नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांनी छगन भुजबळ यांना स्थान दिले नाही म्हणून ते तीव्र नाराज झाले आणि आता त्यांच्या नाराजीची तीव्रता आणखी वाढली असून ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाभूकंप घडवून आणतील, अशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.
एकतर अजितदादांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारले. त्यामुळे ते नाराज होऊन नागपूरच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोडून नाशिकला निघून आले. नाशकात आणि येवला विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपल्या समर्थकांचे जोरदार मेळावे घेतले. आता भुजबळांनी अन्याय सहन करू नये. ते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असून त्यांनी आता निर्णय घेण्यात मागे हटू नये, असा निर्धार या मेळाव्यांमधून व्यक्त करण्यात आला. भुजबळांच्या समर्थकांची एकजूट यानिमित्ताने सगळ्या महाराष्ट्राला दिसली. भुजबळ नाशिक मधूनच आपला काही वेगळा निर्णय जाहीर करणार, असे त्यावेळी वाटत होते, पण प्रत्यक्षात भुजबळ यांनी राजकीय दृष्ट्या संयमाची भूमिका घेतली. त्यांनी नाशिक मधून कुठला निर्णय जाहीर केला नाही.
दरम्यानच्या काळात छगन भुजबळांची समजूत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाशकात येणार. भुजबळांची बोलणार. त्यांच्या नाराजीचे कारण जाणून घेऊन ती दूर करणार, अशा बातम्या मराठी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे भुजबळांचे राजकीय महत्त्व अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टिकून असल्याचा आभास निर्माण झाला, पण प्रत्यक्षात मात्र गेल्या तीन-चार दिवसांत तसे काहीच घडले नाही. अजितदादा, प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे नाशकाकडे फिरकले नाहीत. त्यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये भुजबळांच्या नाराजीवर फक्त संयमी प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्या पलीकडे त्यांनी भुजबळांची समजूत काढण्यासाठी काही केले नाही.
या पार्श्वभूमीवर भुजबळ आणखी चिडले आणि म्हणूनच आज ते मुंबईला रवाना झाले. आज आणि उद्या मुंबईत ते आपल्या समर्थकांची चर्चा करून राष्ट्रवादीत महाभूकंप घडवतील अशा बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या. पण या बातम्यांमध्ये तथ्य किती आणि हवेतले पतंग किती त्याचा थोडा आढावा घेतला तर भुजबळांकडे किती थोडे ऑप्शन शिल्लक आहेत हेच समोर येते.
Sharad Pawar ऊसाला जास्त भाव मिळावा यासाठी शरद पवारांनी पत्र लिहायला हवे होते, सदाभाऊ खोत यांचा सल्ला
– भुजबळांसमोरचे ऑप्शन्स
छगन भुजबळ शिवसेनेत असताना तरुण तडफदार नेते होते यातले तारुण्य आता निघून गेले आहे, पण तडफ मात्र कायम आहे. ती त्यांनी नाशिक आणि येवल्यातल्या मेळाव्यातून दाखवून दिली. पण या मेळाव्यांची दखल अजित पवार किंवा राष्ट्रवादीच्या बाकीच्या नेत्यांनी फारशी घेतल्याचे दिसलेच नाही. त्यामुळे भुजबळांची राष्ट्रवादीतली राजकीय उपयुक्तता संपली आहे काय??, असा सवाल तयार झाला. भुजबळांकडे जे राजकीय ऑप्शन्स आहेत, त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परत जाणे, भाजपच्या संपर्कात जाऊन भाजपमध्ये प्रवेश करणे किंवा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ओबीसींची नव्याने संघटना उभी करणे यावर माध्यमांनी चर्चा केली. पण या सगळ्यात भुजबळ सत्तेबाहेर जातात आणि सत्तेबाहेर गेलेले भुजबळ तेवढे “ताकदवान” उरतील का??, या सवालावर मात्र कुणी काही बोलले नाही.
कारण शेवटी शरद पवारांच्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीने भुजबळांसारख्या कार्यकर्त्याला सत्तेची चटक लावली. त्या चटकेचे अक्षरशः व्यसनात रूपांतर झाले आणि त्यामुळेच भुजबळांची केवळ एकदा मंत्रिपद नाकारल्यामुळे तगमग वाढली. त्यामुळे भुजबळांनी आज काहीही निर्णय घेतला, तरी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचा एकही आमदार बाहेर पडण्याची शक्यता नाही. कारण भुजबळांबरोबर बाहेर पडणे म्हणजे सत्तेच्या वर्तुळाबाहेर फेकले जाणे, हे राष्ट्रवादीचे आमदारांना पक्के माहिती आहे. आणि सत्तेशिवाय राष्ट्रवादीचे आमदार म्हणजे पाण्याशिवाय मासा. त्यामुळेच भुजबळांच्या बंडाचा साईज फार मर्यादित राहण्याची शक्यता आहे.
उलट भुजबळ अजितदादांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडणे हे सध्यातरी अजितदादांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. कारण त्यामुळे आपोआपच मंत्रीपदासाठी अडून बसलेला एक तगडा स्पर्धक बाजूला होईल आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून जयंत पाटलांची अजितदादांच्या राष्ट्रवादीतली एन्ट्री अधिक सोपी होईल. म्हणूनच अजितदादांनी नाशिककडे फिरकण्याची तसदी घेतली नसावी.
राहता राहिला देशव्यापी ओबीसी संघटना उभे करणे हा ऑप्शन. हा ऑप्शन वाटतो तितका सोपा नाही. कारण भुजबळांच्या हातात आता तेवढे वय शिल्लक नाही. हा तर भाग महत्त्वाचा आहेच, पण त्यापलीकडे जाऊन राष्ट्रव्यापी संघटना उभी करण्यासाठी करावा लागणारा प्रवास, त्यासाठी शोधावे लागणारे मुद्दे, त्याचबरोबर संघटना उभी करण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची रसद हे आत्ताच्या काळात मिळवणे सोपे नाही.
– भुजबळांचे पंख पवारांनी छाटले होते
भुजबळांनी ते उपमुख्यमंत्री असताना हा प्रयोग करून पाहिला होता. त्यांनी बिहारमध्ये ओबीसींचा महामेळावा भरून दाखविला होता. पण त्या महामेळाव्याला स्वतः शरद पवार हजर राहिले होते. त्या महामेळाव्यात त्यांना भुजबळांच्या शक्तीची चुणूक दिसली होती. भुजबळ आपल्यालाच नंतर आव्हान निर्माण करणारी ताकद उभे करू शकतील, याची भीती वाटल्याबरोबर शरद पवारांनी महाराष्ट्रातून त्यांचे पंख छाटले होते. त्यानंतर भुजबळ फारसे राष्ट्रीय पातळीवर चमकले नव्हते. त्यामुळे आता वयाच्या 77 व्या वर्षी राष्ट्रीय पातळीवरची ओबीसी संघटना उभी करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळेच त्या दिशेने भुजबळ जातील का याविषयी दाट संशय आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App