नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून भारतीय जनता पार्टीत घरवापसी करणाऱ्या एकनाथ खडसेंबाबत मराठी माध्यमांमध्ये भरपूर बातम्या येत असल्या, तरी मुळात एकनाथ खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठेवून त्यांना पक्षाकडून देण्यासारखे त्या पक्षात शिल्लक तरी काय होते?? हा खरा सवाल आहे.
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी सोडण्यातून शरद पवारांना फार मोठा धक्का बसणार, एकनाथ खडसेंना गौण खनिज खरेदी प्रकरणात 134 कोटी रुपयांच्या खरेदी प्रकरणात वेगवेगळ्या नोटीसा येत होत्या त्या थांबल्या वगैरे बातम्यांची मराठी माध्यमांनी भरमार केली. त्याचबरोबर फक्त एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार आणि रोहिणी खडसे राष्ट्रवादीचेच राहणार अशाही बातम्या चालविल्या, पण प्रत्यक्षात नेमके काय घडणार हे कोणीच सांगितले नाही.
त्या पलीकडे जाऊन एकनाथ खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत कायम टिकून राहिले असते, तर त्यांना राजकीय दृष्ट्या देण्यासारखे पवारांच्या राष्ट्रवादीत उरले तरी काय होते??, हा खरा सवाल कोणीच विचारला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फार तर तुतारी चिन्हावर उमेदवारी या पलीकडे एकनाथ खडसे यांना शरद पवार काय देऊ शकणार होते??, तेवढे देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची कुवत तरी शिल्लक राहील का??, हे कळीचे सवाल आहेत आणि त्यामुळेच एकनाथ खडसे यांनी उरली सुरली चतुराई वापरून घरवापसीचा निर्णय घेऊन ते मोकळे झाले.
मूळात खडसेंचे बळ किती??
एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेले म्हणून भाजपला फार मोठा फरक पडला असा इतिहास नाही. त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फार मोठी बळकटी मिळाली, असेही फारसे घडले नाही. कारण दरम्यानच्या काळात कुठल्या मोठ्या निवडणुकाच आल्या नाहीत. विधान परिषद आणि राज्यसभा या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी काही “चमत्कार” दाखवण्याऐवजी देवेंद्र फडणवीस असे काही “चमत्कार” दाखविले की, पवारांनी घडविलेले अख्खे ठाकरे – पवार सरकार डब्यात गेले, त्या पाठोपाठ खुद्द पवारांचा पक्ष फुटला. त्यामुळे पवारांकडून कुठली कुमक आपल्याला मिळेल आणि आपले भवितव्य “चमकेल” याची शाश्वती एकनाथ खडसेंना उरली नाही. त्यामुळेच भाजपमध्ये घरवापसी करण्यावाचून त्यांना पर्याय राहिला नाही, ही यातली वस्तूस्थिती आहे. ती “पवार बुद्धी”च्या मराठी माध्यमांनी मांडली नाही.
बाकी खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे यांची रावेरमधून लोकसभा उमेदवारी, त्यांना खडसेंच्या घरवापसीमुळे मिळणारे थोडे फार बळ या बाबी स्थानिक राजकारणापुरत्याच महत्त्वाच्या आहेत. त्यापलीकडे त्याचे फारसे महत्त्व नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App