विशेष प्रतिनिधी
सातारा : Uttam Jankar with Eknath Shinde :माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाढती जवळीक सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. विकासकामांसाठी पुरेसा निधी मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) सोबत असणारे सोलापूर जिल्ह्यातील चार आमदार सत्तेत सहभागी होण्याची मागणी करत असल्याचे जानकर यांनी यापूर्वी एकदा माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
उत्तम जानकर यांच्या सततच्या विधानांवरून ते सत्ताधारी पक्षासोबत जाण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. कधी अजित पवारांची तर कधी एकनाथ शिंदेंशी झालेल्या जवळीकतेमुळे सत्ताधरी पक्षांशी वाढलेली त्यांची नजदीकता लपून राहिलेली नाही.काही काळापूर्वी, विकास निधी आणि नीरा कालव्याच्या पाणीवाटपाच्या मुद्द्यावरून उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही जवळीक साधल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.गेल्या काही काळापासून जानकर आणि शिंदे यांच्यातील संबंध दृढ झाल्याचे दिसून येत आहे. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी जानकर यांनी हजेरी लावली होती, तेव्हाही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांनी, शिंदे गटातील दोन मंत्र्यांसोबत होलार समाजाच्या मेळाव्यातही जानकर सहभागी झाले. या मेळाव्यात त्यांनी एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले आणि “कर्णानंतरचा दानशूर नेता म्हणजे एकनाथ शिंदे” अशी स्तुती सुमने त्यांच्यावर उधळली.
आता, गणपती उत्सवानिमित्त शिंदे यांच्या मूळ गावी गेले असताना उत्तम जानकर यांनी त्यांची भेट घेतली. गणपती दर्शनानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते. या भेटीभोवती असलेल्या गोपनीयतेमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.सध्या एकामागून एक आमदार सत्ताधारी पक्षांशी जवळीक साधत असताना, उत्तम जानकर यांचाही त्यात समावेश होतोय की काय, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. या भेटीमुळे सोलापूरच्या राजकारणात नवे बदल घडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विरोधी पक्षातील आमदारांना विकास निधी मिळत नसल्याची तक्रार वारंवार शरद पवार गटाचे आमदार करत आहेत. त्यामुळेच दोन्ही मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधून आपले कामे मार्गी लावणे सोपे होईल हा विचार जानकर करत असावेत. सध्या उत्तम जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार असल्याने शिंदे सोबत गेल्यास त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे ते थेट शिंदे सोबत किंवा अजित पवारांसोबत जातील याची शक्यता कमी आहे. उत्तम जानकर योग्य वेळेची वाट पाहत आहेत आशेच दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App