विशेष प्रतिनिधी
नागपूर : दुसऱ्या देशांवरची आपली निर्भरता कमी करण्यासाठी स्वदेशी आणि स्वावलंबन यांना पर्याय नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज संघ शताब्दीचा संदेश दिला. नागपुरातल्या रेशीम बागेत संघाचा विजयादशमी कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. मोहन भागवत यांचे मुख्य भाषण झाले. त्यांनी विविध विषयांवर संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. Mohan Bhagwat
– डॉ. मोहन भागवत म्हणाले :
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला आज शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, या विजयादशमी उत्सवानिमित्त आपण येथे जमलो आहोत. संयोगाने या वर्षी श्री गुरु तेग बहादूर महाराजांची ३५० वी पुण्यतिथी आहे. त्यांनी “हिन्द की चादर” बनून विदेशी,विधर्मी अत्याचारापासून हिंदू समाजाचे रक्षण केले. आज इंग्रजी कॅलेंडरनुसार स्वर्गीय महात्मा गांधींचा जन्मदिवस आहे.गांधीजी आपल्या स्वातंत्र्याच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक आहेत.स्वातंत्र्योत्तर ‘स्व’ आधारित भारताची संकल्पना दृढ करणाऱ्या तत्वज्ञानींमध्ये त्यांचे आदराचे स्थान आहे. तसेच आज आपले माजी पंतप्रधान, स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांचा देखील जन्मदिवस आहे. साधेपणा, विनम्रता, प्रामाणिकपणा आणि दृढतेचे उदाहरण होते.
– अविरत राष्ट्रसेवा, राष्ट्रभक्तीचे आणि समर्पणाचे हे उदात्त आदर्श आपल्या सर्वांसाठी अनुकरणीय आहेत. खऱ्या अर्थाने माणूस कसे बनायचे,जीवन कसे जगायचे याचे मार्गदर्शन आपल्याला या महापुरुषांकडून प्राप्त होते.
– आजची राष्ट्रीय आणि जागतिक परिस्थिती पाहता भारतीयांसाठीही वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्याने समृद्ध जीवनमार्गाची आवश्यकता आहे. गेल्या वर्षभरात स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपण ज्या मार्गावर चाललो आहोत त्याचा आढावा घेताना हे प्रकर्षाने जाणवते.
– वर्तमान परिदृश्य – आशा आणि आव्हाने
या गेल्या कालखंडात एकीकडे, आपला विश्वास व आशा अधिक बळकट केली आहे. दुसरीकडे, आपल्यासमोरील जुन्या आणि नवीन आव्हानांना स्पष्टपणे अधोरेखित करून कर्तव्याच्या निर्धारित मार्गाबाबत देखील मार्गदर्शन केले आहे.
गेल्या वर्षी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याने भारतभरातील भाविकांच्या संख्येच्या तसेच उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या बाबतीत सर्व विक्रम मोडून वैश्विक स्तरावर एक आदर्श प्रस्तुत केला. परिणामतः संपूर्ण भारतात श्रद्धा आणि एकतेची भावना निर्माण झाली.
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांना त्यांचा हिंदू धर्म विचारून त्यांची निर्मम हत्या करण्यात आली.त्यामुळे संपूर्ण देशात दुःख आणि संतापाची लाट उसळली. भारत सरकारने नियोजनबद्ध आखणी करून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. या कठीण प्रसंगात नेतृत्वाची स्थिरता, आमच्या सशस्त्र दलांचे शौर्य,रणनीती कौशल्य तसेच आपल्या समाजाच्या दृढतेचे, एकतेचे सकारात्मक दृश्य आपण पाहिले.या प्रसंगामुळे आपल्याला हे देखील जाणवले की, सर्वांशी मैत्रीपूर्ण धोरण राबवताना, आपण आपल्याला राष्ट्राच्या सुरक्षेबाबत अधिकाधिक सतर्क, सक्षम, समर्थ असले पाहिजे.
