नाशिक : सुरेश कलमाडी कालवश झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या राजकीय सामाजिक आणि क्रीडा विषयक आठवणी जागविल्या. कलमाडींनी पुण्यापासून दिल्लीचे राजकारण कसे हलविले होते, याच्या आठवणी अनेकांनी सांगितल्या. Suresh Kalmadi
त्यातलीच एक आठवण शरद पवारांच्या पंतप्रधान पदाची होती. 1991 मध्ये राजीव गांधी एपिसोड नंतर काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धा झाली. या स्पर्धेत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार स्वतःहून उतरले होते. त्यांच्यासाठी सुरेश कलमाडींनी दिल्लीत “लॉबिंग” केले होते. हे “लॉबिंग” करताना सुरेश कलमाडी यांनी दिल्लीच्या पठाडीतली डिनर डिप्लोमसी साध्य केली होती. सुरेश कलमाडींनी दिल्लीतल्या एका पंचतारांकित हॉटेलात पवारांसाठी मोठी डिनर पार्टी दिली होती. आपल्या राजकीय कौशल्यातून कलमाडींनी तिथे वेगवेगळ्या राज्यांमध्ये 64 खासदार जमवून आणले होते. शरद पवारांसाठी ते एक प्रकारे मोठे शक्ती प्रदर्शनच होते. आता या 64 खासदारांच्या पाठिंब्याच्या बळावर शरद पवार पंतप्रधान होणार आणि दिल्लीतल्या प्रस्थापित नेत्यांना हादरा देणार अशी वातावरण निर्मिती सुरेश कलमाडी यांनी केली होती. ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांनी याची आठवण त्यांच्या 24 अकबर रोड या पुस्तकात लिहिली आहे.
– दिल्लीतली लॉबी सावध
सुरेश कलमाडी यांच्या या राजकीय खेळीमुळे दिल्लीच्या राजकारणात मुरलेले सगळेच नेते सावध झाले. पी. व्ही. नरसिंह राव, अर्जुन सिंग, नारायण दत्त तिवारी, शंकर दयाळ शर्मा यांच्यासारख्या नेत्यांना त्या डिनर डिप्लोमसीतून मोठा राजकीय संदेशवजा इशारा मिळाला होता. एका रात्रीत घडलेल्या या डिनर डिप्लोमसीचे पडसाद दिल्लीच्या मोठ्या राजकीय वर्तुळात उमटले आणि तिथून खऱ्या अर्थाने game सुरु झाली होती. शरद पवार त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातले कितीही मोठे नेते असले तरी त्यांचे दिल्लीत स्वतःचे असे फारसे वजन नव्हते. त्यांच्यासारखा एक प्रादेशिक नेता दिल्लीत 64 खासदार जमवतो आणि दिल्लीतल्या प्रस्थापित नेत्यांना आव्हान देतो, हे त्यावेळी सहन केले जाणे शक्य नव्हते. त्याप्रमाणे ते सहन केले गेलेही नाही.
– नरसिंह राव यांनी “कळ” फिरवली
पी. व्ही. नरसिंह राव यांनी व्यवस्थित “कळ” फिरवली. “आवश्यक” ती “बटणे” दाबली. त्यानंतर राजकीय परिस्थिती बदलली. सुरेश कलमाडी सुद्धा नरसिंह राव यांच्या गोटात सामील झाले. नरसिंह राव यांनी त्यांना नंतर रेल्वे राज्यमंत्री पदाचे “बक्षीस” दिले. पण काही असले तरी सुरेश कलमाडींनी जमवून आणलेल्या 64 खासदारांना आपल्या पाठीशी टिकवून धरण्यात शरद पवारांना यश आले नाही. महाराष्ट्रातल्या फक्त सहा खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला. उरलेल्या खासदारांनी सुरेश कलमाडींचे रात्रीचे जेवण घेऊन सकाळी नरसिंह राव यांच्या पाठीशी उभे राहायला सुरुवात केली. त्यामुळेच पवारांना हाताशी आलेले पंतप्रधान पद गमवावे लागले. सुरेश कलमाडींनी आपल्या राजकीय कौशल्याने 64 खासदार जमवून आणले होते, पण पवारांना स्वतःच्या राजकीय कौशल्याच्या अभावी ते टिकवून धरता आले नाहीत. याची आठवण सुरेश कलमाडींच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App