विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण व परिसरातील विकासकामांचे उदघाटन संपन्न झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आज जी काही प्रगती आपण पाहतोय त्या प्रगतीचे अनेक शिल्पकार आणि निर्माते होते ज्यांच्या नेतृत्वातून या महाराष्ट्राला आकार मिळाला, हा महाराष्ट्र घडत गेला. या शिल्पकारांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचे नाव प्रामुख्याने येते. त्यांनी तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण केली, त्या समाजाला शिक्षणाकडे वळवताना अनेक शिक्षण संस्थांची निर्मिती केली, तसेच समाजातील परंपरा टिकवण्यासाठी आणि चुकीच्या गोष्टी बंद करण्यासाठी प्रयत्न केले.
नगराध्यक्ष, आमदार, खासदार, मुख्यमंत्री अशा विविध राजकीय पदांवर स्व. वसंतराव नाईक यांनी आपली भूमिका चोख बजावली. विशेषतः महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात त्यांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. व्यक्ती किती काळ पदावर असतो यापेक्षा तो पदावर असताना काय करतो हे महत्त्वाचे असते. स्व. वसंतराव नाईक यांनी 1972 मधील दुष्काळात जलसंधारणासारखे कार्य हाती घेत, जलक्रांतीचे दूत बनून महाराष्ट्राला पुन्हा समृद्धीकडे नेण्याचे कार्य केले, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
बंजारा काशी अर्थात पोहरादेवी मंदिराचा कायापालट करण्यासाठी ₹700 कोटींची तरतूद करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले जे बंजारा काशीला – पोहरादेवीला आले आणि नंगारा संग्रहालयाचे त्यांनी उदघाटन केले. या संग्रहालयात पहिला पुतळा हा स्व. वसंतराव नाईक यांचा उभारण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस नमूद केले.
महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) सुरु केली आहे, या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून बंजारा समाजाला वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जात आहे तसेच सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून बंजारा समाज मुख्यप्रवाहात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस याप्रसंगी म्हणाले. यावेळी मंत्री अतुल सावे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री संजय शिरसाट, खासदार, आमदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App