या निमित्ताने जगातील सर्व देशांनी घेतलेल्या धोरणात्मक कृतींवरून जगात आपले मित्र कोण आहेत, किती प्रमाणात आहेत याचीदेखील चाचणी झाली.
सरकार तसेच प्रशासनाच्या कठोर कारवाईमुळे, विचारसरणीतील पोकळपणा आणि क्रूरता अनुभवातून लोकांसमोर आल्याने देशातील अतिरेकी नक्षलवादी चळवळीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता आले आहे. त्या भागात नक्षलवादी उठावाची मूळ कारणे म्हणजे सतत होणारे शोषण,अन्याय, विकासाचा अभाव, सरकार आणि प्रशासनाकडून या मुद्द्यांबद्दल संवेदनशीलतेचा अभाव आता दूर झाला आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाला त्या भागात न्याय, विकास, सद्भावना, करुणा आणि सुसंवाद स्थापित करण्यासाठी एक व्यापक योजना विकसित करावी लागणार आहे.
आर्थिक क्षेत्रातही प्रचलित परिमाणांवर आधारित आपली आर्थिक उन्नती होत आहे असे म्हणता येईल. आपल्या देशाला जागतिक प्रगतिशील अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सामान्य जनतेमध्ये असलेला उत्साह आपल्या उद्योगात विशेषतः नवीन पिढीमध्ये प्रकर्षाने दिसून येतो. तथापि, या सध्याच्या आर्थिक व्यवस्थेच्या रचनेमुळे श्रीमंत आणि गरिब यामधील दरी वाढत आहे.आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण झाले आहे. शोषकांसाठी अधिक सुरक्षित असलेल्या शोषणाची एक नवीन व्यवस्था स्थापन झाली आहे. पर्यायाने पर्यावरणाचे नुकसान झाले आहे व मानवी संवादात व्यावसायिकता,अमानुषता वाढली आहे. अमेरिकेने स्वतःच्या स्वार्थासाठी अलिकडेच लागू केलेले आयात शुल्क धोरण आपल्याला काही पैलूंवर पुनर्विचार करण्यास नक्कीच भाग पाडणार आहे. जग परस्परावलंबनावर चालते. तथापि वैश्विक जीवनाची एकता लक्षात घेऊन स्वावलंबी होऊन जीवन जगणे आवश्यक आहे. दुसऱ्या देशांवर असलेली आपली निर्भरता कमी करण्यासाठी स्वदेशी तथा स्वावलंबनाला दुसरा पर्याय नाही.
जगभरात प्रचलित असलेल्या भौतिकवादी आणि उपभोगवादी विकास धोरणाचे प्रतिकूल परिणाम जगभरात दिसून येताहेत. ते अधिकाधिक गडद देखील होत आहेत. भारतातही याच धोरणामुळे गेल्या तीन ते चार वर्षांत अनियमित आणि स्वैर पाऊस, भूस्खलन आणि हिमनद्या सुकण्यासारखी उदाहरणे दिसून आली आहेत. दक्षिण आशियातील पुष्कळसा जलस्रोत हिमालयातून येतो. हिमालयात या आपत्तींची घटना भारत आणि दक्षिण आशियातील इतर देशांसाठी एक धोक्याचा इशारा आहे.
