उद्धव ठाकरेंनी खंजीर खुपसला, पवारांनी डबल गेम केली; फडणवीसांची स्पष्टोक्ती


प्रतिनिधी

मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सकाळच्या शपथविधीचे रहस्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष मुलाखतीतून उलगडले. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, तर शरद पवारांनी डबल गेम केली, असा आरोप फडणवीसांनी केला.Uddhav Thackeray stabbed, Pawar played a double game; Fadnavis’ candid speech

भल्या पहाटे हा शपथविधी घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. हा शपथविधी नेमका कसा घेतला? यामागे कुणाची खेळी होती? याबाबत लोकांच्या मनात अद्याप संभ्रम आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा केला आहे. या शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी नेमकं काय घडलं? याचा स्पष्ट खुलासा फडणवीसांनी केला.



पहाटेच्या शपथविधीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवारांची ‘मिस्ट्री’ समजून घ्यायची असेल तर आधी त्यांची ‘हिट्री’ समजून घ्यायला हवी. तरच ही ‘मिस्ट्री’ कळेल. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, उद्धव ठाकरेंनी जेव्हा युती तोडून मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी आमचा फोनही घेणे बंद केले. ते आमच्याबरोबर येणार नाहीत, हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्याकडे काय पर्याय आहेत? याचा विचार केला. तेव्हा राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की, राष्ट्रवादी भाजपाबरोबर येऊ शकते. ते स्थिर सरकार देऊ शकतात. या नंतर आमची शरद पवारांबरोबर बैठक पार पडली. त्या बैठकीत ठरले की, महाराष्ट्रात भाजपा – राष्ट्रवादी सरकार स्थापन केले जाईल. सरकार कसं असेल, याचा आराखडा तयार झाला. अजित पवार आणि मी दोघे या सरकारचे नेतृत्व करणार, हेही ठरले. सर्व अधिकार आम्हाला दिले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी त्यातून माघार घेतली, असा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला. ‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले, पण आमचा शपथविधी व्हायच्या तीन – चार दिवस आधी शरद पवारांनी माघार घेतली. पण अजित पवारांकडे भाजपाबरोबर येण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. कारण आम्ही पूर्ण तयारी केली होती. त्यानंतर अजित पवार आणि मी शपथ घेतली. कारण आपण शरद पवारांबरोबर इतक्या बैठका घेतल्या आहेत, त्यामुळे बाकीचे आमदार आणि शरद पवार आपल्याबरोबर येतील, असा विश्वास अजित पवारांना होता. पण शेवटी शरद पवार आमच्याबरोबर आले नाहीत. त्यामुळे आमचे सरकार पडले. पण मी एवढंच सांगेन की, त्यावेळी जे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. याची सुरुवात शरद पवारांशी बोलूनच करण्यात आली होती.

मग शरद पवारांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला का? असे विचारल्यावर फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंनी जे केले ते पाठीत खंजीर खुपसणे होते. कारण शरद पवारांनी आमच्याबरोबर निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी डबल गेम केली. आमचा वापर केला. रणनीती आखली आणि आमची दिशाभूल करून निघून गेले. त्यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला. पण आमच्याबरोबर निवडणूक लढवून नंतर काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत जाऊन भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव ठाकरे यांनीच केले.

Uddhav Thackeray stabbed, Pawar played a double game; Fadnavis’ candid speech

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात