विशेष प्रतिनिधी
नागपूर : राज्यात गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणावरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्फोटक आरोप करत सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. या प्रकरणात सुमारे ५० मंत्री आणि अधिकारी अडकले असल्याचा दावा त्यांनी केला असून, प्रफुल लोढाने कमीत कमी २०० कोटी रुपयांची वसूली केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
वडेट्टीवार म्हणाले की, “हनी ट्रॅपचं रॅकेट फार मोठं आहे. यात अनेक मोठे मासे अडकले आहेत. सुमारे ५० मंत्री, माजी मंत्री, आणि वरिष्ठ अधिकारी यात गुंतले आहेत. लोढाने त्यांच्याकडून पैसे उकळले असून, एकूण रक्कम २०० कोटींच्या घरात आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “लोढा कोणाच्या सांगण्यावरून काम करत होता हे मी सध्या सांगणार नाही, पण लवकरच सगळं स्पष्ट होईल. जे चेहेरे अद्याप समोर आलेले नाहीत, तेही उघडकीस येतील.”
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील याच प्रकरणावर विधानसभेत मंत्रालय, नाशिक आणि ठाणे ही हनी ट्रॅपची केंद्रस्थानं असल्याचा आरोप केला होता. त्यांनी सभागृहात यासंदर्भातील पेनड्राइव्हही दाखवली होती. मात्र, विरोधकांच्या मागणीवरही सरकारने यावर निवेदन न दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी “ना हनी, ना ट्रॅप, नानांचे बॉम्ब आमच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत” अशा शब्दांत याची खिल्ली उडवली होती.
वडेट्टीवार यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर आणखी एक हल्ला चढवला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर सूरज चव्हाणने हल्ला केला, तरीही पोलीस त्याच्यावर कारवाई करत नाहीत. यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सूरज चव्हाणच्या कृत्याचं समर्थन करत आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर सरकारला लाज असेल, तर सूरज चव्हाणला अटक केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या “शेतकरी नव्हे, सरकारच भिकारी” या वक्तव्यावरून संतप्त प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले, “सभागृहात रमी खेळणाऱ्या माणसाला एक मिनिटही मंत्रिपदावर ठेवू नये. सरकारला जर शेतकऱ्यांबाबत कळवळा असेल, तर त्वरित कारवाई झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या भावना दुखावणाऱ्या व्यक्तीला पाठिशी घालणार असाल, तर आम्ही ‘रमी खेळणारा कृषी मंत्री’ असल्याचं जाहीर करू.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App