अलिकडच्या काळात, आपल्या शेजारील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता आहे. श्रीलंका, बांगलादेश पाठोपाठ नेपाळमध्ये सत्तांतरास कारणीभूत ठरलेल्या जनतेचा हिंसक उद्रेक चिंताजनक आहे.अशा अशांतता निर्माण करू पाहणाऱ्या शक्ती भारतात तसेच जागतिक स्तरावर सक्रिय आहेत. सरकार आणि प्रशासनाचे समाजापासून, समाजाच्या प्रश्नांपासून दुर्लक्ष, कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रशासकीय प्रक्रियांचा अभाव ही असंतोषाची नैसर्गिक कारणे आहेत. तथापि हिंसक उद्रेकांमध्ये इच्छित बदल घडवून आणण्याची शक्ती नसते. केवळ लोकशाही मार्गांनीच समाज आमूलाग्र बदल साध्य करू शकतो. हिंसक घटनांमुळे जागतिक वर्चस्ववादी शक्तींना गैरफायदा घेण्याची संधी मिळण्याची शक्यता असते. आपले शेजारी देश सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी जोडलेले आहेत. एक प्रकारे, ते आपले कुटुंबीयच आहेत. या देशात शांतता, स्थैर्य राहणे आणि त्यांची प्रगती होत समृद्धी येणे भारताच्या समृद्धीसाठी आवश्यक आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानातील जगातली प्रगती, मानवी जीवनाला आरामदायी बनवणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग, नवनवीन सोयी सुविधा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे राष्ट्रांमधील वाढलेली जवळीक, या सर्व गोष्टी वैश्विक सुखद परिस्थिती असल्याचे भासते. तथापि विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा वेग आणि मानव त्यांच्याशी जुळवून घेत असलेल्या गतीमध्ये एक महत्त्वपूर्ण अंतर आहे.परिणामी सर्व सामान्य लोकांच्या जीवनात असंख्य समस्या उद्भवत आहेत.सध्या सुरु असलेली युद्धे,इतर लहान मोठे संघर्ष, पर्यावरणीय ऱ्हासामुळे निसर्गाचा होणार कोप, समाज व कुटुंबांचे विघटन, नागरी जीवनात वाढता भ्रष्टाचार, अत्याचार या देखील भयावह आहेत.या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न देखील केले गेले आहेत. परंतु ते त्यांची वाढ थांबवण्यात अथवा संपूर्ण उपाय प्रदान करण्यात अयशस्वी ठरले आहेत. विकृत, परस्परविरोधी विचारांना आश्रय देणाऱ्या शक्तींचे संकट, जे संबंध मानवतेत कलह आणि हिंसाचार वाढवत असताना, भविष्यात या समस्यांचे निराकरण होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारतातही आपण कमी-अधिक प्रमाणात या परिस्थितीचा अनुभवत आहोत. आता जग भारतीय जीवनविषयक धारणांच्या माध्यमातून जगासमोर निर्माण झालेल्या भीषण समस्यांचे निराकरण शोधत आहे.
आपल्या सर्वांना आशा, आत्मविश्वास देणारी गोष्ट म्हणजे आपल्या देशात विशेषतः नवीन पिढीमध्ये, देशभक्ती, श्रद्धा आणि आपल्या संस्कृतीवरील विश्वासाची भावना सतत वाढत आहे. विविध धार्मिक आणि सामाजिक संघटना,व्यक्ती ज्यामध्ये स्वयंसेवकांचा देखील समावेश आहे. तरुणाई वंचितांची निःस्वार्थपणे सेवा करण्यासाठी पुढे येत आहेत. यामुळे सामुदायिक सक्षमीकरणाची भावना, स्वतःच्या पुढाकाराने समस्या सोडवण्याची आणि गरजा पूर्ण करण्याची तरुणांची क्षमता आपसूक वाढत आहे.संघ स्वयंसेवकांना समाज हिताच्या कामात थेट सहभागी होण्याची वाढती इच्छा अनुभवायला मिळते. समाजातील बुद्धिजीवींमध्ये देखील आपल्या देशाच्या स्वरूप, गरजा, मानवी जीवन दृष्टिकोनांवर आधारित बाबींवर सखोल अभ्यास,शोध सुरु आहे.
भारतीय चिंतन दृष्टी..
