विशेष प्रतिनिधी
1980 यशवंतराव चव्हाण, 2023 : शरद पवार राजकीय कोंडी समान, पण निर्णय काय??, हे शीर्षक देण्याचे कारण खरंच तसे घडले आहे. 1980 मध्ये यशवंतराव चव्हाण यांची जी राजकीय कोंडी झाली होती, तीच राजकीय कोंडी 2023 मध्ये शरद पवारांची झाली आहे. खरेतर महाराष्ट्राच्या या दोन बड्या राजकीय नेत्यांच्या राजकीय कर्तृत्वाची ही मर्यादा आहे!! Y. B. Chavan bowed infront of indira Gandhi in 1980, sharad Pawar has options now in 2023 to bow before Narendra modi
पण 1980 मध्ये यशवंतराव चव्हाण आपण राजकारणाच्या मुख्य प्रवाहात जातो आहोत, असे सांगून इंदिरा काँग्रेसमध्ये निघून गेले आणि 1984 पर्यंत म्हणजेच आपल्या निधनापर्यंत ते इंदिरा काँग्रेसमध्येच राहिले. तसाच पर्याय 2023 मध्ये शरद पवारांपुढे देशाच्या राजकारणात मुख्य प्रवाहात येण्याचा म्हणजे भाजप बरोबर येण्याचा उपलब्ध आहे.
1980 यशवंतरावांची कोंडी
1980 मध्ये यशवंतराव चव्हाणांची नेमकी राजकीय कोंडी नेमकी काय झाली होती??, याची थोडी पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. 1977 ते 80 या कालावधीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वातला काँग्रेस पक्ष पराभूत झाला होता. आणीबाणीची त्याला पार्श्वभूमी होती आणि यशवंतराव चव्हाण जरी 1975 ते 77 या कालावधीत आणीबाणीत इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, तरी ते पूर्ण निष्प्रभ होते. इंदिरा गांधी विरोधात उघडपणेच काय पण छुप्या पद्धतीने किंवा सुप्तपणे बोलण्याची आणि काही कृती करण्याची कोणाचीच हिंमत नव्हती. त्यात यशवंतरावही होते. भले यशवंतरावांचे समर्थक – लेखक – साहित्यिक त्यांची लोकशाहीवरची निष्ठा कितीही अढळ मानत असतील, यशवंतरावांनी 1975 ते 77 या कालावधीत तशी लोकशाहीवरची निष्ठा इंदिरा गांधींसमोर दाखविण्याची हिंमत केली नव्हती.
पण 1977 मध्ये इंदिरा गांधी पराभूत झाल्या. त्यांना लोकसभेत देखील पोहोचणे अवघड झाले आणि त्यावेळीच यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला नवे धुमारे फुटले. यशवंतराव 1977 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले होते आणि इंदिरा गांधी लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे ज्येष्ठतेच्या आधारे ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनले होते. समोर मोरारजी देसाई पंतप्रधान होते. पण अवघ्या दीड वर्षात मोरारजींचे सरकार जनता पक्षातील अंतर्गत कलहामुळे कोसळले आणि चरणसिंग पंतप्रधान झाले. इथे यशवंतरावांना आपले भाग्य फळफळल्यासारखे वाटले आणि ते चरणसिंग यांच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान झाले. यासाठी त्यांनी इंदिरा गांधींची सोडली. ब्रह्मानंद रेड्डी आणि चव्हाण एकत्र येऊन रेड्डी – चव्हाण काँग्रेस काढली. पण चरणसिंगांचे राजकीय भाग्य अल्पकाळ चमकले आणि चरणसिंग यांचे सरकार गडगडले. अर्थातच यशवंतरावांचे उपपंतप्रधान पद गेले.
1980 मध्ये लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी स्वबळावर 351 जागा घेऊन सत्तेवर आल्या, त्या इंदिरा काँग्रेसच्या सर्वेसर्वा म्हणून. त्यांना काँग्रेसमधल्या जुन्या नेत्यांची काही गरजच नाही. जगजीवन राम, यशवंतराव चव्हाण, ब्रह्मानंद रेड्डी हे सगळे बडे नेते एका झटक्यात भारतीय राजकारणातून बाहेर फेकले गेले.
