विशेष प्रतिनिधी
केज : Valmik Karad अवादा कंपनी व्यवस्थापकाला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातील आरोपी व राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा समर्थक वाल्मीक कराडवर अटकेनंतर १५ दिवसांनी‘मकोका’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. कोर्टाने त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. मात्र सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातही सहभाग असल्याचा संशय असल्याने एसआयटीने त्याला ताब्यात घेतले आहे. आता कराडचा मुक्काम बीडच्या कारागृहात असेल. दरम्यान, या कारवाईमुळे कराड समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी परळीत तीव्र आंदोलन सुरू केले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईत अजित पवार यांच्याशी चर्चा करून परळीकडे धाव घेतली. दरम्यान, सीआयडीचे तपासी अधिकारी अनिल गुजर यांनी कराडच्या आवाजाचे नमुने घेतले असून त्याचे 3 मोबाइल जप्त केले आहेत.Valmik Karad
कराडची संपत्ती शोधणार
कराडने कोणत्या गुन्ह्यातून संपत्ती कमावली, त्याची देश-विदेशात किती संपत्ती आहे हे शोधण्यासाठी पोलिस कोठडी हवी आहे.
ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा व हत्येतील त्याचा सहभाग जाणून घेण्यासाठी १० दिवसांची सीआयडी कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी कोर्टात केली होती. सरकारी वकील जितेंद्र शिंदे व आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली.
एसआयटीने घेतले ताब्यात
कराडला मकोका लावल्याचे पत्र सादर करून त्याला ताब्यात घेण्याची परवानगी एसआयटीने मागितली. कोर्टाच्या परवानगीने सीआयडीच्या ताब्यातून एसआयटीने ताब्यात घेतले. बुधवारी पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.
समर्थक संतप्त; तरुणीसह दोघांचा पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
वाल्मीक कराडवर ‘मकोका’ लावताच परळीतील त्याच्या समर्थकांनी आक्रमक आंदोलन सुरू केले. राष्ट्रवादीची कार्यकर्ती वर्षा दहिफळे हिने परळी पोलिस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यात तिचा पाय भाजला आहे. तर सकाळी
दत्ता जाधव (रा. फुलेनगर) याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. इतर आंदोलक आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. दरम्यान, सायंकाळी परळी- कौडगाव कानडी या बसवर अज्ञात जमावाने दगडफेक केली. त्यामुळे मंगळवारी दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत बीड मार्गावरील सर्व बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. दगडफेकीत कुणालाही इजा झाली नाही. परळी बंदचे आवाहनही करण्यात आले होते.
परळीत कराडच्या ७५ वर्षीय आई पारुबाई कराड, पत्नी मंजिली कराड यांनी परळी पोलिस ठाण्यासमोर १२ तास ठिय्या आंदोलन केले. तर कराड समर्थकांनी परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून घोषणाबाजी केली. काही ठिकाणी समर्थकांनी रास्ता रोको केला. कराडला अडकवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App