नाशिक : ठाकरे बंधूंचे फक्त मुंबई, ठाण्याकडे लक्ष; मराठवाडा विदर्भाकडे पूर्ण दुर्लक्ष!!, अशीच अवस्था ठाकरे बंधूंच्या महापालिका निवडणुकीच्या रणनीतीतून समोर आली.Thackrey brothers only concentrated on Mumbai and Thane
बलाढ्य भाजपचे आव्हान परतवून लावण्यासाठी ठाकरे बंधूंनी मुंबई आणि ठाण्यामध्ये युती केली. त्यांनी त्याच पद्धतीने निवडणुकीची पूर्ण रणनीती आखली. मुंबई आणि ठाणे या परिसरात आणि फार तर छत्रपती संभाजी नगर मध्ये ठाकरे बंधूंनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली, पण मराठवाडा आणि विदर्भातल्या महापालिकांकडे पूर्ण दुर्लक्ष केले. इतकेच काय पण ठाकरे बंधूंनी पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिकांकडे देखील लक्ष दिले नाही.
ठाकरे बंधूंनी मुंबईतले जागावाटप व्यवस्थित पूर्ण केले. त्या जागावाटपात वैयक्तिक लक्ष घातले. अर्थातच स्वतःचा बालेकिल्ला वाचविण्यासाठी ठाकरे बंधूंनी तसे करणे अपेक्षितच होते. त्यानुसार ठाकरे बंधूंनी मुंबईतले जागावाटप पूर्ण करून घेतले. ठाण्यातल्या जागा वाटपात सुद्धा त्यांनी लक्ष घातले. पण मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या महापालिकांमध्ये नेमके कुणी, कसे आणि किती जागावाटप केले??, याची साधी चर्चा सुद्धा ठाकरे बंधूंनी केली नाही.
– मुंबई, ठाणे पट्ट्यातच सभांचे नियोजन
ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा मुंबई आणि ठाणे याच पट्ट्यात होणार असल्याचे नियोजन झाले. त्याचबरोबर ठाकरेंची पुढची पिढी म्हणजेच आदित्य आणि अमित ठाकरे यांनी सुद्धा मुंबई आणि ठाण्यातच संयुक्त प्रचार सभा घेण्याचे ठरविले. सामना सारख्या शिवसेनेच्या मुखपत्रातून तशा बातम्या छापल्या गेल्या.
पण, या सगळ्यात उर्वरित महाराष्ट्रात ठाकरे बंधू संयुक्त सभा घेणार नाहीत. इतकेच काय पण अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सुद्धा फारसा कुठे प्रचार आणि प्रवासच करणार नाहीत, हे राजकीय सत्य मात्र या निमित्ताने समोर आले. आदित्य ठाकरे यांनी नाशिक मध्ये आणि मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजी नगर मध्ये जाऊन मेळावे घेतले. पण त्यापलीकडे त्यांनी कुठल्या प्रचारात भाग घेतला नाही किंवा जाहीर सभांना सुद्धा संबोधित केले नाही.
– विदर्भाला जखडून ठेवायचे, पण…
संयुक्त महाराष्ट्रात विदर्भासारख्या मोठ्या प्रांताला जखडून ठेवण्याचे काम ठाकरे बंधूंना करायचे आहे. त्यांचा विदर्भाच्या स्वतंत्र प्रांताला विरोध आहे. वास्तविक संयुक्त महाराष्ट्रात विदर्भाला सामील करून घेताना काँग्रेसचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी विदर्भाला समान न्याय मिळेल समान विकास मिळेल असे आश्वासन दिले होते तसा नागपूर करार देखील केला होता, पण काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुवातीपासून त्या नागपूर कराराला हरताळ फासला. काँग्रेसच्या नेत्यांनी विकासात कायम पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप दिले. विदर्भ आणि मराठवाड्यातील संसाधने वापरून पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला पण मराठवाडा आणि विदर्भ या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांकडे दुर्लक्ष केले.
त्यावेळी तर ठाकरे बंधूंकडे सत्तेची सावली सुद्धा नव्हती. तरी देखील ठाकरेंनी नेहमीच संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने म्हणजेच स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात भूमिका घेतली. पण आता महापालिकांच्या निवडणुकांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातल्या महापालिकांकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. तिथल्या साध्या प्रचारात सुद्धा त्यांनी सहभागाचे नियोजन केले नाही.
– भाजपच्या प्रचाराची विदर्भातून सुरुवात
त्या उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, ठाणे या दोन शहरांवर लक्ष केंद्रित केलेच पण त्याचबरोबर अगदी चंद्रपूर पासून प्रचाराला सुरुवात करून त्यांनी पहिल्या दोन दिवसांमध्ये विदर्भात चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला आदी महापालिकांच्या परिक्षेत्रांमध्ये जाहीर सभा घेऊन प्रचार केला. त्याचबरोबर त्यांनी मराठवाड्यातल्या जालना नांदेड मध्ये सुद्धा सभा घेतल्या. त्यामुळे ठाकरे बंधूंचे पक्ष मुंबई ठाण्यापुरते ते मर्यादित राहिले, तर भाजप मात्र महाराष्ट्रभर सर्वदूर पसरल्याचे चित्र निर्माण झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App