नाशिक : (शप) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी लोकमतच्या कार्यक्रमामध्ये घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मंत्री नितेश राणे यांना उद्देशून राजधर्म सांगितला. त्यामुळे हुरळलेल्या मराठी माध्यमांनी त्याच्या मोठमोठ्या बातम्या चालविल्या. फडणवीसांनी नितेश राणे यांना कशा कानपिचक्या दिल्या, भडकावून विधाने करण्यापासून त्यांनी राणेंना कसे परावृत्त केले, वगैरे बाता मारल्या. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी थेट अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव घेतल्याने त्या राजाधर्माला एकदम राजकीय ऐतिहासिक संदर्भ प्राप्त झाला. त्यामुळे मराठी माध्यमे हुरळून गेली.
कारण फडणवीसांनी ज्या राजधर्माचा उपदेश नितेश राणे यांना उद्देशून केला, तसाच उपदेश माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदींना केला होता. गुजरात मध्ये दंगल पेटली असताना मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी वाजपेयींवर प्रचंड दबाव आला होता. त्यावेळी वाजपेयींनी गुजरातचा दौरा करून नंतर पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेत त्यांनी नरेंद्र मोदींना आपल्या शेजारी बसवले होते. त्यावेळी पत्रकारांनी तुम्ही नरेंद्र मोदींना काय सांगाल असा सवाल वाजपेयींना केला होता त्यावेळी वाजपेयींनी त्यांनी राजधर्माचे पालन करावे असे मोदींना सुनावले होते. त्यावेळी हुरळून गेलेल्या राष्ट्रीय माध्यमांनी वाजपेयींनी मोदींना “झापल्याच्या” बातम्या चालविल्या होत्या. त्यामुळे राजधर्म हा शब्दप्रयोग भारतामध्ये सुपरहिट झाला होता.
पण या राजधर्माची आणि त्याच्या पलीकडची गोष्ट माध्यमांनी कधी सांगितलीच नाही कारण ती त्यांच्या अकलेच्या पलीकडची ठरली होती.
गुजरात दंगलीच्या वेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी मोदींना राजधर्म जरूर सांगितला, अगदी शेजारी बसवून सुनावला. पण वाजपेयी यांची इच्छा असून देखील ते नरेंद्र मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून हटवू शकले नव्हते. त्यांनी मोदींना मुख्यमंत्री पदावरून हटविले नव्हते, इतकेच काय पण वाजपेयी मोदींना राजधर्म पाळा असे सांगितल्याचे माध्यमांनी दाखविले आणि छापले. पण त्याच पत्रकार परिषदेमध्ये मोदींनी हम राजधर्म का पालन कर रहे है!!, असे स्पष्ट शब्दांत वाजपेयींना ऐकवले होते आणि वाजपेयींनी देखील मोदी राजधर्म का पालन कर रहे है!!, असा प्रतिसाद दिला होता, याकडे मात्र माध्यमांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले होते.
आता देखील देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना उद्देशून राजधर्माचे धडे दिले. पण त्यावेळी त्यांनी नितेश राणे यांचे नाव घेतले नाही. शिवाय स्वतः नितेश राणे त्या कार्यक्रमाला हजर नव्हते, पण त्या पलीकडे जाऊन जे वाजपेयींनी केले, तेच फडणवीस यांनी केले, असेच त्यांच्या राजकीय कृतीमधून दिसले. फडणवीस यांनी नितेश राणे यांना उद्देशून राजधर्माचे धडे जरूर दिले, पण त्यांना मंत्रिमंडळातून ना काढले, ना नितेश राणे यांचे जेवणाचे निमंत्रण नाकारले, ना त्यांना “शांत” बसायला सांगितले!!, ही बाब मराठी माध्यमांच्या नजरेतून निसटली किंबहुना ती त्यांच्या अकलेच्या बाहेरची ठरली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App