बरोबरच आहे राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट फडणवीस कशाला लिहून देतील??, पण…, हे शीर्षक काही सहज सुचलेले नाही. राज ठाकरेंनी मीरा-भाईंदर मध्ये केलेल्या भाषणातूनच हेच शीर्षक सूचले. कारण त्यांनी स्वतःच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला कशाला स्क्रिप्ट लिहून देतील??, कुठला स्क्रिप्ट रायटर स्वतःच्या अपमानाची स्क्रिप्ट लिहील का??, असा असा सवाल केला. तो सवालही बरोबरच आहे.
शिवाय राज ठाकरे यांची भाषेवरची पकड आणि एकूणच ठाकरे कुटुंबीयांचे भाषा प्रेम आणि भाषेवरची पकड हे लक्षात घेता, त्यांना इतरांनी कोणी स्क्रिप्ट लिहून द्यायची गरजच नाही. हा इतिहास आणि वर्तमान आहे. भविष्यातले कुणाला माहिती नाही, पण राज ठाकरे यांना मूळात आपली स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिली नाही हे सांगावे तरी का लागले??, यातच खरी महाराष्ट्रातल्या राजकारणाची “कळ” फिरली आहे. कारण महाराष्ट्रात असे perception पसरले आहे की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ऐक्याचे स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेय. कारण त्यांना एकाच वेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवरचे अवलंबित्व संपवून नव्या पद्धतीने महाराष्ट्राचे राजकारण चालवायचे आहे. थोडक्यात म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना एकाच वेळी शिंदे – ठाकरे – पवार या तिघांनाही खेळवायचे आहे!!
अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणातली सध्याची गुंतागुंत पाहता हे perception जसेच्या तसे खरे मानायचेही कारण नाही. पण आज देवेंद्र फडणवीस हे सत्ताधारी आहेत आणि त्यांच्या हातामध्ये सगळी सत्ता एकवटली आहे. त्यामुळे काही प्रमाणात हे perception खरे देखील आहे.
– फडणवीसांचे श्रेय
अर्थात राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट त्यांनीच सांगितल्याप्रमाणे फडणवीस यांनी लिहिलेली नसेल, पण त्यांच्या भाषणातला मराठी विरुद्ध हिंदी हा मुद्दा तर देवेंद्र फडणवीसांनीच लावून धरला. किंबहुना त्यांनी ज्या पद्धतीने हिंदी सक्तीचा मुद्दा सुरवातीला पुढे रेटला म्हणून तर ठाकरे बंधूंना ऐक्याची उबळ आली आणि निदान स्टेजवर तरी एकत्र येऊन त्यांना ती दाखवून द्यावी लागली. इतरांना जे जमले नाही, ते फडणवीसांना जमले हे राज ठाकरेंनीच ऐक्याच्या मेळाव्यात बोलून दाखविले.
याचा अर्थ असा की फडणवीसांनी भले राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट लिहिली नसेल, पण त्यातले मुद्दे किंबहुना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकीच्या किंवा बेकीच्या राजकारणाचे पुढचे घोडे तर फडणवीस दामटवणार आहेत, त्यामुळे त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट लिहिली काय किंवा न लिहिली काय, त्याने काय फरक पडणार आहे??
– फडणवीसांना फॉलो करावे लागतेय
महाराष्ट्राच्या राजकारणातली आजची वस्तुस्थिती हीच आहे की, देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातले सगळे महत्त्वाचे मुद्दे ठरवतायेत आणि बाकीच्यांना त्यांना फॉलो करावे लागतेय. अर्थात हे एका रात्रीत किंवा एका दिवसात घडलेले नाही. त्यासाठी संघ आणि भाजप नावाची प्रचंड यंत्रणा राबली. त्यातून देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व उभे राहिले. म्हणूनच ते असे एकमेकांना खेळवायच्या गोष्टी करू लागले. राज ठाकरेंना ऐक्याचे श्रेय फडणवीसांना द्यावे लागले, पण त्याचबरोबर फडणवीस आपली स्क्रिप्ट लिहीत नाहीत हे महाराष्ट्राला जाहीरपणे सांगावे लागले. बाळासाहेब ठाकरे यांना कधीही कुणाच्याही बाबतीत असे काही सांगावे लागले नाही. ही बाब येथे अधोरेखित करून सांगितली पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App