विनायक ढेरे
नाशिक : नको काका, नको पुतण्या; तुम्ही कितीही पैसे वाटा, आम्ही मात्र घरात काढणार झोपा!! असा स्पष्ट संदेश देऊन बारामतीकरांनी आज स्वतःहून मतदानाची टक्केवारी घसरवली. बारामतीत निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकड्यानुसार सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत फक्त 45.68 % मतदानाची नोंद झाली.
बारामतीतल्या काका पुतण्यांच्या भांडणाला कंटाळून बारामतीचा मतदार आज घरी बसला एरवी बारामतीत 60 – 65 % च्या वर मतदान होत असताना आज मात्र ते 50 % च्या खाली आले. ज्यावेळी पवार काका – पुतणे एकमेकांविरुद्ध हिरीरीने मैदानात उतरले होते, त्यावेळी या दोघांकडेही बारामतीच्या मतदारांनी पाठ फिरवली.
पवार काका – पुतणे या दोघांनीही बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत अतिशय प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे दोन्ही बाजू आपापली राजकीय सैन्ये मैदानात उतरवणार आणि जास्तीत जास्त मतदान आपल्याकडे खेचून घेणार, असे वाटत असताना प्रत्यक्षात पवार काका – पुतण्याची सैन्ये मैदानात उतरलेली दिसली, पण बारामतीकर मतदारांनी मात्र त्यांच्याकडे पूर्ण पाठ फिरवली. पवार काका पुतण्या, नणंद – भावजय या सगळ्यांना बारामतीकरांनी थेट नकार दिला आणि मतदान करण्याऐवजी ते घरात बसून राहिले.
कोणी कोणाला मतदान केले??, हे कोणी विचारले, तर त्याचे उत्तर देता येणे कठीण पडेल म्हणून बारामतीकरांनी मतदान करण्याऐवजी मतदानाकडे पाठ फिरवली, अशी मखलाशी काही मराठी माध्यमांनी केली परंतु त्यामध्ये पवारांची राजकीय इभ्रत झाकून ठेवण्याखेरीज दुसरा कोणताही मुद्दा नव्हता.
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. ते शरद पवारांपासून बाजूला झाले म्हणून बारामतीकर संतापले आणि त्वेषाने घराबाहेर पडून त्यांनी मतदान केले, असे चित्र दिसेल असा आभास मराठी माध्यमांनी निर्माण केला होता. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही.
त्या उलट समोरचे तुम्हाला भावनेच्या लाटेत वाहून नेतील. ते भावनिक होतील. काहीतरी नाटक करतील तुम्ही त्या नाटकाला भुलू नका. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. भविष्याचा विचार करा. बारामतीच्या विकासाचा विचार करा, असे आवाहन अजित पवारांनी केले होते. मात्र, त्या आवाहनाला देखील फार मोठा प्रतिसाद देऊन बारामतीकर मतदानासाठी बाहेर पडल्याचे चित्र दिसले नाही.
बारामती शहर आणि तालुका सोडून अन्यत्र काही मतदारसंघात लोकांनी कमळ शोधण्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या. मतदान यंत्रांवर कमळ चिन्ह नव्हते म्हणून मतदान कमी झाले, असाही दावा काही माध्यमांनी केला. परंतु कमळ असो, वा घड्याळ किंवा तुतारी बारामतीकरांनी मतदानाला यायचेच नाकरून पवार काका – पुतण्यांचे भांडण आणि राजकारण दोन्ही नाकारले हे 50 % कमी मार्कांवरून सिद्ध झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App