विशेष प्रतिनिधी
पुणे : बोलल्या सुषमा अंधारे, संतापले वारकरी, पण बैठक घेत पवारांचा वारकऱ्यांना संयमाचा सल्ला, असे आज पुण्यात घडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज सकाळी वारकऱ्यांची बैठक घेऊन त्यांची भूमिका समजावून घेतली आहे आणि त्यांना संयमाचा सल्ला दिला आहे. Sushma Andhare’s statements against Hinduism and warkari will damage NCP political fortunes fears Sharad Pawar
शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या जुन्या व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत आणि त्याविरुद्ध वारकरी संप्रदायाचा संताप उसळला आहे. सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्माची, देवदेवतांची, संतांची आणि वारकरी संप्रदायाची वेगवेगळ्या भाषणांमध्ये खिल्ली उडवली होती. देवदेवतांच्या, संतांच्या खोट्या कथा सांगून त्यांच्यावर प्रचंड टीका केली होती. सुषमा अंधारे यांचे हेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वारकरी संप्रदायाने संतापून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुषमा अंधारेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वारकरी संप्रदायाचा हा वाढता असंतोष आणि संताप लक्षात घेऊन शरद पवारांनी आता या विषयात लक्ष घालून वारकऱ्यांची बैठक घेतली आहे. पण या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे?? आणि त्यांनी वारकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना संयम राखण्याचे आवाहन करणे याचाही नेमका अर्थ काय आहे??, हे पाहणे इथे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय ज्या बैठकीत शरद पवारांनी वारकऱ्यांना संयमाचा सल्ला दिला आहे, त्या बैठकीला काही वारकरी उपस्थित होते. पण तिथे सुषमा अंधारे उपस्थित नव्हत्या, हा लक्षवेधी मुद्दा आहे. तरी देखील शरद पवारांचा वारकऱ्यांना संयमाचा सल्ला देण्याचा नेमका हेतू काय??, हे देखील समजून घेतले पाहिजे.
सुषमा अंधारे या पहिल्यापासूनच हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदू देवता आणि हिंदू समाज यांच्याविरुद्ध टीका करत आल्या आहेत. राज्यघटना माझ्या बापाने लिहिली आहे, असे त्या जाहीर भाषणात म्हणत आल्या आहेत. त्यांची भूमिका ही पूर्वापार आहे. पण नव्याने त्या शिवसेनेत आल्याने त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत हे क्वचित प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करून बाजूला झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तर या विषयावर जाहिरीत्या बोलण्याच्या कुठे बातम्याही आलेल्या नाहीत.
पण मग शरद पवारांनीच अचानक पुढे येऊन वारकऱ्यांची बैठक का घेतली आहे??, त्यालाही विशिष्ट संदर्भात आहे. उद्धव ठाकरे हे जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख असले तरी त्यांचा मूलभूत राजकीय प्रभाव हा मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीतच आहे. त्या पलिकडे नाही. तो प्रचंड शहरीकरण झालेला भाग आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय अस्तित्व शिवसेनेपेक्षा कितीतरी दुय्यम / तिय्यम स्थानाचे किंबहुना नगण्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथे जितेंद्र आव्हाड आणि नबाब मलिक हे दोन नेते सोडले, तर फार मोठे नेतेही या परिसरातले प्रतिनिधित्व करत नाहीत. त्यातही नवाब मलिक आत आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या मतदार संघात मुंब्रा या सारखा मुस्लिम बहुल भाग येतो.
त्या उलट शरद पवार, सुप्रिया सुळे, अजितदादा पवार आणि रोहित पवार या पवार कुटुंबीयांचा मूलभूत राजकीय प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे अत्यंत महत्त्वाचे सामाजिक, आध्यात्मिक आणि धार्मिक स्थान आहे… आणि इथेच पवारांनी वारकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना संयमाचा सल्ला देण्याचे राजकीय महत्त्व दडले आहे!!
सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यांच्या निमित्ताने वारकरी संप्रदाय असाच संतप्त राहिला, तर वारकऱ्यांचा सगळा संताप राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसला फार महागात पडू शकतो, याचा शरद पवारांना खरा अंदाज आला आहे. सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यांमुळे शिवसेनेचे जे राजकीय नुकसान व्हायचे आहे, ते जरूर होईल. पण पश्चिम महाराष्ट्रात मात्र सुषमा अंधारे यांच्या सगळ्या वक्तव्यांचा आणि जुन्या व्हिडिओंचा जबरदस्त फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसू शकतो. त्यातही पवार कुटुंबीयांना बसू शकतो, याचा पक्का अंदाज शरद पवारांना आल्याचे दिसत आहे आणि त्यामुळेच पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकसान होऊ नये म्हणून वारकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना संयमाचा सल्ला दिला आहे… अन्यथा ज्या सुषमा अंधारे शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत, त्यांच्यासाठी शिवसेनेचे बाकी कोणतेही नेते पुढे न येता पवारांनी पुढे येऊन वारकऱ्यांची बैठक घेण्याचे तसे दुसरे कुठले कारण दिसत नाही. पण ज्या अर्थी पवारांनी स्वतः पुढाकार घेऊन वारकऱ्यांची बैठक घेतली आहे आणि त्यांना संयमाचा सल्ला देऊन वारकरी संप्रदायाच्या खऱ्या साहित्याचा प्रचार करण्याचाही सल्ला दिला आहे, याचा अर्थ पवारांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात वारकऱ्यांचा असंतोषपूर्ण ओळखला आहे. इतकेच नाही तर त्याचा संभाव्य राजकीय फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसू शकतो याचाही पक्का अंदाज त्यांना आला आहे, हाच याचा नेमका अर्थ आहे.
अर्थात पवारांनी बैठक घेतल्यानंतरही वारकरी नेमकी कोणती भूमिका घेतात आणि त्यांच्या भूमिकेचा परिणाम किती दीर्घकाळापर्यंत टिकू शकतो??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकीय भवितव्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App