यशवंतरावांनी राजकीय किंमत गमावली
यशवंतरावांना काँग्रेसमध्ये तर सोडाच पण महाराष्ट्राच्या राजकारणात देखील आपली राजकीय किंमत गमवावी लागली होती. यशवंतरावांची ती खरी राजकीय कोंडी झाली होती. अखेर 1980 मध्ये इंदिरा काँग्रेस हाच भारताचा मुख्य राजकीय प्रवाह आहे आणि सत्तेच्या राजकारणाखेरीज बहुजन समाजाला पर्याय नाही हे स्वीकारून यशवंतराव चव्हाण इंदिरा गांधींना विनंती करून इंदिरा काँग्रेसमध्ये समाविष्ट झाले आणि त्यांनी स्वतःची राजकीय कोंडी फोडली अर्थात इंदिरा काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांचे मानसिक समाधान झाले पण तेथे त्यांना फार मोठे पद कधीच मिळाले नाही. यशवंतरावांचे निधन 1984 मध्ये झाले, त्यावेळी ते आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते.
दरम्यानच्या काळात 1978 ते 1980 या काळात यशवंतरावांच्या सुप्त आशीर्वादाने शरद पवारांनी काँग्रेस फोडून वसंतदारांचे सरकार पाडून स्वतः सत्तेवर आले होते. पण 1980 नंतर ती परिस्थिती उरली नाही. यशवंतराव इंदिरा काँग्रेसमध्ये गेले आणि शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसची राजधानी कास धरली.
पवार राजकीय पत टिकवणार?
आज हे आठवायचे कारण असे की यशवंतराव चव्हाण 1980 मध्ये इंदिरा काँग्रेस हा देशाच्या राजकारणाचा मुख्य प्रवाह आहे असे सांगून इंदिरा काँग्रेसमध्ये गेले होते आणि आपला थोडाफार उरलेली राजकीय पत टिकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, तसेच आज काहीसे शरद पवारांचे 2023 मध्ये झाले आहे.
भाजप आज राजकारणातला मुख्य प्रवाह
शरद पवारांना आणि काँग्रेसजनांना मान्य असो अथवा नसो, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप हा भारतीय राजकारणाचा मुख्य प्रवाह बनला आहे. एकेकाळी 2 खासदार असलेला भाजप आज केवळ राष्ट्रीय पक्ष नाही, तर देशव्यापी सर्वात मोठा पक्ष बनला आहे. नेहरू – इंदिरा गांधींच्या काळातल्या काँग्रेसची सगळी “पॉलिटिकल स्पेस” भाजपने व्यापली आहे. अशा स्थितीत जो “फेस सेव्हिंग” युक्तिवाद करून यशवंतराव चव्हाण इंदिरा काँग्रेसमध्ये परतले होते, तशीच काहीची अवस्था आज शरद पवारांची झाली आहे. काँग्रेसी राजकारणाची “पॉलिटिकल स्पेस” झपाट्याने संपली आहे आणि कितीही प्रयत्न केले. जुगाडाचे राजकारण केले तरी भाजपला वगळून भविष्यातले अजून कित्येक वर्षांचे राजकारण करता येणार नाही याची पक्की जाणीव शरद पवारांना झाली आहे. किंबहुना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची राजकारणाची ही कोंडी झाली आहे.
पवारांपुढे मार्ग मोदी शरणागतीचा
1980 च्या दशकात इंदिरा गांधी पुढे राजकीय शरणागती पत्करून यशवंतरावांनी आपला मार्ग राजकीय मार्ग थोडाफार प्रशस्त करून घेतला, तशीच संधी 2023 मध्ये शरद पवारांना मोदींसमोर राजकीय शरणागती पत्करून आपल्या राजकीय मार्गातील अडथळे दूर करण्याचा उपलब्ध आहे. अशा स्थितीत शरद पवार आपले राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांचा “मुख्य राजकीय प्रवाहात” सामील होण्याचा मार्ग अवलंबणार की नेहमीप्रमाणे तळ्यात मळ्यात कायम ठेवून अंतिमतः पराभूत होणार??, हे पाहणे महत्त्वाचे आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App