विशेष प्रतिनिधी
नासिक : भारतीय सैन्य दलांनी पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा आज बदला घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक आणि ठोस कारवाई करत देशवासीयांचा आत्मविश्वास पुन्हा एकदा जागविला. दहशतवादी हल्ल्यात शेकडो निरपराध नागरिकांचा बळी घेणाऱ्या, अनाथ माता-भगिनींच्या कपाळावरील कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांच्या मनसुब्यांना सैन्य दलाने चोख प्रत्युत्तर दिले.Tribute with vermilion dedication: In memory of the brave martyrs
या पार्श्वभूमीवर, आज नासिकच्या पवित्र गोदावरी तीरावर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने एक आगळावेगळा आणि भावनिक उपक्रम घेतला. गंगा-गोदावरी मातेचे ललिता सहस्रनामाने कुंकवाने पूजन करण्यात आले. गोदा सेविकांनी आपल्या भावपूर्ण स्वरांनी सहस्रनामांचे पठण करत गोदामातेसमोर कुंकवाने अर्पण करून देशातील वीर जवानांना सामर्थ्य आणि बळ मिळावे यासाठी प्रार्थना केली.
या पूजनानंतर पूजेसाठी वापरण्यात आलेला सिंदूर सर्व उपस्थित महिलांना सन्मानपूर्वक वितरित करण्यात आला. या कुंकवामध्ये केवळ वैवाहिक सौभाग्य नव्हे, तर आपल्या देशासाठी शौर्याने लढणाऱ्या आणि बलिदान देणाऱ्या वीर जवानांचे स्मरण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होण्याची भावना सामावलेली होती.
समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले की,
“हा सिंदूर म्हणजे आपल्या शूर सैनिकांचे स्मरणचिन्ह आहे. कपाळावर याचे धारण म्हणजे त्यांच्या शौर्याला दिलेला एक मौन प्रणाम आहे. त्यांच्या मनोधैर्यास आधार देणारा, आणि त्यांच्या परिवारासाठी एक सामूहिक सहवेदनेचा श्वास आहे.”
या प्रसंगी नासिकमधील अनेक सेविका, ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या, सामाजिक संस्था व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोदातिरी दररोज गाजणाऱ्या आरतीच्या साक्षीने हा उपक्रम झाला, यामुळे या क्षणाला एक विशेष आध्यात्मिक साज लाभला.
देशासाठी शौर्य, संयम आणि बलिदानाची परंपरा जपणाऱ्या जवानांना ही लहानशी पण हृदयस्पर्शी श्रद्धांजली ठरेल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App