नाशिक : मुंबईत “ठाकरे राजा” उदार झाला; शरद पवारांच्या पक्षाला 10 जागा दिल्या!!, ही महत्त्वाची राजकीय घडामोड आज मुंबईत सायंकाळी घडली. काँग्रेसने शरद पवारांच्या पक्षाला 9 जागा देऊ केल्या होत्या. पण “ठाकरे राजा” काँग्रेसपेक्षा जरा जास्त उदार झाला. त्यांनी पवारांच्या पक्षाला 9 ऐवजी 10 जागा दिल्या. त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आता ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये जाऊन मुंबई महापालिकेची निवडणूक लढविणार आहे.
– पुतण्या बरोबर जायचे मुसळ केरात
पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आधी अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर संधान बांधायचा प्रयत्न केला, पण अजिजदादांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला असा काही जमालगोटा दिला की त्यांचा पक्षच गिळंकृत व्हायची वेळ आली. अजितदादांनी पवारांच्या पक्षाला तुतारी सोडून द्या आणि घड्याळ चिन्हावर लढा, अशी ऑफर दिली. त्यामुळे पवार काका – पुतणे एकत्र यायचे मुसळ केरात गेले.
– काँग्रेसने दिली 9 जागांची ऑफर
त्यानंतर पवारांनी काँग्रेसशी संधान साधायचा प्रयत्न केला. त्यांनी काँग्रेसकडे 25 ते 30 जागा मागितल्या. पण काँग्रेसने सुद्धा पवारांच्या राष्ट्रवादीला असा काही जमालगोटा दिला की त्यांना बैठकीतून सुद्धा बाहेर पडावे लागले. काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला 62 जागा दिल्या पण पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 9 जागा ऑफर केल्या. त्यामुळे पवारांचा “स्वाभिमान” दुखावला. पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेस बरोबर आघाडी केली नाही.
– मागितल्या 52, मिळाल्या 10
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसच्या ऐवजी ठाकरे बंधूंची कास धरली. ठाकरे बंधूंच्या युतीत घुसखोरी करून त्यांच्याकडे तब्बल 52 जागा मागितल्या. त्यामुळे सुरुवातीला ठाकरे बंधू चक्रावले. मुंबईत 52 जागा लढविण्याइतपत पवारांच्या राष्ट्रवादीला उमेदवार तरी मिळणार आहेत का??, असा सवाल दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या नेत्यांनी जाहीरपणे विचारला. मुंबईत अखंड राष्ट्रवादीचीच ताकद सात आठ नगरसेवक निवडून आणायची आहे. तिथे राष्ट्रवादी फुटल्यानंतर राष्ट्रवादीतल्या पवार गटाला 52 जागा द्यायच्या म्हणजे राजकीय विनोदच आहे, अशी खोचक टिप्पणी ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या नेत्यांनी केली. पण शेवटी ठाकरे बंधू उदार झाले त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी काँग्रेसपेक्षा एक जागा जास्त सोडायची ऑफर देऊन पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागांवर आणून ठेवले. त्यामुळे मुंबईत ठाकरे बंधू आणि पवार यांची युती जमल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या. परंतु 52 जागा मागणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरे बंधूंनी अवघ्या 10 जागांवर आणून ठेवले हे राजकीय वास्तव मात्र जसेच्या तसे सांगितले नाही. इथे सुद्धा पवार बुद्धीच्या माध्यमांची राजकीय खोट दिसली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App