स्वामी विवेकानंदांपासून ते महात्मा गांधी, दीनदयाळ उपाध्याय, राम मनोहर लोहियांसह आपल्या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व महापुरुषांनी भारत आणि जगाची भारतीय दृष्टिकोनातून संकल्पना मांडणाऱ्या आपल्या सर्व आधुनिक विचारवंतांनी वरील समस्या सोडवल्या आहेत. एकाच समान दिशेने निर्देश केले आहेत. आधुनिक जगाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्ण चुकीचा नाही तर तो अपूर्ण आहे. म्हणूनच मानवी भौतिक विकास प्रत्येकासाठी नव्हे, तर काही देशांसाठी विशिष्ट वर्गांसाठी प्रगती करत असल्याचे दिसून येते. काही अभ्यासक म्हणतात की जर भारताला अमेरिकेसारखे तथाकथित समृद्ध आणि प्रगत भौतिक जीवन जगायचे असेल तर त्याला आणखी नव्या पाच पृथ्वी लागतील. या सध्याच्या व्यवस्थेतून भौतिक विकासासोबत मानवतेचा मानसिक आणि नैतिक विकास झालेला नाही. म्हणूनच, प्रगतीसोबतच नवनवीन समस्या उद्भवत आहेत ज्यामुळे मानवता पर्यायाने विश्वाचे भवितव्य धोक्यात आले आहे. याचे कारण दृष्टीची अपूर्णता आहे!
आपल्या सनातन, आध्यात्मिक, समग्र आणि एकात्मिक दृष्टिकोनात मानवतेच्या भौतिक विकासासोबतच मन, बुद्धी आणि अध्यात्म दोन्ही विकसित करण्याची अनुपम शक्ती आहे. आपल्या चिरंतन व्यवस्थेत व्यक्ती असो वा मानवी समुदाय विश्वाचा विकास करण्याची; मानवी गरजा आणि इच्छांनुसार आर्थिक परिस्थिती विकसित करण्याची; स्वतःच्या समुदाय व विश्वाबद्दल कर्तव्याची भावना विकसित करण्याची; महत्वाचे म्हणजे सर्वांमध्ये आपलेपणाची भावना अनुभवण्याची शक्ती आहे. कारण आपण जोडणारा घटक ओळखला आहे. ज्याच्या आधारे हजारो वर्षांपासून, आपण या जगात एक सुंदर, समृद्ध आणि यशस्वी जीवन स्थापित केले आहे, परस्परसंबंध ओळखला आहे आणि मानवता व विश्व यांच्यातील सहकार्यात्मक जीवन आहे. या समग्र आणि एकात्मिक दृष्टिकोनावर आधारित, जगाला एका नवीन निर्मितीची आवश्यकता आहे जी आजच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम आणि जगासमोरील समस्यांवर शाश्वत उपाय प्रदान करते. नियतीने भारतीयांना आपल्या उदाहरणाद्वारे त्या निर्मितीचे एक अनुकरणीय उदाहरण जगाला प्रदान करण्याची आवश्यकता आहे.
संघाचे चिंतन..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या कार्याचे शतक पूर्ण केले आहे. संघाची विचारसरणी आणि मूल्ये आत्मसात करून, स्वयंसेवक सामाजिक जीवनाच्या विविध आयामांमध्ये, स्थानिक ते राष्ट्रीय पातळीपर्यंत विविध संघटना आणि संस्थांमध्ये सक्रिय आहेत. स्वयंसेवक सामाजिक जीवनात सक्रिय असलेल्या इतर अनेक व्यक्तींशी सहयोग आणि संवाद साधतात. स्वयंसेवकांच्या संचित अनुभवांच्या आधारे संघाने काही निरीक्षणे आणि निष्कर्ष काढले आहेत.
