नाशिक : लोकसभा निवडणुकीतल्या यशाची डोक्यात हवा गेल्याची उद्धव ठाकरेंनी कबुली दिली. त्यांना विजय वडेट्टीवार यांनी दुजोरा दिला. पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींच्या डोक्यात जी हवा गेली, ती कोण काढणार??, असा सवाल तयार झालाय.
उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यांच्या निकालातल्या तफावती संदर्भात वास्तवला धरून विचार मांडले. लोकसभा निवडणुकीतल्या यशाची आमच्या सगळ्यांच्याच डोक्यात हवा गेली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे प्लॅनिंग नीट झाले नव्हते. लोकसभा निवडणुकीत सगळे एकत्र येऊन “आम्ही” लढलो पण नंतर “आम्ही” जाऊन “मी” पणा वाढला, असे उद्धव ठाकरे म्हणाले. बाकी निवडणूक आयोग, मत चोरी, भाजप वगैरे बाताही त्यांनी मारल्या. पण त्यांच्या मुलाखतीतला मुख्य मुद्दा लोकसभा निवडणुकीतल्या यशाची डोक्यात हवा गेल्याचाच होता.
काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवारांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला दुजोरा दिला. लोकसभा निवडणुकीतल्या यशामुळे आमच्या प्रत्येकाच्या डोक्यात हवा गेली होती. प्रत्येकालाच मुख्यमंत्री व्हायची स्वप्ने पडत होती. आम्ही जागा वाटपाच्या चर्चेत महिनाभर वेळ घालवला. प्रत्यक्षात नीट जागावाटप झालेच नाही. उद्धवजी बोललेत ते बरोबर आहे. पण मी कुणाकडे बोट दाखवणार नाही असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यांच्यातल्या निवडणूक निकालाच्या तफावतीतले वास्तववादी वर्णन केले. त्यांनी राजकीय विधाने केली, तरी त्या वास्तवाकडे दुर्लक्ष केले नाही हे इथे महत्त्वाचे ठरले.
– पवारांच्या नेत्यांच्या डोक्यात हवा
पण लोकसभा निवडणुकीतल्या यशाची हवा फक्त उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या डोक्यात गेली असे नाही, तर ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आणि दस्तुरखुद्द विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या डोक्यातही गेली. पवारांच्या पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी जिंकून देखील थयथयाट केला होता. पवारांनी त्या थयथयाटाला हवा दिली होती. यापैकी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या डोक्यातली हवा अजितदादांनी परस्पर काढली, पण राहुल गांधींच्या डोक्यात गेलेली हवा कोण काढणार??, हा सवाल मात्र कायम राहिला.
– राहुल गांधींच्या डोक्यातली हवा
पण राहुल गांधींनी कुठल्या पुढचा मागचा विचार न करता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा मुद्दा देशभर तापविला. महाराष्ट्रात 76 लाख मतदार वाढले कुठून??, त्यांनी कोणाला मतदान केले??, वगैरे मुद्द्यांवर देशभर गदारोळ माजवून दिला. निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांनी जशी स्व पक्षांच्या चुकांची कबुली दिली तशी कबुली राहुल गांधींनी दिली नाही. त्या उलट ते भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यावरच आगपाखड करीत राहिले. पण याविषयी उद्धव ठाकरे किंवा विजय वडेट्टीवार काहीच बोलले नाहीत. त्यांनी फक्त महाराष्ट्र प्रदेश पातळी पुरती पराभवाच्या खऱ्या करणाची कबुली देऊन टाकली. त्यामुळे राहुल गांधींच्या डोक्यात गेलेली हवा तशीच राहिली. ती हवा कोण काढणार??, हा सवालही तसाच कायम राहिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App