
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था खूपच कोंडी करणारी झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीतल्या जागावाटपात महायुतीमध्ये सर्वांत कमी म्हणजे 4 – 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. कारण भाजपचा तसा थेट दबाव आहे. त्यात आता विजय शिवतरेंनी थेट अजितदादांच्या किंबहुना पवार कुटुंबीयांविरुद्ध रणशिंग फुंकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अधिकच सैरभैर झाले आहेत आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच विजय शिवतारे यांची तक्रार केली आहे.Vijay shivtare challenged pawar family in baramati, rattled NCP leaders complained against him to CM eknath shine
पुरंदरचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीतून पवार कुटुंबीयांविरुद्ध थेट रणशिंग फुंकले आहे. बारामतीच्या सातबारावर फक्त काही पवार कुटुंबियांचे नाव नाही. त्यामुळे तिथे पवार कुटुंबांपैकीच कोणी खासदार झाला पाहिजे, असं काही लिहून दिलेलं नाही. बारामतीत 5 लाख 80 हजार मते पवार कुटुंबीयांच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण पवार कुटुंबीयांच्या विरोधात मैदानात उतरू शकतो, असे विजय शिवतारे यांनी जाहीर केले.
त्यामुळे विजय शिवतारे यांच्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते खवळले. आधीच भाजप वरून दबाव आणून लोकसभेच्या अवघ्या 4 – 5 जागा पदरात टाकणार, तिथेच काय ती आपली ताकद एकवटायला लावणार, तिथे निवडून आलो तर ठीक, नाहीतर भाजप हरियाणात दुष्यंत चौटाला यांना दाखवला तसा अजितदादांना बाहेरचा रस्ता दाखवणार, याची भीती राष्ट्रवादीच्या वरपासून खालपर्यंत सगळ्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे विजय शिवतारे यांच्यासारख्या नेत्याने थेट पवार कुटुंबा विरुद्ध दंड थोपटल्याने राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेच्या नेत्यांवर भडकले आहेत.
बाकी राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांवर चिडू शकत नाहीत किंवा त्यांची भडास भाजपच्या कुठल्याच नेत्यांवर काढू शकत नाहीत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तसे करण्याचा साधा प्रयत्न जरी केला, तर महाराष्ट्रातले आणि केंद्रातले भाजप नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांना “जमालगोटा” द्यायला कमी करणार नाहीत. त्यामुळे उरता उरले शिवसेनेचेच नेते. त्यांच्यावरच राष्ट्रवादीचे नेते भडास काढत आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विजय शिवतारे यांच्याविरुद्ध तक्रार केली. विजय शिवतारे यांना आवरा. बारामतीत काही उलटे पालटे झाले, तर त्याचे पडसाद ठाणे – कल्याण मध्ये उमटतील, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला.
लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या जागावाटपात भाजपच सिंहाचा वाटा उचलणार असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फारतर 10 – 12 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 – 5 जागाच पदरात पडणार आहेत. तिथेच काही ती आपली ताकद एकवटावी लागून खासदार निवडून आणावे लागणार आहेत. ते निवडून आणले तर ठीक, अन्यथा भाजप आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवणार ही दोघांनाही भीती भेडसावत आहे. पण तरी देखील आपापसांतले वाद ते चव्हाट्यावर धुवत आहेत.