1) भारताच्या उत्थानाची प्रक्रिया वेगाने घडते आहे. तथापि आपण अजूनही त्याच धोरणांच्या, व्यवस्थांच्या चौकटीत राहूनच विचार करत आहोत, ज्याची अपूर्णता आज आपण पाहत असलेल्या परिणामांवरून दिसून येते. हे खरे आहे की आपण जगासोबत इतके पुढे गेलो आहोत की अचानक बदल करणे आता शक्य होणार नाही. आपल्याला हळू हळू पाऊले टाकावे लागतील. परंतु जगासमोरील समस्या ज्यामध्ये आपल्या स्वतःच्या समस्या आणि भविष्यातील संकटे यांचा समावेश आहे ते टाळण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. आपल्या समग्र आणि एकात्मिक दृष्टिकोनावर आधारित आपला स्वतःचा विकास मार्ग आखून आपण जगासमोर एक गौरवशाली उदाहरण प्रस्तुत केले पाहिजे. अर्थ आणि कामाच्या मागे लागलेल्या जगाला अशा धर्माचा मार्ग दाखवला पाहिजे जो कर्मकांड आणि रीतिरिवाजांच्या पलीकडे जावुन सर्वांना एकत्र आणतो, सर्वांना सोबत घेऊन पुढे मार्गक्रमण करतो. महत्वाचे म्हणजे इतरांच्या प्रगतीला प्रोत्साहन देतो.
2) संपूर्ण राष्ट्राची अशी आदर्श प्रतिमा जगासमोर मांडण्याचे काम केवळ देशाच्या व्यवस्थांपुरते मर्यादित नाही. कारण व्यवस्थांची स्वतःला बदलण्याची कार्यक्षमता आणि इच्छा मर्यादित आहे. या सर्व व्यवस्थांची प्रेरणा व नियंत्रण समाजाच्या प्रबळ इच्छाशक्तीवर आधारित आहे. म्हणून व्यवस्थात्मक बदलासाठी, समाजाचे प्रबोधन वर्तनात परिवर्तन ही व्यवस्थात्मक बदलाची पूर्वअट आहे. सामाजिक वर्तनात बदल केवळ भाषणे किंवा ग्रंथांमधून येत नाही. त्याकरिता समाजाचे व्यापक प्रबोधन आवश्यक आहे. जे समाजाचे प्रबोधन करतात त्यांनी स्वतः बदलाचे एक उदाहरण बनले पाहिजे. समाजात सर्वत्र अनुकरणीय व्यक्ती असाव्यात जे त्यांच्या जीवनात पारदर्शक आणि निस्वार्थीपणे जगतात आणि जे समाजाशी त्यांच्या दैनंदिन संवादात संपूर्ण समाजाला आपले मानतात. आपल्याला अशा स्थानिक सामाजिक नेतृत्वाची नितांत आवश्यकता आहे जे समाजातील प्रत्येकासोबत राहून त्यांच्या उदाहरणाने समाजाला प्रेरित करू शकतील. वैयक्तिक विकासाद्वारे सामाजिक परिवर्तन व सामाजिक बदलाद्वारे व्यवस्था परिवर्तन हा देश आणि जगात बदल घडवून आणण्याचा यथायोग्य मार्ग आहे. हा स्वयंसेवकांचा अनुभव आहे.
3) अशा व्यक्ती निर्माण करण्याच्या व्यवस्था विविध समाजांमध्ये असतेच. आपल्या समाजात आक्रमणाच्या दीर्घ कालखंडात या व्यवस्था कोसळल्या. त्यांचे स्वरूप देखील बदलले.घर, शिक्षण व्यवस्था आणि सामाजिक उपक्रमांमध्ये काळाच्या अनुरूप व्यवस्था पुन्हा स्थापित करणे आवश्यक आहे. हे काम करू शकणाऱ्या व्यक्ती आपल्याला तयार कराव्या लागतील. व्यक्ती निर्माणाची संकल्पना मन आणि बुद्धीने स्वीकारल्यानंतरही, ती आचरणात आणण्यासाठी, मन,वचन आणि कृतीच्या सवयी बदलाव्या लागतात यासाठी एक व्यवस्था आवश्यक आहे. संघाची शाखा ही ती व्यवस्था आहे. शंभर वर्षांपासून, ही व्यवस्था संघाच्या स्वयंसेवकांनी बिकट परिस्थितीत देखील त्यात सातत्य राखले आहे आणि भविष्यातही ती तशीच चालू ठेवली जाईल.स्वयंसेवकांनी दैनंदिन शाखा कार्यक्रमांमध्ये परिश्रमपूर्वक भाग घेतला पाहिजे व त्यांच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संघाची शाखा वैयक्तिक सद्गुण आणि सामूहिकता जोपासण्यासाठी, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन, सहकार्य करून समाजात सद्गुण आणि सामूहिकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी आहे.
