विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधान भवनात आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला. त्यानंतर फोटोसेशनचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख मंचावर आले असता पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले.
एकमेकांकडे पाहणे देखील टाळले
उद्धव ठाकरे मंचावर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आपल्या जागेवरून उठले व उद्धव ठाकरे यांना पुढे जाण्यास जागा दिली. उद्धव ठाकरे थोडे पुढे गेल्यावर तिथेच एकनाथ शिंदे देखील उभे होते. उद्धव ठाकरे जेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासमोर आले तेव्हा दोघांनी एकमेकांकडे पाहणे देखील टाळले. तिथेच उभ्या असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूला बसण्यास सांगितले, परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांनाच बसण्यासाठी सांगितले व बाजूला उभे असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाजूला जाऊन बसले.
बंडखोरीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे हे एकाच मंचावर
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर आल्याचे आज पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे समोर आले तेव्हा एकनाथ शिंदे हे चश्मा व्यवस्थित करत होते व उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे पाहणेही टाळले. राजकारणातील हा एक विशेष क्षण म्हणून पाहिले जात आहे.
फोटोसेशननंतर उद्धव ठाकरे यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात इकडे येण्याचा स्कोप असल्याचे उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटले होते, त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, खेळीमेळीचे वातावरण सुरूच असते.
उद्धव ठाकरे म्हणाले, सोन्याचा चमचा मी घेऊन आलो यामागे माझे वडील आणि आजोबांचे कर्तुत्व आहे. एकनाथ शिंदे यांना बोलण्याचा अधिकारच नाही. मराठी माणसाच्या हक्काची रोजी रोटी मिळवून देणे हे शिवसेना प्रमुखांनी केले आहे. हे आयत्या ताटावर बसलेली ही लोक होती, त्यांनी खाल्ल्या ताटात जी प्रतारणा केली तो त्यांना लखलाभो.
दाऊद भाजपमध्ये यायचा म्हटला तर त्याच्यावरील गुन्हेही माफ करतील
अंबादास दानवे यांनी मी पुन्हा येईन म्हटले यावर उद्धव ठाकरे म्हणाले, मीच त्यांना म्हटले होते असे बोलायला. कारण विरोधीपक्ष आहे. सत्ता ही कोणाची मक्तेदारी नाही. भाजपमध्ये ज्यांना प्रवेश दिला जात आहे, त्यांच्यावरील आरोप या लोकांनी मागे घेतले आहेत. पक्षात जातो म्हटले की आरोप मागे घेत लोकांना पक्षात घेणे सुरू आहे. उद्या दाऊद जरी भाजपमध्ये प्रवेश करणार असेल तर त्याच्यावरील गुन्हे हे लोक माफ करतील. सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्याला पक्षात घेतले गेले. यांना भ्रष्टाचार आरोप मुक्त महाराष्ट्र बनवायचा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App