राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाच गटाचे अध्यक्ष उरलेले शरद पवार स्वतःचा पक्ष किंवा स्वतःचे नेतृत्व कितीही “राष्ट्रीय” पातळीवरचे मानत असले, तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या प्रादेशिक राजकारणात ते उद्धव ठाकरेंपेक्षाही खालच्या स्तरावर आले आहेत, हे महाविकास आघाडीच्या संभाव्य जागावाटप सूत्रावरून स्पष्ट होते. कारण महाविकास आघाडीत ठाकरेंचा पलड़ा पवारांनाच भारी ठरलेला दिसत आहे. पण एवढे सगळे असूनही काँग्रेस टिकवणार का आघाडी हा खरा कळीचा सवाल आहेच!! Uddhav thackeray out weightage sharad pawar in MVA
कारण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या एकूण 48 जागांच्या वाटपाचे रोज नवे नवे फॉर्म्युले महाविकास आघाडीतलेच नेते पुढे आणत आहेत. यात प्रकाश आंबेडकरांनी “राजकीय समता” आणत “बाराचा फॉर्म्युला” पुढे केला आहे. महाविकास आघाडीतले 3 घटक पक्ष काँग्रेस, ठाकरे गट आणि पवार गट यांनी प्रत्येकी 12 जागा लढवाव्यात आणि उरलेल्या 12 जागा वंचित आघाडीने लढवाव्यात हा प्रकाश आंबेडकरांचा “बाराचा फॉर्म्युला” आहे. यातून त्यांनी महाविकास आघाडीत वंचित आघाडीची रेटूनच एन्ट्री करून ठेवली आहे.
पण उबाठा शिवसेनेचे नेते त्यांचे बिलकुलच ऐकायला तयार नाहीत. उलट त्यांनी स्वतःच्या 23 जागा राखून ठेवत उरलेल्या 25 जागांचे जागावाटप महाविकास आघाडीने आपापसात करावे, अशी सूचना करून सगळ्यांची पंचाईत करून ठेवली आहे, पण त्यावर एकेकाळी शिवसेनेतच असलेले हिंदी सामनाचे माजी संपादक, काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी ठाकरे गट स्वबळावर एक तरी जागा निवडून आणेल का??, असा बोचरा सवाल करून ठाकरे गटाची मागणी धुडकावली आहे.
या सगळ्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट पूर्णपणे पिछाडीवर ढकलला गेला आहे. एकेकाळी मोजक्या “राष्ट्रीय पक्षांमध्ये” समावेश असलेली राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात आता फक्त महाविकास आघाडीत 12 जागा मिळविण्याची मागणी करण्याएवढीच ताकदवान उरली असल्याची बातमी आहे. म्हणजे 48 पैकी फक्त 12 म्हणजे महाराष्ट्रातल्या 1/4 जागा राष्ट्रवादीला लढवायला हव्या आहेत. याचाच अर्थ महाविकास आघाडीत ठाकरेंचाच पलड़ा पवारांवर भारी असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना पक्ष फुटूनही ठाकरे आक्रमक राहिले आहेत, पण पवारांकडे तो आक्रमक बाणा बिलकूलच उरलेला नाही. कारण पवारांची निवडणूक लढवण्याची सर्व प्रकारची “क्षमता” असणारी सगळी माणसे अजित पवार आपल्याबरोबर घेऊन गेल्याने पवारांचा गट खऱ्या अर्थाने राजकीय दृष्ट्या “अपंग” झाला आहे!!
शरद पवार हे संपूर्ण देशाचे राजकारण हलवू शकतात, असे त्यांचे अनुयायी सांगत असतात. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा चमत्कार करून पवारांनी स्वतः विषयीच्या आशा विरोधकांसाठी पल्लवीत केल्या होत्या. पण अजित पवारांच्या बंडाने पवारांना असा काही दणका बसला की स्वतःच्या गटासाठी महाराष्ट्राच्या एकूण क्षमतेच्या फक्त 1/4 जागा लढण्यासाठी मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
आता हा फॉर्म्युला पक्का झाला, तर पवारांचा गट महाराष्ट्रातल्या फक्त 12 जागा लढवेल, तर त्यातल्या निवडून किती आणेल??, हा खरा कळीचा सवाल आहे. शरद पवार राजकीय दृष्ट्या ऐन भरात असताना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना लोकसभेच्या फक्त सिंगल डिजिट जागा निवडून आणू शकत असत. राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेतली खासदारांची सर्वोच्च संख्या 9 एवढीच आहे. आता तर त्यात फक्त 3 ची बेरीज करून राष्ट्रवादी काँग्रेस जर फक्त 12 जागा लढवणार असेल, तर त्यांचे खासदार निवडून येण्याची आणि आणण्याची क्षमता सिंगल डिजिट पेक्षाही खालची होण्याची शक्यता आहे. पवारांच्या तथाकथित “राष्ट्रीय” राजकारणाची ही खरी इतिश्री नव्हे, “बारामती श्री” ठरणार आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App