विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ मुंबई प्रकल्प शुभारंभ आणि कोनशिला अनावरण आणि भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विशेष सत्कार संपन्न झाला.World-class law university to be set up in Maharashtra
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2014 साली महाराष्ट्रात 3 राष्ट्रीय विधि विद्यापीठ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला, त्यामुळे महाराष्ट्र असे एकमेव राज्य बनले, जिथे 3 राष्ट्रीय विधि विद्यापीठ सुरु झाले आहेत. त्यासाठी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवईजी यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले.
3 विधि विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठाकडे स्वतःचे असे संकुल नव्हते, तेव्हा मुंबईसाठी देखील विधि विद्यापीठ संकुल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व कायदेशीर गोष्टींची पूर्तता करून आज या विद्यापीठाच्या संकुलाचे काम सुरू करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ हे देशापुरते जरी मर्यादित असले, तरी येत्या काळात ते आंतरराष्ट्रीय विधि विद्यापीठ म्हणून ओळखले जाईल. सध्या उद्योग, व्यवसाय, सामाजिक जीवन, राजकारण या सर्व गोष्टी शिक्षणाशी जोडल्या गेल्या आहेत, कारण सध्याच्या जगात मानवी संसाधन हे अमूल्य आहे आणि उत्तम दर्जाचे मानव संसाधन फक्त शिक्षणामुळेच तयार होऊ शकते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने, नवी मुंबईत एक “एज्यु सिटी” उभारण्याचे मोठे काम यशस्वीपणे सुरू आहे. या ठिकाणी जागतिक दर्जाच्या 12 विद्यापीठांचा समावेश असून, त्यापैकी 7 विद्यापीठे लवकरात लवकर कार्यरत होण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. या उपक्रमांचा उद्देश मुंबई आणि नवी मुंबई परिसरात जागतिक दर्जाचे शिक्षण व नवोन्मेष केंद्र उभारणे हा आहे.
भारत आज जागतिक शक्ती म्हणून उदयास येत आहे, त्यामुळे आपल्या न्यायव्यवस्थेला जागतिक दर्जाशी सुसंगत बनवण्याची आणि विधि क्षेत्रात सर्वोत्तम मानव संसाधन निर्माण करण्याची गरज आहे. या दिशेने नवे ‘महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ’ मुंबई प्रकल्प अतिशय महत्त्वाची भूमिका बजावेल. राज्य सरकार हा प्रकल्प अत्याधुनिक व जागतिक दर्जाचा उभारण्यासाठी आणि शक्य तितक्या वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App