विशेष प्रतिनिधी
पुणे : change in the cabinet : सध्या राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल यांच्या चर्चांना जोरदार उधाण आले आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, पुढील आठवड्यात राज्याच्या मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बदलात शिवसेनेच्या दोन मंत्र्यांना आणि राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला नारळ मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील आरक्षणाचा मुद्दा, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांमधील नाराजी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे देवेंद्र फडणवीस सरकार मंत्रिमंडळात बदल करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. या बदलांनुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील विद्यमान मंत्री नरहरी झिरवळ यांना मंत्रीपदावरून हटवले जाऊ शकते. तसेच, शिंदे गटाच्या शिवसेनेतील मंत्री भरत गोगावले आणि संजय शिरसाठ यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, धनंजय मुंडे आणि तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याचे संकेत आहेत.
सध्या शिंदे गटाच्या शिवसेनेकडून मराठवाड्यातील संजय शिरसाठ हे मंत्री आहेत. मात्र, त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. काही दिवसांपूर्वी पैशाची बॅग घेऊन बसलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच, सिडको भूखंड घोटाळ्याचेही आरोप त्यांच्यावर होत आहेत. याशिवाय, त्यांच्या मुलाच्या प्रकरणामुळेही ते चर्चेत आले होते. या सर्व कारणांमुळे शिरसाठ यांना मंत्रीपदावरून हटवले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले भरत गोगावले हे देखील सध्या अडचणीत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना आपल्या मंत्रालयाचा कारभार सुधारण्याचे आदेश दिले होते. मात्र, भरत गोगावले यांच्या कामगिरीवर शिंदे समाधानी नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपद सोडावे लागण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे व्यासपीठावरून “मला काहीतरी काम द्या” अशी मागणी केली होती. वाल्मीक कराड यांच्याशी जवळीकीमुळे मंत्रिपद गमवावे लागलेले धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता आहे. सर्व आरोपांमधून मुक्त झाल्यावर त्यांना पुन्हा संधी देण्याचे अजित पवार यांनी यापूर्वीच सांगितले होते.
या सर्व चर्चा केवळ अटकळी आहेत की यात काही तथ्य आहे, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App