नाशिक : भर उन्हाळ्यात एकमेकांना दिलेले व्हॅलेंटाईनचे गुलाब सुकले, पण ठाकरे बंधूंचे ऐक्य चर्चेच्या गुऱ्हाळाच्या चरकातच अडकून पडले!!, अशी अवस्था उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पक्षांच्या राजकीय ऐक्याची झाली आहे. काही दिवसांपूर्वी उत्साहात आलेले लोक आता तो विषय विसरूनही गेलेत.
भर उन्हाळ्यात ठाकरे बंधूंनी एकमेकांना व्हॅलेंटाईनचे गुलाब दिले, ठाकरे बंधूंचे हसरे चेहरे पेपरांमध्ये छापून आले, पण त्या गुलाबाला लागलेले मोठे मोठे काटे अनेकांना टोचले, तरी देखील दोन्ही ठाकरे बंधूंचे बहुतांश समर्थक आनंदले. त्यांच्या डोळ्यांत ठाकरे बंधूंच्या एकत्र सत्तेचे पाणी चमकले. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, कोल्हापूर, सोलापुरात ठाकरे बंधूंच्या ऐकण्याची मोठ मोठी पोस्टर्स झळकली. ठाकरे बंधू एकत्र येणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणार अशा बातम्यांनी मराठी माध्यमे रंगून गेली. इतर पक्षांच्या सर्व छोट्या मोठ्या नेत्यांनी ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर हसून घेतले. व्यंगचित्रकारांनी त्या ऐक्यावर आपापल्या कल्पनांचे बहारदार फटकारे मारले.
पण याच दरम्यान दोन्ही ठाकरे बंधू वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर निघून गेले. आपापल्या अनुयायांना त्यांनी चर्चेचे गुऱ्हाळ चालू करायला सांगितले. त्यानुसार अनुयायांनी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू केले. पण या चर्चेच्या गुऱ्हाळातून अजून रस काही बाहेर आला नाही.
दरम्यानच्या काळात उद्धव आणि राज ठाकरे हे दोघेही बंधू परदेश दौऱ्यावरून घरी परतून आले. शिवसेनेची युती बाबत जाहीरपणे कुणी काही बोलू नये, असा राज ठाकरेंनी मनसैनिकांना दम भरला. त्यामुळे मनसैनिक गप्प बसले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतूनही ऐक्याचे आवाज हळूहळू शमत गेले. मुंबई ठाण्यातली ऐक्याची पोस्टर्स एकतर पोलिसांनी उतरवली किंवा दरम्यानच्या काळात झालेल्या पावसात फाटून गेली. पण दोन्ही बंधूंचे ऐक्य काही झाले नाही. उद्धव ठाकरे मातोश्रीवर आणि राज ठाकरे शिवतीर्थावर बसून राहिले.
पण पत्रकारांनी आज संजय राऊत यांना ठाकरे बंधूंच्या ऐक्याविषयी प्रश्न विचारले, त्यावेळी संजय राऊत यांनी सकारात्मक उत्तर दिले. कुठल्याही सिनेमाची पटकथा पडद्यामागे लिहिली जाते त्याप्रमाणे या ऐक्याची पटकथाही लिहिली जात आहे. योग्य वेळ आली की त्याचा सिनेमा येईल तो तुम्हाला दिसेल, असे संजय राऊत म्हणाले. पण संजय राऊत यांच्या या वक्तव्याला मनसेतून अजून तरी कोणी प्रतिसाद दिल्याचे दिसले नाही.
(व्यंगचित्र : सुमंत बिवलकर)
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App