4) कोणत्याही देशाच्या उत्थानासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्या समाजातील ऐक्य भावना. आपला देश विविधतेने नटलेला आहे. भौगोलिक विविधतेमुळे, अनेक भाषा, अनेक पंथ, विविध प्रकारची जीवनशैली, अनुपम अशी खाद्य संस्कृती, जाती उपजातींचा त्यात समावेश आहे.गेल्या हजारों वर्षांपासून, काही विदेशी संप्रदाय भारताबाहेरील देशांमधून आले. परदेशी लोक आता निघून गेले असले तरी, आपले स्वतःचे बांधव, ज्यांनी त्या पंथांना स्वीकारले आणि विविध कारणांमुळे त्यांचे अनुसरण केले ते अजूनही भारतात अस्तित्वात आहेत. भारताच्या सनातन परंपरेत या सर्वांचे स्वागत आणि स्वीकार केला आहे. आपण त्यांना आपल्यापेक्षा वेगळे मानत नाही. आपण आपल्या विविधतेला आपले स्वतःचे वेगळेपण मानतो.तथापि, ही विशिष्टता विभाजनाचे कारण बनू नये. आपल्या देशात विविधता असूनही, आपण सर्व एका मोठ्या समाजाचा भाग आहोत. समाज, देश, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून आपण एक आहोत. ही मोठी ओळख आपल्यासाठी सर्वोपरि आहे, आपण ती नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे. परिणामी, समाजात प्रत्येकाचा एकमेकांशी संवाद सुसंवादी आणि संयमी असावा. प्रत्येकाचे स्वतःचे श्रद्धास्थाने, महापुरुष आणि प्रार्थनास्थळे असतात. विचार, शब्द आणि कृतीतून त्यांचा अनादर होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे.त्याकरिता प्रबोधनाची गरज आहे. नियमांचे पालन करणे,सुसंवादाने वागणे हा आपला स्वभाव बनला पाहिजे. लहान-मोठ्या बाबींवरून किंवा केवळ संशयावरून कायदा हातात घेणे, गुंडगिरी, हिंसाचार करणे ही योग्य पद्धत नाही. अशा घटना पूर्वकल्पित कल्पनेने किंवा एखाद्या विशिष्ट समुदायाला चिथावणी देण्यासाठी शक्ती प्रदर्शित करण्यासाठी घडवल्या जातात. त्यांच्या जाळ्यात अडकले जाणे तात्काळ आणि दीर्घकालीन ध्येयासाठी हानिकारक आहे. अश्या समाज विघातक प्रवृत्तींना आळा घालणे आवश्यक आहे. सरकार आणि प्रशासनाने पक्षपात न करता, दबावाला बळी न पडता नियमांनुसार आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत.समाजातील सज्जनशक्ती आणि तरुण पिढीने देखील सतर्क, संघटित राहून आवश्यकतेनुसार हस्तक्षेप केला पाहिजे.
