालवायचा ते बघतो, असे जाहीरपणे उद्गार काढले आहेत.

अजितदादांची इच्छा पवार पूर्ण करतील??

आता शरद पवार भाकरी फिरवण्यात किती माहीर आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे अजितदादांच्या मागणीनुसार ते महाराष्ट्रातली भाकरी फिरवून अजितदादांच्या त्यांच्या अपेक्षेनुसार राष्ट्रवादीतले संघटनात्मक पद देणार का??, ते पद दिले तरी त्या पदाला साजेसे असणारे पूर्ण स्वातंत्र्य अजितदादांना देणार का??, हाही तितकाच कळीचा मुद्दा आहे. पण शरद पवार अजितदादांची ही इच्छा पूर्ण करोत अथवा न करोत, अजितदादांनी वेळीच राष्ट्रवादीतला महाराष्ट्रातला संभाव्य राजकीय धोका ओळखला आहे आणि त्यातूनच विरोधी पक्षनेते पद नको. संघटनेतले पद हवे अशी मागणी केली आहे, एवढे मात्र निश्चितपणे म्हणता येईल!!

Ajit Dada does not want the post of Leader of the Opposition; Wanted senior organizational position in NCP; But why?

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात