नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवारांना निरोप देताच त्यांच्या राजकीय वारसाचा प्रश्न ऐरणीवर आला असून सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार यांचे राजकीय भवितव्य आता आणि विशिष्ट निर्णयाक वळणावर आले आहे.
अजित पवारांचा राजकीय वारसा चालवण्यासाठी पवार कुटुंब नेमके कुणाला पुढे करणार, याची चर्चा राज्यभर सुरू झाली असून त्याची सुरुवात राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी करून दिली. सुनेत्रा पवारांना राज्याचे उपमुख्यमंत्री करावे, अशी सगळ्या कार्यकर्त्यांची आणि जनतेची मागणी असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले.
– माध्यमांनी सुप्रिया सुळेंचेच नाव पुढे केले
पण त्याच वेळी गेल्या दोन दिवसांमध्ये मराठी माध्यमांनी ज्या प्रकारे बातम्या चालवल्यात त्यानुसार सुनेत्रा पवार यांच्यापेक्षा सुप्रिया सुळेंनाच त्यामध्ये जास्ती महत्त्व दिले असून अजित पवारांच्या जाण्यानंतर सुप्रिया सुळेंनी सगळ्या पवार कुटुंबाला सावरले, असा दावा करणाऱ्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला, तेव्हा शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत होत्या. सुनेत्रा पवारांना दिल्लीतून बारामतीला आणण्यात आणि त्यानंतर सुद्धा सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला. राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीतल्या रुग्णालयात जाऊन सुनेत्रा पवारांची भेट घेतली. हे तीनही नेते सुनेत्रा पवारांची भेट घेत असताना सुरुवातीला सुप्रिया सुळे तिथे नव्हत्या. त्या नंतर या भेटीच्या खोलीत पोहोचल्या होत्या. तिथे त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही बातचीत केली. या भेटीच्या वेळी सुनेत्रा पवार निःशब्द हात जोडून बसल्या होत्या.
त्यानंतर आज सुद्धा सुप्रिया सुळे यांनीच काही गोष्टी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. अजित पवारांचे सगळे विधी जरी पार्थ पवार आणि जय पवार यांनी केले असले तरी त्यांचे संचलन कुठेतरी मागून सुप्रिया सुळे करत होत्या, हेच मराठी माध्यमांनी त्यांच्या बातम्यांमधून दाखविले होते.
– अमित शाह, नितीन नवीन उपस्थित
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे आज बारामतीत उपस्थित राहिले. संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिल्याने ते बारामतीला आले नाहीत. अमित शाह आणि नितीन नवीन यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले त्याचबरोबर अन्य पवार कुटुंबीयांची सुद्धा त्यांनी भेट घेतली.
– मोदी – शाह यांचाच निर्णय महत्वाचा
या सगळ्या घडामोडी आणि बातम्यांमधून अजित पवारांचा राजकीय वारसा सुनेत्रा पवार चालवणार की पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांनाच पुढे करणार??, याविषयीची चर्चा आता ऐरणीवर आली आहे. या चर्चेला नरहरी झिरवाळ यांनी तोंड फोडले असले, तरी त्या संदर्भातला निर्णय स्वतः शरद पवार आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हेच घेतील. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात आता जे निर्णायक वळण आले आहे, त्यामध्ये एकटे पवार निर्णय घेऊ शकणार नाहीत, तर त्यांच्यापेक्षाही निर्णायक वाटा हा मोदी, शाह आणि नितीन नवीन यांचा असेल. कारण मुद्दा जरी अजित पवारांचा राजकीय वारसा निवडण्याचा असला तरी तो निवडण्याची स्वयंभू आणि स्वतंत्र क्षमता पवारांमध्ये उरलेली नाही. त्या क्षमतेत मोदी आणि शाह यांचा सिंहाचा वाटा निर्माण झालाय. तो त्यांनी आधीच निर्माण करून ठेवलाय. त्यामुळे मोदी आणि शाह हे जो निर्णय घेतील निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App