5) डॉ. आंबेडकरांनी एकतेचा पाया “अंतर्भूत सांस्कृतिक एकता” असे म्हटले. प्राचीन काळापासून भारताचे वैशिष्ट्य असलेली भारतीय संस्कृती सर्वसमावेशक आहे. ती आपल्याला सर्व विविधतेचा आदर आणि सन्मान करण्यास शिकवते.भारतीय संस्कृती आध्यात्मिकता,करुणा,पवित्रता आणि तपस्या अर्थात धर्म या गुणांवर आधारित आहे. या राष्ट्राचे पुत्र असलेल्या हिंदू समुदायाने पारंपारिकपणे ही संस्कृती त्यांच्या आचरणाने जपली आहे, म्हणूनच तिला हिंदू संस्कृती असेही म्हणतात. प्राचीन भारतात, ऋषीमुनींनी त्यांच्या तपस्वी ज्ञानाच्या,योगसाधनेच्या जोरावर ती जपली आहे. भारताच्या समृद्ध आणि सुरक्षित वातावरणामुळे त्यांना हे साध्य करता आले. आपल्या पूर्वजांच्या कठोर परिश्रम, त्याग आणि समर्पणामुळे ही संस्कृती भरभराटीला आली व आज आपल्यापर्यंत अखंड पोहोचली आहे. त्या चिरंजीवी संस्कृतीचे आचरण,आपल्या पूर्वजांचे आदर्श म्हणून संस्कृतीचे विवेकपूर्ण अनुकरण आवश्यक आहे.आपल्या पवित्र मातृभूमीवरील भक्ती, एकत्रितपणे आपले राष्ट्रप्रेम निर्माण करते. विविधतेसाठी पूर्ण स्वीकृती, आदराने सर्वांना एकत्र आणणारे हे हिंदू राष्ट्रप्रेम आपल्याला नेहमीच एकसंध ठेवत आलं आहे. आपल्याकडे ‘राष्ट्रराज्य’ ही संकल्पना नाही. राज्ये येतात आणि जातात, पण राष्ट्र कायमचे टिकते. आपण आपल्या एकतेचा हा पाया कधीही विसरता कामा नये.
6) संपूर्ण हिंदू समाजाचे बळ संपन्न, सद्गुणी आणि संघटित स्वरूप हे या राष्ट्राच्या एकता, अखंडता, विकास आणि सुरक्षिततेची हमी आहे. हिंदू समाज हा या देशासाठी उत्तरदायी असलेला समाज आहे, हिंदू समाज सर्वसमावेशक आहे. वर उल्लेख केलेली विविध नावे,रूपे पाहता, स्वतःला वेगळे मानणे आणि मानवांमध्ये विभाजन किंवा वियोग निर्माण करणे, “आपण आणि ते” या मानसिकतेपासून मुक्त आहे आणि मुक्त राहील.हिंदू समाज हा “वसुधैव कुटुंबकम” या सर्वसामावेशी विचारसरणीचा प्रवर्तक तथा संरक्षक आहे. म्हणूनच, भारताला समृद्ध बनवणे संपूर्ण जगाला त्याचे अपेक्षित आणि योग्य योगदान देणारा देश बनवणे हे हिंदू समाजाचे कर्तव्य आहे. जगाला एक नवीन मार्ग दाखवू शकणाऱ्या धर्माचे रक्षण करताना, भारताला समृद्ध बनवण्याच्या संकल्पाने, संघ आपल्या संघटित कार्यबलाद्वारे संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करण्याचे काम करत आहे. एक संघटित समाज स्वतःच्या बळावर आपली सर्व कर्तव्ये पूर्ण करतो. त्यासाठी इतर कोणालाही वेगळे काहीही करण्याची आवश्यकता भासत नाही.
7) जर समाजाचे वरील चित्र प्रत्यक्षात आणायचे असेल, तर व्यक्तींमध्ये व समूहांमध्ये वैयक्तिक, राष्ट्रीय दोन्ही चारित्र्य सुदृढ करणे आवश्यक आहे. संघ शाखेत आपल्या राष्ट्राच्या चारित्र्याबद्दल स्पष्ट दृष्टी, अभिमान निर्माण होतो. शाखेत आयोजित केले जाणारे दैनंदिन कार्यक्रम स्वयंसेवकांमध्ये व्यक्तिमत्व, कर्तृत्व, नेतृत्व, भक्ती आणि समज विकसित करतात.
