वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई आणि उपनगरातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सलग पाचव्या दिवशीही लोकल प्रवासाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे संतापाची लाट पसरली आहे. लोकलने प्रवासाची सवलत दिली नाही तर दहावी-बारावी निकालाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे. Teachers boycott 10th-12th results, angery over non-permission of local travel
दहावीच्या मूल्यांकनासाठी शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी 9 जुलैपासून महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना, शिक्षक परिषदेने मुंबईबाहेर राहणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतरांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी लावून धरली आहे. मुंबई, ठाणे जिह्यात रेल्वे स्थानकांवर आंदोलनही छेडले होते. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसांत यावर निर्णय होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, निर्णय न झाल्याने शिक्षक संघटना संतापल्या आहेत.
दहावीच्या निकालासाठी शिक्षक प्रवासाच्या अनेक यातना सहन करून शाळांमध्ये येत आहेत. काहींना ते अशक्य होत आहे. यामुळे निकाल लागण्यासाठी उशीर झाला तर यासाठी सर्व जबाबदारी सरकारवर राहील, असा इशारा शिक्षक परिषदेने दिला आहे. दहावीच्या परीक्षेचे कामकाज पाहणाऱ्या शिक्षकांची संख्या ही फार मोठी नाही. यामुळे त्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली असती तर फार अडचणी आल्या नसत्या, असे शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी सांगितले. दरम्यान, सरकारने लवकर शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा दिली नाही तर आम्ही निकाल प्रक्रियेच्या कामकाजावर बहिष्कार टाकू, असा इशारा शिक्षक भारतीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App