विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नरेश म्हस्केंना उमेदवारीची लॉटरी लागली पण अजून नाशिकची उमेदवारी मात्र अडलेलीच राहिली. महायुतीत भाजपने अखेर ठाण्याची जागा एकनाथ शिंदे यांना सोडली त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील इच्छुकांच्या एकत्र भेटीगाठी घेतल्या आणि त्यातून नरेश म्हस्के यांची उमेदवारी निश्चित केली. thane loksabha candidate naresh mhaske
नाशिकची उमेदवारी देखील आजच जाहीर होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच महाराष्ट्र दिनानिमित्तच्या हुतात्मा चौकात झालेल्या कार्यक्रमानंतर दिली.
शिवसेना शिंदे गटाकडून काल उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार जाहीर करण्यात आले होते. आज महाराष्ट्र दिनी शिवसेना शिंदे गटातून कल्याण आणि ठाण्याचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबईप्रमाणे ठाणे, कल्याणची जागा सुद्धा शिंदे गटाने आपल्याकडे राखली आहे. कल्याणमधून महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली, तर ठाण्यातून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून नरेश म्हस्के एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. मुख्यमंत्री ठाण्यात असताना नरेश म्हस्के हे नेहमीच एकनाथ शिंदे यांच्या शेजारी दिसतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: ठाण्यातून येतात. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. ठाण्याची जागा महायुतीमध्ये कोणाकडे जाणार? यावर बरेच महिने तर्क-वितर्क लढवले जात होते.
Maharashtra CM and Shiv Sena chief Eknath Shinde announces candidates for Thane and Kalyan lok-sabha constituency; Shrikant Shinde from Kalyan and Naresh Mhaske from Thane. #LokSabhaElections2024 pic.twitter.com/8rEhRkSq39 — ANI (@ANI) May 1, 2024
Maharashtra CM and Shiv Sena chief Eknath Shinde announces candidates for Thane and Kalyan lok-sabha constituency; Shrikant Shinde from Kalyan and Naresh Mhaske from Thane. #LokSabhaElections2024 pic.twitter.com/8rEhRkSq39
— ANI (@ANI) May 1, 2024
ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागांवर भाजपने दावा केला होता. आता ठाणे आणि कल्याण या दोन्ही क्षेत्रात भाजपाची ताकद सुद्धा वाढली आहे. त्यामुळे या दोन्ही जागा भाजपाला मिळतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता. पण भाजपने आपला दावा सोडत एकनाथ शिंदे यांनाच ठाणे जिल्ह्यात पुढे चाल दिली. एकनाथ शिंदे शिवसेना गटाकडून प्रताप सरनाईक यांचं नाव सुद्धा चर्चेत होतं. ते ओवळा-माजीपाडा विधानसभेचे आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांचे समर्थक आहेत. पण अखेर उमेदवारीची माळ मुख्यमंत्र्यांचे विश्वासू नरेश म्हस्के यांच्या गळ्यात पडली आहे. नरेश म्हस्के ठाण्याचे महापौर सुद्धा होते. 2012 पासून ते ठाणे महापालिकेवर सातत्याने निवडून गेले आहेत.
ठाण्यात नरेश म्हस्के यांचा सामना महाविकास आघाडीच्या राजन विचारे यांच्याशी होणार आहे. राजन विचारे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यात बंडात राजन विचारे यांनी त्यांना साथ दिली नाही. ते उद्धव ठाकरे गटातच राहिले. कल्याणमध्येही उमेदवारी जाहीर होण्याआधी शिवसेना – भाजपामध्ये अंतर्गत मतभेद दिसून आले. पण अखेर ही जागा शिवसेनेला मिळाली. इथून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे रिंगणात आहेत, त्यांचा सामना महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांच्याशी आहे. महाविकास आघाडी मध्ये ही जागा ठाकरे गटाकडे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App