म्हणूनच, शताब्दी वर्षात, व्यक्तिमत्व विकासाचे कार्य देशात भौगोलिकदृष्ट्या व्यापक होऊन स्वयंसेवकांच्या उदाहरणाद्वारे सामाजिक वर्तनात उत्स्फूर्त बदल घडवून आणणारा पंच परिवर्तन कार्यक्रम व्यापक व्हावा यासाठी संघ प्रयत्नशील राहणार आहे.या कार्यक्रमाचे उद्दिष्ट व्यक्ती आणि कुटुंबांना या पाच क्षेत्रांमध्ये त्यांच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी सक्रियपणे सहभागी करून घेणे आहे. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्व बोध आणि स्वदेशी आणि नियम, कायदे, नागरिक अनुशासन आणि संविधानाचे पालन करणे काळाची गरज आहे. या कार्यक्रमात समाविष्ट केलेल्या कृती दैनंदिन आचरणात आणण्यासाठी सोप्या आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून संघाच्या कार्यक्रमांमध्ये वेळोवेळी या कार्यक्रमांवर तपशीलवार चर्चा करण्यात आली आहे. संघाच्या स्वयंसेवकांव्यतिरिक्त, समाजातील इतर अनेक संस्था आणि व्यक्ती देखील असेच कार्यक्रम राबवत आहेत. संघाचे स्वयंसेवक त्यांच्याशी सहयोग साधून समन्वयाचे कार्य करत आहेत.
जगाच्या इतिहासात भारताचे वेळोवेळी महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे असा जागतिक धर्म प्रदान करणे ज्याने जगाचे हरवलेले संतुलन पुनर्संचयित केले व जागतिक जीवनात संयम आणि प्रतिष्ठेची भावना निर्माण केली. आपल्या पूर्वजांनी भारतात राहणाऱ्या विविध समाजांना एकत्र केले आणि हे कर्तव्य वारंवार पूर्ण करण्यासाठी सदैव जागरूक केले. स्वतंत्र भारताच्या समृद्धी आणि संभाव्य विकासाच्या नवोत्थानाचे हे चित्र होते जे आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे आणि राष्ट्रीय पुनर्जागरणाचे प्रणेत्यांसमोर होते. आपल्या बंगाल प्रांताचे माजी संघचालक, स्वर्गीय केशवचंद्र चक्रवर्ती यांनी त्याचे वर्णन सुंदर काव्यात्मक ओळींमध्ये केले आहे ते पुढीलप्रमाणे..
बाली सिंघल जबद्वीपे प्रांतर माझे उठे। कोतो मठ कोतो मन्दिर कोतो प्रस्तरे फूल फोटे ।। तादेर मुखेर मधुमय बानी सुने थेमें जाय सब हानाहानी । अभ्युदयेर सभ्यता जागे विश्वेर घरे-घरे ।।
(भारतीय संस्कृतीचा प्रभाव सिलोन आणि जावा बेटांपर्यंत पसरला होता. जागो जागी मठ आणि मंदिरे होती, जिथे जीवनाचा सुगंध फुलांसारखा दरवळत होता. भारताचे मधुर आणि ज्ञानमयी वाणी ऐकल्याने इतर देशांमधील शत्रुत्व आणि अशांतता दूर होत असे.)
चला, भारताचे हे आत्मस्वरूप, सार आजच्या काळ, स्थळ आणि परिस्थितीशी सुसंगत पद्धतीने आपण जगात भारतीय ओळख पुन्हा स्थापित करू या. आपल्या पूर्वजांनी आपल्यावर सोपवलेले हे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तसेच जगाच्या सध्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, विजयादशमीच्या या शुभ प्रसंगी आपण सर्वजण एकत्र येऊया..सीमोल्लंघन करून आपल्या कर्तव्यपथावर मार्गक्रमण करू या…!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App