प्रतिनिधी
जळगाव : Raksha Khadse केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील एका जत्रेत शुक्रवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे रक्षा खडसे आक्रमक झाल्या असून छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.Raksha Khadse
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे महाशिवरात्री निमित्त मोठी जत्रा भरते. रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणी सुरक्षारक्षकांसोबत या जत्रेमध्ये गेली होती. यावेळी काही टवाळखोर तरुण त्यांचे परिवाराचे चित्रण करत असल्याचा संशय आला. या संशयावरून त्यांनी या तरुणाच्या हातामधील मोबाईल हस्तगत करून त्याची पडताळणी केली. या घटनेचा राग येऊन चारही टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकासोबत झटापट केली.
हा प्रकार समजल्यानंतर रक्षा खडसे यांनी याबद्दल महिला आणि मुली घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आक्रमक पावित्रा घेतला आहे. छेडखानी करणाऱ्या टवाळखोरांना अटक करावी, अशी मागणी रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली आहे. इतक्या सुरक्षेतही जर अशा पद्धतीने छेडछाड केली जाते तर सर्वसामान्य मुलींचा काय होणार? असा सवालही रक्षा खडसे यांनी पोलिसांना केला. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यामध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला होता.
काय म्हणाल्या रक्षा खडसे?
शुक्रवार रोजी हा घडलेला हा प्रकार गंभीर आहे. परवा रात्री मी येथे नव्हते. गुजरातला होते, आज सकाळी आले. माझ्या मुलीला यात्रेत जायचे होते, त्यासाठी तिने शुक्रवारी रात्री मला फोन केला होता. तेव्हा मी तिला सुरक्षा रक्षक आणि ऑफिसमधील स्टाफ सोबत घेऊन जाण्यास सांगितले. यावेळी तिच्या मैत्रिणीही सोबत होत्या. तिथे गेल्यानंतर काही टवाळखोरांनी त्यांचा पाठलाग केला. मुली बसतील, त्या पाळण्यात जाऊन मुलींच्या शेजारी बसले. आमच्या लोकांनी मुलींना उतरवून दुसऱ्या पाळण्यात बसवले. परंतु, त्या टवाळखोरांनी तिथेही तोच प्रकार केला. तिथे सुद्धा ते जाऊन बसले. पाळण्यात बसल्यानंतर तरुणांनी व्हिडिओ काढले. माझ्या सुरक्षारक्षकांनी त्यांचा मोबाईल घेतला. काय व्हिडिओ काढले हे बघितले असता, टवाळखोरांनी कुणाला तरी व्हिडिओ कॉल केल्याचे लक्षात आले. टवाळखोरांनी सुरक्षारक्षकांसोबतही धक्काबुक्की केली. मुलींसोबत छेडछाड देखील केली, असे रक्षा खडसे यांनी सांगितले.
हा खूप गंभीर प्रकार
सत्ता कुणाचीही असो, प्रशासनाकडे जेव्हा अशा तक्रारी येतात. त्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. एक पोलिस कर्मचारी ड्रेसवर मुलींसोबत असताना असा प्रकार घडत असेल, तर ही खूप गंभीर बाब आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी दोनवेळा बोलले आहे. त्यांनी सुद्धा एसपींना याबाबत सुचना दिलेल्या आहेत, असे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले.
या घटनेमध्ये एका विशिष्ट पक्षाचे लोक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र तो विशिष्ट पक्ष कोणता? असा प्रश्न उपस्थित झाला होता. रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणारे लोक एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आमदाराचे कार्यकर्ते असल्याचा दावा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केला आहे. एफआयआरमधे नाव असलेले अनिकेत भोई, पीयूष मोरे यांचे आमदार चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या घटनेमध्ये दुर्दैवाने एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी असल्याची सांगितले. या लोकांनी अतिशय वाईट प्रकारचे काम केलेले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. काहींना अटक केलेली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आरोपींचे एकनाथ शिंदे यांच्या सोबत फोटो
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वक्तव्यात असे म्हटले आहे की, आरोपी एका विशिष्ट पक्षाचे आहेत. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आरोपींचे एकनाथ शिंदे यांच्या सोबत फोटो आहेत, असा दावा रोहिणी खडसे यांनी केला. आरोपी सत्ताधारी पक्षाचे जरी कार्यकर्ते असले तरी त्यांनी कारवाईचे आदेश दिले, याबाबत मला देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. पण कारवाईचे आदेश देण्यापेक्षा लवकरात लवकर त्या मुलींना न्याय देण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना घडवू नये, यासाठी देखील देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पोलिस अधिकाऱ्यांना सूचना करणे अपेक्षित आहे, असेही रोहिणी खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App